कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शरीरसंबंध आला तरी त्यानंतरही वापरता येण्याजोग्या गर्भनिरोधक औषधांना अथवा साधनांना आपत्कालीन गर्भनिरोधके असे म्हणतात; तर या पद्धतीला आपत्कालीन गर्भनिरोधन असे म्हणतात. यामध्ये शरीरसंबंधानंतर पाच दिवसांपर्यंत देखील गोळ्या आणि अशी अन्य काही औषधे वापरता येतात.
प्रत्यक्ष गर्भधारणा होण्यापूर्वी ही कार्य करत असल्याने ही औषधे म्हणजे गर्भपाताची औषधे नाहीत. ही औषधे सर्व स्त्रियांना वापरण्यासाठी सुरक्षित आहेत. अशा पद्धतीने वापरता येतील अशी अनेक औषधे आहेत. यामध्ये निव्वळ आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणून वापर करायच्या प्रोजेस्टेरॉन गोळ्या, तांबी यांसारखी साधने आणि इतर वेळी गर्भनिरोधक म्हणून वापरता येतील अशी प्रोजेस्टेरॉनयुक्त अंत:क्षेपणे तसेच एरवीही गर्भनिरोधक म्हणून वापरल्या जाणाऱ्या इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या यांचा समावेश आहे.
निव्वळ आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणून वापर करायच्या गोळ्या : या गोळ्यांना मॉर्निंग आफ्टर पिल असेही नाव आहे. संभोगाच्या रात्रीनंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यावयाची गोळी असा याचा अर्थ होतो.
या गोळ्यांमुळे स्त्रीबीज उशिरा बाहेर पडते. त्यामुळे शरीरसंबंधानंतर ताबडतोब फलन होण्यासाठी स्त्री बीजच उपलब्ध नसते. यातील सर्व प्रकारच्या गोळ्या संबंधानंतर लवकरात लवकर घ्यायच्या आहेत. जितक्या लवकर गोळ्या घेतल्या जातील, तितक्या त्या जास्त प्रभावी ठरतात. शक्यतो १२ तासांच्या आत आणि जास्तीत जास्त ७२ तासांपर्यंत गोळ्या घेता येतात. या गोळ्यांचा परिणाम तात्कालिक असतो. गोळ्या घेण्यापूर्वीच्या ७२ तासांच्या कालावधीतील संबंधामुळे होणारी गर्भधारणा टाळली जाते. या गोळ्या घेतल्यानंतरही पुन्हा संबंध यायचे झाले, तर त्यावेळी योग्य ते गर्भनिरोधक साधन वापरणे आवश्यक आहे. तांबी संबंधानंतर पाच दिवसांपर्यंत बसवली तरी उपयोगी ठरते. ही २-३ वर्षांच्या कालावधीपर्यंत वापरली जाते. दरम्यानच्या काळात संतती हवी असल्यास ती काढता येते.
परिणामकारकता : स्त्रीबीज निर्मितीच्या सुमारास एकदाच संबंध आला तर शंभरातील आठ स्त्रिया गरोदर राहतात असे आकडेवारी सांगते. जर फक्त प्रोजेस्टेरॉन असलेल्या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या, तर हेच प्रमाण एक वर येते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन्ही घटक असलेल्या गोळ्या वापरल्या तर हे प्रमाण दोन एवढे असते.
सहपरिणाम, धोके आणि फायदे : या गोळ्या वापरल्या असता पाळी अनियमित येऊ शकते. तसेच मळमळ, डोकेदुखी, थकवा, स्तनात जडपणा जाणवणे, उलटी होणे, चक्कर असे सहपरिणाम दिसून येतात. या व्यतिरिक्त या गोळ्यांमुळे कोणताही मोठा धोका संभवत नाही. या गोळ्यांमुळे गर्भामध्ये व्यंग उत्पन्न होत नाही. त्यामुळे या गोळ्या घेतल्यानंतर जर त्या स्त्रीस गर्भधारणा सुरूच ठेवायची असेल तर तशी मुभा देता येते.
लैंगिक जीवनातील अनेक टप्प्यांवर या गोळ्या उपयुक्त ठरू शकतात. उदा., निरोधचा वापर न करणे/नीट न करणे अथवा निरोध फाटणे; गर्भनिरोधनाच्या नैसर्गिक पद्धती काही कारणाने नीट न वापरता येणे. उदा., अवरुद्ध संभोगामध्ये योनिमार्गात वीर्यपतन होणे; नियमित गर्भनिरोधक गोळ्या विसरणे; तांबी गळून पडणे; गर्भनिरोधक इंजेक्शन वेळेत न घेणे अथवा त्याला पंधरा दिवसापेक्षा अधिक उशीर होणे.
पहा : अंत:गर्भाशयी साधने; तांबी; प्रोजेस्टेरॉनयुक्त गर्भनिरोधक अंत:क्षेपणे .
समीक्षक : यशवंत तोरो