महत्त्वाचे लघुग्रह :
सूर्याला सर्वात जवळची कक्षा असलेला लघुग्रह: ‘(४३४३२६) २००४ जेजी ६’ हा लघुग्रह सूर्यापासून सर्वात जवळची कक्षा असणारा लघुग्रह आहे. हा १० मे २००४ ला सापडला आणि कक्षा निश्चिती झाल्यावर १३ मे २००४ ला जाहीर करण्यात आला. उपसूर्य स्थानी (सूर्याला तो सर्वात जवळ असताना) बुधाच्या कक्षेच्या आत २० लाख किलोमीटर अंतरावर, तर अपसूर्य स्थानी (सूर्यापासून सर्वात लांब असताना) तो पृथ्वीपासून फक्त ५२ लाख किमी. अंतरावर तो असू शकतो. हा ‘अटिरा’ प्रकारच्या कक्षांच्या गटामध्ये मोडतो. बुध आणि शुक्र ग्रहांच्या कक्षा छेदणारी कक्षा असलेल्या ‘पृथ्वीसमीप लघुग्रह’ या मोठ्या गटाचा अटिरा गट हा एक प्रकार आहे. ‘(४३४३२६) २००४ जेजी ६’ चा परिभ्रमण कालावधी १८५ दिवसांचा, कक्षाप्रतल १८.९४ अंशाने तिरपे, तर विकेंद्रितता ०.५३ आहे. हा लघुग्रह जेमतेम ०.६ ते १.२४२ किलोमीटर व्यासाचा आहे. २९ एप्रिल २०३९ ला हा पृथ्वीला सर्वात जवळ येणार आहे, त्यावेळी तो सुमारे २,९४,५२,०९८ किमी. अंतरावरून सेकंदाला सुमारे १७ किमी. या वेगाने प्रवास करत असेल.
सूर्याजवळ कक्षा असणारा दुसऱ्या क्रमांकावरचा ‘(१६३६९३) २००४ सीपी २०’ हा लघुग्रहही याच अटिरा गटातला आहे. तो त्याच्या सूर्याभोवती असलेल्या कक्षेत फिरत जाताना, जानेवारी २०१७ मध्ये आपल्यापासून सुमारे ३ कोटी १ लाख किमी अंतरावर आला होता.
सूर्यापासून सर्वात दूरचा लघुग्रह: ‘(१९३०८) १९९६ टीओ ६६’ हा सुमारे २०० किलोमीटर व्यासाचा लघुग्रह, सुमारे ३७.९ खगोलीय एकक ते ४८.३ खगोलीय एकक कक्षांतरे असणारा आहे. याचे कक्षाप्रतल २७.४९ अंशाने तिरपे आहे. हा लघुग्रह ‘क्यूपर पट्ट्या’तील ‘२०००० वरुणा’ च्या शोधाआधी ‘प्लूटो’ नंतरचा सर्वात मोठा लघुग्रह मानला जात असे.
लघुग्रहांचे त्यांच्या कक्षीय माध्यांतराप्रमाणे आठ मुख्य गट पडतात. त्यात काही प्रमाणात दोन गटात सामाईक ठेवायला लागतील असेही काही लघुग्रह आहेत. या आठ गटांचे कोष्टक पुढील प्रमाणे होईल:
क्र. | कक्षीय माध्यांतराप्रमाणे लघुग्रहाच्या गटाचे नाव | कक्षेचा उपसूर्यबिंदू आणि माध्यअंतर | आजपर्यंत माहीत झालेल्या लघुग्रहांची संख्या (जून २०२०) |
१ | पृथ्वीसमीप कक्षा असणारे | उपसूर्यबिंदू १.३ ख.ए.पेक्षा कमी असणारे | २३,१७३ |
२ | मंगळसमीप कक्षा असणारे (कक्षा लांघणारे) | उपसूर्यबिंदू १.३ / माध्यअंतर ३.२ ख.ए. असणारे | १६,०२२ |
३ | मुख्य पट्टा (आतील) | उपसूर्यबिंदू १.६६ / माध्यअंतर २.५ ख.ए. असणारे | १,६९,०९१ |
४ | मुख्य पट्टा (मध्यातील) | उपसूर्यबिंदू १.६६ / माध्यअंतर २.५ ते २.८२ ख.ए. असणारे | १,७७,९१५ |
५ | मुख्य पट्टा (बाहेरील) | उपसूर्यबिंदू १.६६ / माध्यअंतर २.८२ ते ४.६ ख.ए. असणारे | १,४८,९६८ |
६ | गुरूचे ट्रोजन | माध्यअंतर ४.६ ते ५.५ ख.ए. आणि विकेंद्रितता ०.३ असणारे | ८,१९० |
७ | सेंटॉर | माध्यअंतर ५.५. ते ३०.१ ख.ए. असणारे | १,१६० |
८ | क्यूपर पट्टा (नेपच्यून पलीकडील) | माध्यअंतर ३०.१ ख.ए. पेक्षा अधिक असणारे | २,००० पेक्षा अधिक |
वरच्या कोष्टकातल्या एकूण ५,४६,०७७ लघुग्रहांच्या कक्षा, गती, त्यांचा आकार, घनता, त्यातल्या अनेकांची रासायनिक जडणघडण अशा गोष्टी आता ज्ञात आहेत.
इ.स. १८०१ पासून १८४९ पर्यंत यातले ‘१ सेरेस, २ पल्लास, ३ जूनो, ४ व्हेस्टा, ५ ॲस्ट्राइया, ६ हेबे, ७ आयरिस, ८ फ्लोरा, ९ मेटिस आणि १० हायजिया’ हे पहिले दहा लघुग्रह शोधले गेले होते. परंतु हे सारेच काही आकाराने सर्वात मोठे नाहीत. म्हणजे पहिल्या दहातील ‘१ सेरेस’ सर्वात मोठा आहे, परंतु आकाराच्या क्रमवारीने पहिले १० लावले तर त्यात खूप उशीरा, नंतर शोध लागलेलेही काही दिसतात. कारण लघुग्रहांच्या आकाराचा अंदाज करणे बरेच कठीण काम असते. सुसम गोलाकार नसणारा ओबडधोबड आकार, कमी अधिक लांबी-रुंदी-उंची, शिवाय वेगळ्या घटकद्रव्यांमुळे कमीजास्त परावर्तकता असल्याने (‘सी’ प्रकारचे घटक असणारे तर कोळशासारखे काळेकुट्ट असल्याने दिसण्यास अधिकच त्रासदायक आहेत) त्यांच्या आकाराचा अंदाज घेण्यात अडचण येते. उदाहरणार्थ, ‘१६ सायके’ या लघुग्रहाचा आधी ठरवलेला २५३ किलोमीटर हा आकार आता सखोल निरीक्षणांनंतर सरासरी फक्त १८६ किलोमीटरच भरतो. असेही अनेकांच्या बाबतीत झाले आहे, कारण हे लघुग्रह गोलाकार नाहीत, तर ओबडधोबड मोठे असमान आकाराचे दगडच म्हणायला हवे.
सरासरी आकार मोठ्यापासून लहान असे पहिले दहा लघुग्रह:
क्रमांक | नाव | आकार: लांबी,रुंदी,उंची किलोमीटरमध्ये | सरासरी आकार किलोमीटरमध्ये |
१ | १ सेरेस | ९६५ × ९६२ × ८९१ | ९४६ |
२ | ४ व्हेस्टा | ५७२.६ × ५५७.२ × ४४६.४ | ५२५ |
३ | २ पल्लास | ५५० × ५१६ × ४७६ | ५१२ |
४ | १० हायजिया | ५३० × ४०७ × ३७० | ४३१ |
५ | ७०४ इंटरॅम्निया | ३५० × ३०४ | ३२६ |
६ | ५२ युरोपा | ३८० × ३३० × २५० | ३१५ |
७ | ५११ डेव्हिडा | ३५७ × २९४ × २३१ | २८९ |
८ | ८७ सिल्व्हिया | ३८५ × २६५ × २३० | २८६ |
९ | ६५ सिबेले | ३०२ × २९० × २३२ | २७३ |
१० | १५ युनोमिया | ३५७ × २५५ × २१२ | २६८ |
गंमत म्हणजे आकाराने २५८ सरासरी व्यास असणारा, ११ व्या क्रमांकावर येईल असा ‘२-जूनो’ हा सेरेसनंतर लगेचच मिळालेला दुसरा लघुग्रह आहे, तर आकाराने पाचव्या क्रमांकावर असणारा ‘७०४ इंटरॅम्निया’ हा २ ऑक्टोबर १९१० ला मिळालेला लघुग्रह आहे.
पृथ्वीवरून दिसायला सर्वात उजळ म्हणावे असे जर पहिल्या दहात कोणते लघुग्रह बसतात, असे ठरवायचे झाले तर ‘९९९४२ ॲपोफिस’ हा आकाराने फक्त ३२० मीटर – एका किलोमीटरच्या फक्त एक तृतियांश सरासरी आकाराचा, इ.स.२००४ मध्ये सापडलेला, पृथ्वीसमीप कक्षेतला छोटासा लघुग्रह यादीत पहिल्या क्रमांकावर येतो. जो सर्वात जवळ असताना ३.४ दृश्यप्रतीचा ठरतो; अर्थात अशा वेळी तो नुसत्या डोळ्यांनी दिसतो. डिसेंबर २००४ ला तो तसा दिसला होता, किंबहुना त्याच्या समीपतेची तेव्हा भीतीही वाटलेली होती. असाच योग १३ एप्रिल २०२९ ला परत एकदा घडणार आहे. (त्यावेळी तो पृथ्वीपासून फक्त २४, ००० किमी. अंतरावरून जाईल असा अंदाज आहे. परंतु गुरुत्वाकर्षणाच्या परिणामाने त्याच्या कक्षामार्गात फरक पडला, तर तो पृथ्वीवर येऊन आदळू शकतो; मोठा उत्पात तो करू शकतो.) मात्र इतर वेळी त्याची दृश्यप्रत २० ते २२ म्हणजे फारच अंधुक असते. ‘४ व्हेस्टा’ हा लघुग्रह ‘१सेरेस’ प्रमाणेच ‘खुजा ग्रह’ (Dwarf Planet) म्हणून गणला जावा अशी चर्चा सध्या शास्त्रज्ञांमध्ये सुरू आहे. मात्र डोळ्यांनी दिसेल एवढी दृश्यप्रत ‘४ व्हेस्टा’ त्याच्या उच्च परावर्तकता (Albedo) असण्याने आणि त्याच्या कक्षेचे पृथ्वीपासूनचे जवळचे अंतर या दोन गोष्टींमुळे पुन्हा पुन्हा प्राप्त करतो. ते परंतु तरीही नुसत्या डोळ्यांनी कधी कधी पाहता येतील असे हे दोनच लघुग्रह आहेत. बाकीचे कोणतेही लघुग्रह पाहायचे झाल्यास दूरदर्शीचा वापर करावाच लागतो. शिवाय ते आजच्या आकाशात नक्की कोठे आहेत, ते माहीत असणेही महत्त्वाचे असते. कारण त्यांची दृश्यप्रत पाहता, त्यांना सहज ओळखणे काही शक्य होत नाही. उदाहरणार्थ, ८.३ पेक्षा अधिक दृश्यप्रत प्राप्त होत असणारे बाकीचे सारे लघुग्रह सापडण्याच्या १४५ वर्षे आधी, शनीचा उपग्रह ‘टायटन’ चा शोध लागला होता, जो तर याच दृश्यप्रतीचा आहे. परंतु तो शनीच्या जवळ सतत दिसत असल्याने, शनीच्या संदर्भात त्याची निरीक्षणे आपोआपच होत होती, हे लक्षात घ्यायला हवे.
शनीचा उपग्रह टायटन पेक्षा अधिक प्रकाशमानता (दृश्यप्रत) दर्शवणारे लघुग्रह:
लघुग्रहाचे नाव | दृश्यप्रत | सर्वाधिक प्रकाशमानता असताना अंतर (ख.ए.) | आकार (किलोमीटर) | शोधाचे वर्ष |
१ सेरेस (१ Ceres) | ६.६५ | २.७६६ | ९५२ | १८०१ |
२ पल्लास (२ Pallas) | ६.४९ | २.७७३ | ५४४ | १८०२ |
३ जूनो (३ Juno) | ७.५ | २.६६८ | २३३ | १८०४ |
४ व्हेस्टा (४ Vesta) | ५.२० | २.३६१ | ५२९ | १८०७ |
६ हेबे (६ Hebe) | ७.५ | २.४२५ | १८६ | १८४७ |
७ आयरिस (७ Iris) | ६.७३ | २.३८५ | २०० | १८४७ |
८ फ्लोरा (८ Flora) | ७.९ | २.२०२ | १२८ | १८४७ |
९ मेटिस (९ Metis) | ८.१ | २.३८७ | १९० | १८४८ |
१५ युनोमिया (१५ Eunomia) | ७.९ | २.६४३ | २६८ | १८५१ |
१८ मेल्पोमेन (१८ Melpomene) | ७.५ | २.२९६ | १४१ | १८५२ |
२० मस्सालिया (२० Massalia) | ८.३ | २.४०९ | १४५ | १८५२ |
१९२ नवसिका (१९२ Nausikaa) | ८.२ | २.४०४ | १०३ | १८७९ |
३२४ बंबर्ग (३२४ Bamberga) | ८.० | २.६८२ | २२९ | १८९२ |
४३३ इरोस (४३३ Eros) | ६.८ | १.४५८ | ३४ X ११ X ११ | १८९८ |
१०३६ गनिमेड (१०३६ Ganymed) | ८.१ | २.६६५७ | ३२ | ०१९२४ |
९९९४२ अपोफिस (99942 Apophis) | ३.४* | ०.९२२ | ०.३२ | २००४ |
*सर्वाधिक दृश्यप्रत
बहुतेक लघुग्रहांचा परिवलन कालावधी (स्वत:भोवती एक फेरी मारण्याचा काळ) सुमारे २ तास ते २० तासांच्या दरम्यान आहे. साधारणत: आकार मोठा, तर परिवलन सावकाश आणि आकार छोटा तर परिवलन भरभर, असा एक अंदाज असतो. पण आकार छोटा असूनही दहा लघुग्रह असे आहेत की जे एका परिवलनाला १००८ तासांहून (४२ दिवस) अधिक कालावधी घेतात.
क्रमांक | नाव | परिवलन कालावधी (तास) | सरासरी आकार किलोमीटरमध्ये |
१ | ८४६ लिप्परटा | १६४१ | ५२.४१ |
२ | ९१२ मारिटिमा | १३३२ | ८२.१४ |
३ | ९१६५ राऊप | १३२० | ४.६२ |
४ | १२३५ स्कोरिया | १२६५ | ५.०४ |
५ | (५०७१९) २००० इ जी १४० | १२५६ | ३.४० |
६ | (७५४८२) १९९९ एक्स सी १७३ | १२३४.२ | २.९६ |
७ | २८८ गाऊके | ११७० | ३२.२४ |
८ | १९९२ डी टी ५ | ११६७.४ | ५.३४ |
९ | ४५२४ बर्कलजडेटोली | १०६९ | ७.१४ |
१० | २६७५ टाल्कीयेन | १०६० | ९.४५ |
अकरावा ‘(२१९७७४) २००१ वायवाय १४५’ हा १००७.७ तास म्हणजे ४१.९ दिवस कालावधीत परिवलन करणारा लघुग्रह फक्त दीड किलोमीटर व्यासाचा आहे. त्यानंतच्या क्रमांकावरचे मात्र १००० तासाच्या आतले आहेत.
याउलट सर्वात कमी कालावधीत म्हणजे वेगाने स्वत:भोवती एक फेरी मारणारे लघुग्रह काही सेकंदातच एक फेरी घेतात. सर्वाधिक वेगाने फिरणाऱ्यांचा क्रम लावला, तर त्यातले पहिले दहा फारच लहान आकाराचे म्हणजे १ ते ५ मीटर आकाराचे आहेत. ५ मीटरचा ‘२०१० टीजी १९’ हा त्यातला सर्वात सावकाश फिरणारा ७० सेकंदात (१ मिनिट १० सेकंद) स्वत:भोवती एक फेरी घेतो. तर ‘२०१४ आर सी’ हा एक मीटर आकाराचा लघुग्रह फक्त १६ सेकंदात स्वत:भोवती एक फेरी मारणारा आहे. हे सारेच परिवलन कालावधी कमी असणारे लघुग्रह पृथ्वीसमीप कक्षा असणारे आणि २० ते ३० पर्यंत दृश्यप्रत असणारे लघुग्रह आहेत. हे छोट्या अशनींच्या, दगडांच्या स्वरूपातच आहेत, असे म्हणायला हरकत नाही. ९० मिनीटांपर्यंतचा परिवलन कालावधी असणारे २३ लघुग्रह सध्या माहीत आहेत. परंतु यांपैकी २३ वा लघुग्रह आता अस्तित्वात नाही. ‘कॅटेलिना स्काय सर्व्हे’ या प्रकल्पातून याचा जेव्हा शोध लागला, त्यानंतर लगेचच, म्हणजे जेमतेम १९ तासांनी तो पृथ्वीवर कोसळणार आहे, हे लक्षात आले. ९० मिनिटात स्वत:भोवती एक फेरी घेणाऱ्या आणि सुमारे १३ फूट व्यास असणाऱ्या या ‘उल्के’चा सुदानच्या नबीयन वाळवंटात वातावरणात सुमारे ३५ किलोमीटर उंचीवर असताना, जळून जात, अग्निलोळाच्या रूपात स्फोट होऊन तुकडे झाले. त्यातले सुमारे १०.५ किलोग्रॅम वजनाचे सुमारे ६०० तुकडे, ‘अशनी’ वाळवंटात शोध घेऊन मिळवण्यात यश आले आहे. हे तुकडे ‘युरेलाइट’ या दुर्मिळ खनिजाच्या प्रकारचे आहेत. ज्यात काही भागात ‘नॅनोडायमंड’ म्हणजे सूक्ष्म स्वरूपातील हिरे आहेत असेही दिसून आले आहे.
आजपर्यंत सापडलेल्या एकूण सात लाख लघुग्रहांपैकी फक्त ९५ लघुग्रहांचे परिवलन हे उलट दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे होते. तेही त्यांचे परिवलन अक्ष त्यांच्या कक्षाप्रतलांशी ९० ते १८० अंशांच्या कोनात कलते असल्याने, ते असे उलट दिशेने फिरत आहेत असे वाटते. त्यामुळे प्रत्यक्षात उलट परिवलन करणारे लघुग्रह दुर्मिळच. परंतु कक्षीय प्रतलांचे सर्वाधिक कलणे असणारे बरेच म्हणजे १,९३० लघुग्रह आहेत. या कक्षा ग्रहमालेच्या प्रतलांच्या संदर्भात (आपण आपल्या पृथ्वीचे प्रतल संदर्भासाठी ० अंशाचे धरतो) ९० अंशांहून अधिक तिरप्या, किंबहुना यातल्या बऱ्याच कक्षा ग्रहमालेच्या प्रतलाशी काटकोनात, उभ्या दिशेने आहेत. तरीही ही संख्या एकूण लघुग्रहांच्या तुलनेत लहानशीच म्हणावी लागेल.
काही लघुग्रह ‘खास’ म्हणूनच ओळखले जातात. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ, ‘८७ सिल्व्हिया’ हा सुमारे २६१ किलोमीटर आकाराचा लघुग्रह भारतातील मद्रास वेधशाळेतून निरीक्षणे घेताना ‘नॉर्मन पॉगसन’ या खगोल निरीक्षकाला १६ मे १८६६ ला सापडला होता. इ.स. २००५ मध्ये त्याच्या इतर अनेक वेधांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की या लघुग्रहाला दोन उपग्रह आहेत.
‘९० अँटिओप’ हा लघुग्रह ८०×८० किलोमीटर आकाराचा आहे, असे मानले जात होते. हा सुद्धा इ.स. १८६६ मध्ये सापडलेला लघुग्रह. मात्र हा लघुग्रहही एक नसून एवढ्याच आकाराचे दोन लघुग्रह एकमेकांभोवती फुगडी घातल्यासारखे फिरत आहेत, असे इ.स. २००० मध्ये समजले. अर्थात ‘९० अँटिओप’ एक ‘द्वैती लघुग्रह’ ठरला.
‘२१६ क्लिओपात्रा’ हा धातुमय लघुग्रह चक्क एखाद्या कुत्र्याच्या तोंडातल्या हाडकासारख्या आकाराचा आहे. या विचित्र आकाराच्या लघुग्रहाभोवती फिरणारे दोन छोटे उपग्रहही इ.स. २००० मध्ये सापडले आहेत.
‘३२३ ब्रुसिया’ हा खगोल प्रकाशचित्रांच्या तंत्रामधून शोध लागलेला पहिला लघुग्रह आहे.
‘४३३ इरॉस’ हा ज्याची कक्षा पृथ्वीसमीप आहे, असा शोधला गेलेला पहिला लघुग्रह होय.
‘५८८ अचिल्स’ हा शोधला गेलेला पहिला गुरूचा ट्रोजन.
‘३२०० फाएथॉन’ हा अवकाशीय दूरदर्शीने शोधला गेलेला पहिला लघुग्रह. जो मिथुन राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला ‘जेमिनिड्स (Geminids)’ ला जबाबदार आहे.
‘२०१० टीके ७’ हा आधी पृथ्वीसमीप कक्षा आहे, असे वाटणारा लघुग्रह, पृथ्वीचा ट्रोजन आहे असे आता समजून आले आहे. सुमारे ३०० मीटर आकाराचा आणि ४ क्रमांकाच्या लॅग्रेंजियन बिंदूवर पृथ्वीच्या कक्षेतच, पृथ्वीपुढे सतत राहणारा हा लघुग्रह आहे. परंतु या चौथ्या बिंदूपासून कक्षेत पुढे पुढे जात, तो तिसऱ्या क्रमांकाच्या लॅग्रेंजियन बिंदूपर्यंत (पृथ्वीच्या विरुद्ध सूर्यापलीकडे बरोबर १८० अंशावर हा तिसरा बिंदू येतो) पोहोचतो आणि परत मागे पडत परत चौथ्या बिंदूशी जातो. अशी त्याची विचित्र कक्षा आहे. या त्याच्या कक्षेचा आकार एखाद्या बेडुकमाशासारखा दिसतो.
सर्वात अधिक घनतेचा ‘१६ सायके’ लघुग्रह हा जणू काही एखाद्या ग्रहाच्या धातूमय गाभ्यासमान असावा असा अंदाज आहे, जो गाभा आता जणू काही उघडा पडला आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात, (इ.स. २०२३ मध्ये प्रक्षेपण होऊन इ.स. २०३० मध्ये प्रत्यक्ष त्या लघुग्रहाशी भेट होईल अशी ती योजना आहे) त्याच्याकडे त्याच्याच ‘सायके’ या नावाचे अवकाशयान पाठवायची नासाची सध्या तयारी सुरू आहे.
पृथ्वीसमीप कक्षा असणाऱ्या सुमारे २०,००० लघुग्रहांपैकी ‘अत्यंत धोकादायक’ म्हणून गणले जाणारे (PHOs=Potential hazardous objects) सुमारे २,०९३ लघुग्रह किंवा तत्सम वस्तू आज माहीत झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्या पृथ्वीच्या जवळून कधी आणि किती जवळून जाणार आहेत याकडे सतत लक्ष पुरवले जात आहे. दरमहा अशी अद्ययावत यादी आता आयएयूच्या मायनर प्लॅनेट सेंटरच्या वेबसाइटवर दिली जाते. तसेच ‘सेंट्री रिस्क टेबल’ या नावाने ‘जेपीएल निअर अर्थ ऑब्जेक्टस’च्या प्रकल्पाअंतर्गत २००२ पासून एक उच्च संगणकीय विश्लेषणावर आधारित असलेली यादी प्रसिद्ध केली जाते, ज्यात अशा धोकादायक वस्तूंच्या आपल्याला भेट देण्याच्या वेळा, आकार आणि अंतरे दिलेली असतात. ही यादीही वेळोवेळी अद्ययावत केली जाते.
नवनव्या शोधांमुळे या सर्वच लघुग्रहांमध्ये सतत भर पडणार आहे, पडत आहे. कारण एका महिनाभरात जगभरातून होणाऱ्या सुमारे १०,००० निरीक्षणांमधून साधारणत: १०० ते २५० नव्या वस्तूंचा शोध हाती येत आहे.
संदर्भ :
- https://www.britannica.com/science/asteroid/Geography-of-the-asteroid-belt
- https://cneos.jpl.nasa.gov/stats/totals.html
- https://cneos.jpl.nasa.gov/about/basics.html
- https://ssd.jpl.nasa.gov/?asteroids
- https://www.spacereference.org/category/mars-crossing-asteroids
- https://solarsystem.nasa.gov/asteroids-comets-and-meteors/asteroids/16-psyche/in-depth/
समीक्षक : माधव राजवाडे