दीर्घिका वर्गीकरण : हबल आकृती 

दीर्घिकांचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार आहेत. लंबगोलाकृती, सर्पिलाकृती आणि अनियमित आकार असलेल्या. यातल्या पहिल्या दोन प्रकारांचे अजून वर्गीकरण होऊन त्याचे काही उपविभाग पडतात. दीर्घिकांचे आकारानुसार वर्गीकरण करून ज्या विशिष्ट पद्धतीने ती मांडण्यात येते, तो आकार झाडाच्या फांदीच्या बेचकी सारखा दिसतो. सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ श्री. एडविन हबल यांनी दीर्घिकांचे ४ भागात वर्गीकरण केले आहे. लंबगोलाकृती, सर्पिलाकृती, दंड सर्पिलाकृती आणि अनियमित आकार असलेल्या दीर्घिका. बेचकी (किंवा ट्युनिंग फोर्क) ची संकल्पना श्री. हबल यांचीच. चित्रात दिसत आहे त्याप्रमाणे बेचकीच्या एका बाजूच्या टोकाला पूर्ण गोलाकृती दीर्घिका आहेत. त्या गोलाकाराची विवृत्तता उजव्या बाजूकडे वाढत जाते. म्हणजेच दीर्घिकांचा आकार जास्त जास्त लंबगोलाकार होत जातो. जिथे बेचकीला दोन फाटे फुटतात, तिथून एक फाटा सर्पिलाकृती तर दुसरा फाटा दंड सर्पिलाकृती दीर्घिकांचा आहे.  दोन्ही प्रकारच्या दीर्घिकांचे बाहू डाव्या बाजूकडून उजवीकडे जाताना उघडत जाणारे आणि बाहूंची संख्याही कमी होत जाणारी होते.

लंबगोलाकृती दीर्घिका : या दीर्घिका साधारण अंडाकृती आकाराच्या असतात. केंद्रभागात त्या जास्त तेजस्वी दिसतात तर कडेच्या बाजूला त्यांचे तेज कमी कमी होत गेलेले दिसते. या लंबगोलाकृती दीर्घिकांचे त्यांच्या विवृतत्तेवरून (लंबगोलाकार आकारावरून) वेगवेगळे गट पडतात. सुसम गोलाकृती आकारांच्या गटाला इंग्रजी ‘ई 0’(E0) असे नाव दिले आहे. विवृत्तता जशी वाढत जाईल, म्हणजे लंबगोलाकार जसा जसा अधिक होईल त्या प्रमाणे क्रमांक वाढत जातो. जसे ‘ई 0, ई १, ई २ ……. ते ई७ पर्यंत यात गट केलेले आहेत. ई ७ म्हणजे सर्वांत दीर्घ लंबगोलाकृती आकार होतो.

सर्पिलाकृती दीर्घिका : सर्पिलाकृती दिर्घीकांमध्ये मुख्य तीन भाग असतात. केंद्रातील फुगीर भाग, तबकडी आणि त्याचे वलय. मधल्या गोलाकार फुगीर भागात बहुतेक करून वृद्ध तारे असतात. तबकडी धूळ, वायू आणि तरूण ताऱ्यांनी बनलेली असते. ही तबकडी दीर्घिकेच्या अनेक सर्पिलाकृती बाहूंनी बनलेली असते. आपला सूर्य आकाशगंगेच्या म्हणजे आपल्या दीर्घिकेच्या अशाच बाहूंच्या मध्ये आहे. तिसरा भाग म्हणजे दीर्घिकेच्या केंद्राच्या फुगवट्याभोवती असलेले गोलाकार वलय (आभा). ज्यातील पदार्थ तुलनेने विरळ असतो,  तसेच मुखत्वे जुने वृद्ध तारका गुच्छ येथे सापडतात.

सर्पिलाकृती दीर्घिकांचेही दोन प्रकार दिसतात. एक साधा सर्पिलाकृती आणि ज्यामध्ये केंद्राशी आडवा दंड (बार) आहे अशा दीर्घिकांचा दुसरा गट. साध्या दीर्घिकांना इंग्रजी ‘एस’ किंवा ‘एस-ए’ असे नाव आहे, तर दंड असलेल्या दीर्घिका ‘एस-बी’ प्रकारात मोडतात. साध्या सर्पिलाकृती दीर्घिकांमध्ये त्यातले बाहू थेट केंद्रातूनच निघतात, तर दंड सर्पिलाकृती दीर्घिकांमध्ये केंद्रातून एक आडवा दंड जातो आणि त्या दंडाच्या टोकांवरून बाहू फुटतात. दोन्ही प्रकारच्या दीर्घिकांचे वर्गीकरण त्यांच्यातले बाहू किती विस्तारलेले आहेत, त्या वरून करतात. इंग्रजी छोटे अक्षर ‘ए’ म्हणजे सगळ्यात आखूड बाहू, तर नंतरचे बी, सी, डी हे प्रकार क्रमाने विस्तारित होत जाणारे बाहू असलेले असतात.

या दोन्हींच्या मधल्या दीर्घिकेच्या प्रकाराला ‘एस-ओ’ असे नाव आहे. या दीर्घिका म्हणजे ‘ई ७’ आणि खऱ्या सर्पिलाकृती दीर्घिका ‘एस-ए’ यांच्या मधल्या प्रकारात मोडतात. त्यांना मधला फुगीर भाग असतो आणि पातळ तबकडी असते, म्हणून त्या ‘ई ७’ सारख्या नसतात आणि त्यांना सर्पिलाकृती बाहू नसतात म्हणून त्या ‘एस-ए’ सारख्याही नसतात.

अनियमित दीर्घिका (Irregular): या प्रकारच्या दीर्घिकांना कुठलाही ठराविक असा आकार नसतो. त्यांच्यात कुठलीही सममितता किंवा प्रमाणबद्धता नसते. त्यांचेही अजून दोन उपविभाग आहेत. एका प्रकाराला  आय आर आर I (Irr I)  तर दुसरा प्रकार आय आर आर II (Irr II) असे म्हणतात.  आय आर आर I प्रकारच्या दिर्घिकांमध्ये H II भाग म्हणजे हायड्रोजन वायू आणि बरेच तरुण व उष्ण तारे, ज्यांना ‘पॉप्युलेशन-I’ तारे म्हणतात, ते असतात. या दीर्घिका निळसर दिसतात. तर दुसऱ्या आय आर आर II प्रकारच्या दीर्घिकेत मोठ्या प्रमाणात फक्त धूळ असते, ज्यामुळे त्यातल्या ताऱ्यांचा प्रकाश मोठ्या प्रमाणात झाकोळला जातो. या धुळीमुळे कित्येकदा त्यातले तारे वेगळे दिसूच शकत नाहीत. बऱ्याचदा या दीर्घिका लालसर दिसतात.

खुज्या अनियमित दीर्घिका (DI Irr = Dwarf Irregular): हा यात दीर्घिकांमधील तिसरा प्रकार. या आकाराने लहान, मोठ्या प्रमाणात वायू असणाऱ्या दीर्घिका कदाचित दीर्घिकांच्या निर्मितीच्या काळातल्या असल्याने दीर्घिकांच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या टप्प्यातील असल्याने अधिक लक्षवेधी ठरत आहेत.

समीक्षक : आनंद घैसास