डेकन, कार्ल क्लॅऊस फॉन देर (Decken, Karl Klaus von der) : (८ ऑगस्ट १८३३ – २ ऑक्टोबर १८६५). किलिमांजारो शिखरावर चढाई करणारे, तसेच पूर्व आफ्रिकेचे समन्वेषण करणारे जर्मन समन्वेषक. डेकन यांचा जन्म जर्मनीतील ब्रांडेनबुर्क राज्यातील कोटझन येथे झाला. दहा वर्षे लष्करामध्ये नोकरी केल्यानंतर १८६० मध्ये त्यांनी लष्करी सेवेचा राजीनामा देऊन पूर्व आफ्रिकेतील वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध घेण्याचे ठरविले. १८६० मधील पहिल्या मोहिमेत सर्वप्रथम त्यांनी न्यासा सरोवराच्या आसपासच्या परिसराचे समन्वेषण केले. आफ्रिकेच्या अंतर्भागात प्रवास करीत असताना त्यांची भेट ब्रिटिश भूशास्त्रज्ञ रिचर्ड थॉर्नटोन यांच्याशी झाली. थॉर्नटोन यांनी डेकन यांना किलिमांजारोच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. १८६१ मध्ये डेकन आणि थॉर्नटोन यांनी किलिमांजारो गिरिपिंडाचे समन्वेषण केले; परंतु डेकन यांची ही पहिली मोहीम खराब हवामानामुळे अयशस्वी झाली. १८६२ मध्ये डेकन यांनी जर्मन समन्वेषक ओट्टो केरस्टेन यांना बरोबर घेऊन पुन्हा किलिमांजारोची मोहीम आखली. या वेळी ते ४,२०० मीटरपर्यंत वर जाण्यात यशस्वी झाले; परंतु खराब हवामान आणि सामान वाहून नेणाऱ्या हमालांच्या असहकार्यामुळे ही मोहीमदेखील अर्धवट सोडावी लागली; मात्र या वेळी त्यांनी किलिमांजारो कायमस्वरूपी बर्फाच्छादित असल्याचे प्रत्यक्ष निरीक्षण नोंदविले. तसेच किलिमांजारो शिखराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६,१०० मीटर असल्याचे निरीक्षण नोंदवून त्या परिसराचा नकाशा तयार केला.

डेकन यांनी १८६३ मध्ये आपले लक्ष पूर्व आफ्रिकेच्या समन्वेणाकडे वळविले. त्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मादागास्कर बेटाला तसेच मादागास्करच्या पूर्वेस असलेल्या मस्करेन बेटांना भेट दिली. त्यांनी केलेल्या अभ्यासाबद्दल ‘रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी’ने १८६४ मध्ये त्यांना ‘पालकत्त्व पदक’ देऊन त्यांचा गौरव केला. डेकन यांनी १८६५ मध्ये सोमालियाला भेट दिली. सोमालियातील जुबा नदीच्या खालच्या भागामध्ये पोहोचणारे डेकन हे पहिले यूरोपीयन होते. जुबा नदीतून सर्वेक्षण करीत असताना बरडेराच्या वरच्या बाजूस असलेल्या द्रुतवाहांमुळे त्यांचे वेल्फ हे छोटे वाफेवरील जहाज अपघातग्रस्त झाले. त्यामुळे डेकन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सोमालियन टोळीने पकडले. सोमालियन लोकांनी डेकन आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांची हत्या केली. डेकन यांचे इतर अकरा सहकारी मात्र, तेथून झांझीबारला पळून जाण्यास यशस्वी झाले.

डेकन यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या प्रवासाच्या, शोधाच्या नोंदी तसेच त्यांनी वापरलेली उपकरणे इत्यादी गोष्टी बर्लिन वस्तुसंग्रहालयामध्ये जतन करून ठेवल्या आहेत. डेकन यांच्या कामगिरीमुळे पूर्व आफ्रिकेतील एका पक्ष्याला ‘फॉन देर डेकन्स हॉर्नबील’ असे नाव देऊन डेकन यांना गौरविण्यात आले. तसेच पूर्व आफ्रिकेतील पर्वतीय प्रदेशातील एका स्थानिक लोबेलिया प्रजातीला ‘लोबेलिया डेकनी’ असे नाव देण्यात आले आहे.

समीक्षक : वसंत चौधरी