मौंट किलिमांजारो. आफ्रिका खंडातील अत्युच्च ज्वालामुखी पर्वत. हा केन्या व टांझानिया यांच्या सीमेवर, नैरोबीच्या (केन्या) दक्षिणेस सुमारे २२५ किमी.वर असून याची पूर्व–पश्चिम लांबी सुमारे १०० किमी. व रुंदी ६५ किमी. आहे. हा एक गिरिपिंड प्रदेश असून त्यात प्रमुख तीन निद्रिस्त ज्वालामुखे आहेत. त्यांपैकी कीबो हे सर्वांत उंच ज्वालामुख असून याच्या उहरू शिखराची उंची सस. पासून ५,८९५ मी. आहे. विषुववृत्ताच्या जवळ असूनही हे ज्वालामुख सतत हिमाच्छादित असते. यावर १,८२८ मी. रुंद व १८२ मी. खोलीचे ज्वालामुख असून त्यात सुमारे ६१ मी. जाडीचा बर्फाचा थर असतो. याला जोडूनच ११ किमी. पूर्वेस मावेन्झी हे ५,३५७ मी. उंचीचे दुसरे, तर लाव्ह्याच्या क्षरणकार्याचे काही अवशेष असलेले शिरा हे ४,००४ मी. उंचीचे तिसरे ज्वालामुख आहे. मावेन्झी हे उघडे बोडके व ज्वालामुखी राखेने युक्त ज्वालामुख आहे. या पर्वताच्या पूर्व बाजूचे लुमी नदीने, तर दक्षिण उताराचे पंगानी नदीने जलवाहन केले जाते.

किलिमांजारो हा स्वाहिली शब्द असून किलिमा (पर्वत), जारो (शुभ्र) यांवरून हे नाव आले असावे. ‘आमचा पर्वत‘ असाही स्थानिक किचागा भाषेतील याचा अर्थ आहे. ग्रेट मौंटन या अर्थानेही तो ओळखला जातो. यूरोपीयांपैकी लुडविग क्राफ व जोहान्स रेबमान या धर्मप्रसारकांनी १८४८ मध्ये प्रथम हा पर्वत पाहिल्याचा उल्लेख मिळतो. जर्मन भूशात्रज्ञ डॉ. हान्स मायर व ऑस्ट्रियन गिर्यारोहक लुडविग पर्टशेलर यांनी ऑक्टोबर १८८९ मध्ये कीबोवर प्रथम पाऊल ठेवले. १९१२ मध्ये जर्मन गिर्यारोहक एडवर्ड हान्स ओहेलर व फ्रीट्झ क्लूट यांनी मावेन्झी ज्वालामुख सर केले, तर अद्वैत भरतिया या ९ वर्षाच्या भारतीय मुलाने ३१ जुलै २०१९ रोजी मौंट किलिमांजारोवर यशस्वी चढाई केली. काहींच्या म्हणण्यानुसार एव्हरेस्टच्या तुलनेत किलिमांजारोवरील चढाईत जास्त गिर्यारोहकांना प्राणास मुकावे लागले.

पर्वतपायथ्याची व उतारावरील सुपीक जमीन, भरपूर पर्ज्यन्यवृष्टी यांमुळे याच्या सुमारे १,२२० ते १,८३० मी. उंचीच्या भागात केळी, मका, कॉफी इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यावरील सुमारे ३,०४८ मी. पर्यंतच्या प्रदेशात उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगले आढळतात. त्यात १,२०० पेक्षा जास्त वनस्पतिप्रकार असून कठिण लाकडाच्या जंगलांचे प्रमाण जास्त आहे. त्याच्या वरच्या भागात सुमारे ३,३६० मी. उंचीपर्यंत गवताळ प्रदेश आढळतो. त्यानंतर मात्र मूरलँड व बर्फाच्छादित प्रदेश दिसून येतो. पर्वतपायथ्याची व उतारावरील घनदाट जंगले वन्य पशुपक्षांसाठी आरक्षित केलेली आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी १९७३ मध्ये किलिमांजारो राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले असून १९८७ मध्ये त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. या उद्यानाला भेट देण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून अनेक पर्यटक येतात. येथील गिर्यारोहणासाठी सहा मार्गांचा वापर होतो; परंतु बरेच गिर्यारोहक पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी असलेल्या मोशी (टांझानिया) या प्रमुख व्यापारी केंद्रातून जाणाऱ्या मार्गाचा वापर करतात. सर्वांत उंचीवरील खेळ म्हणून या पर्वतावरील सपाट भागात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या अनेक खेळांचे विक्रम गिर्यारोहकांकडून प्रस्थापित करण्यात आलेले आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी