वोल्कीन, एलियट : ( २३ एप्रिल, १९१९  ते  ३० डिसेंबर, २०११ )

एलियट वोल्कीन यांचे लहानपण पिट्सबर्गजवळ गेले. त्यांचे आई वडील लिथुनिया देश सोडून तेथे राहावयास आले होते. त्यांनी आपले शिक्षण पेन्न राज्यात घेतले. नंतर त्यांनी आपले नाव शेतकी महाविद्यालयात घातले. तेथे जीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र हे विषय होते. त्यात पदवी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. महाविद्यालयाचा खर्च भागवण्यासाठी, वर्ग संपल्यावर ते पोल्ट्री विभागात साफसफाईचे आणि कोंबड्यांना अन्न देण्याचे काम करीत. १९४२ मध्ये पदवी घेतल्यानंतर, ड्युक विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर आणि पीएच्.डी.च्या पदव्या मिळविल्या.

जीवरसायानशास्त्रातील डॉक्टरेटनंतर त्यांनी पुढची पोस्ट डॉक्टरेटची फेलोशिप मिळविली. वोल्कीन यांनी ओक रिजमध्ये १९४८ ते १९८४ पर्यंत काम केले. १९६९ ते १९८० मध्ये त्यांनी ओक रिजमधील जीवरसायन विभागात संचालक म्हणून काम केले. त्यांचे ८० हून अधिक शोधनिबंध आणि लेख प्रकाशित झाले. जिवाणूंमधील विषाणूंच्या (mRNA) वरील कामानंतर त्यांनी स्तनधारी प्राण्यांच्या पेशींवर काम सुरू केले आणि साध्या पेशी आणि कर्करोगांच्या पेशींमध्ये काय फरक आहे ह्यावर काम केले. टेनेसे येथील ओक रिज राष्ट्रीय प्रयोगशाळेत काम करीत असताना ४२ व्या वर्षी एलियट वोल्कीन आणि त्यांचे संशोधक सहकारी लाझारस अस्त्राचन यांनी १९५६ साली, पहिल्यांदा मेसेंजर आरएनए ( mRNA) पाहिले आणि त्याचे केंद्रकातील कार्य शोधून काढले. विषाणूशास्त्रातील एका संशोधन पत्रिकेत त्यांनी त्याची नोंद डीएनएसदृश्य आरएनए अशी केली. त्यांच्या काळातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी एमआरएनएच्या शोधाला एक खूपच महत्त्वाची वैज्ञानिक घटना म्हणून वाखाणले. त्यापूर्वी अगदी तीनच वर्षे डीएनएची रचना शोधून काढली गेली त्याच्या एवढेच महत्त्व, या शोधाला होते. एमआरएनए हा पेशींच्या केंद्रकातील अनुवांशिकतेची माहिती रायबोसोमपर्यंत पोहोचवितो आणि प्रथिने तयार होतात हा शोध त्यामुळे लागला. परंतु या शोधांचे अंतिम श्रेय आणि एमआरएनएच्या शोधाबद्दल औषधशास्त्र आणि शरीरशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार १९६५ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञाना दिला गेला. सध्याच्या काळातील अनेक वैज्ञानिकांनी हे प्रतिपादन केले आहे की नंतरच्या संशोधकांचे काम वोल्कीन – अस्त्राचन ह्यांच्या शोधावर बेतले आहे आणि ते जे शोध लावत आहेत, ते आधीच ह्या दोघांनी लावले आहेत. वोल्कीन ह्यांनी ह्या गोष्टींचा कधीच राग मानला नाही व त्याच्यावर काही टिप्पणी केली नाही, त्यांच्या मते, हे असेच होत असते. परंतु त्यांना त्यांच्या अणुशास्त्रातील योगदानाबद्दल अतिशय अभिमान वाटत असे. त्यांच्या संशोधन समूहाने केलेले एमआरएनएची रचना शोधून काढण्याचे काम त्यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे होते.

वोल्कीन अमेरिकन सोसायटी ऑफ बायालॉजीकल केमिस्ट आणि अमेरिकन केमिस्ट सोसायटीचे सदस्य होते. तसेच अनेक अन्य व्यावसायिक समूहाचेही ते सदस्य होते. शास्त्र विषयाला पुढे नेण्यात त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांची निवड फेलो ऑफ द अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हांसमेंट ऑफ सायन्स म्हणून झाली.

संदर्भ :

  • BRENNER, Sydney. ukcom. Who’s Who. 2015
  • “Sydney Brenner EMBO profile”. embo.org.
  • Heidelberg: European Molecular Biology Organization.
  • Sydney Brenner Academic Tree. org.
  • Thompson, H. (1973). ‘Cyril Norman Hinshelwood 1897-1967’. Biographical Memoirs of Fellows of the Royal Society. London: Royal Society. 19: 374–431. doi:10.1098/rsbm.1973.0015.
  • Wade, Nicholas (Eds.) – ‘The Science Times Book of the Brain’, 1998.

समीक्षक : रंजन गर्गे