गदगकर, विक्रम (Gadgkar, Vikram) : विक्रम गदगकर यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यात झाला. २००२ साली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून दोन सुवर्णपदकांसह पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून २००५ साली भौतिकशास्त्र या विषयात एम.एस. करून २००६ साली ते अमेरिकेला गेले. न्यूयार्क येथील कॉर्नेल विद्यापीठात जे. सी. सिमस डेवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांची पीएच्.डी. पूर्ण केली. ते मूलतः पुंजभौतिकीचे विद्यार्थी होत, त्यांच्या संशोधनाचा विषय होता पदार्थाची नवीन अवस्था – प्युटेटीव सुपरसॉलिड स्टेट. पदवी परीक्षेचा अभ्यास करताना ते चेतापेशी कशा काम करतात याकडे ते आकर्षित झाले.

मेंदू हा अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचा अवयव. मेंदूतील चेतापेशीं (neurons) शरीर नियंत्रणाबरोबर प्राणिमात्राच्या वर्तनामध्ये कसा बदल घडवून आणू शकते हे शोधून काढण्यात त्यांना रस होता. त्यांची भेट त्यावेळी आपले समविचारी जेस्सी गोल्डबर्ग या वैज्ञानिकाशी  झाली. जेस्सी गोल्डबर्गसुद्धा याच विषयावर संशोधन करत होते. चेतापेशी परिपथ (Neural Circuit) जोडणी व मानवी वर्तनाचा संबंध यांच्यातील मुख्य दुवा शोधण्यावर त्यांचे संशोधन चालू होते. पीएच्.डी. मिळविल्यानंतर त्यांनी जेसीबरोबर काम करायचे ठरविले. जेसीबरोबर अद्यावत मेंदू संशोधन प्रयोगशाळेच्या उभारणीतही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

झेब्रा फिंच (चंडोल) सारखे गाणारे पक्षी (Zebra Finches – Taeniopygiaguttata) गायन  कौशल्य शिकताना कोणती पद्धत वापरतात याचा विक्रम गदगकर यांनी अभ्यास केला. सस्तन प्राण्यांप्रमाणेच गाणार्‍या पक्ष्यांच्या मध्य मेंदूमध्ये (mid brain) डोपामाइन स्त्रवणार्‍या चेतापेशी (Dopamine neuron) असतात. डोपामाइन हे चेतापारेषक (neurotransmitter) आहे. एका चेतापेशीकडून दुसर्‍या चेतपेशीकडे संदेश वहन डोपामाइनमार्फत होते. डोपामाईन प्राण्यांची हालचाल, स्मरणशक्ती, आनंद, अध्ययन, झोप यांचे नियंत्रण  करते. एखादी गोष्ट, एखादे कौशल्य, मेंदू कशाप्रकारे शिकतो याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की पक्ष्याचे गाणे म्हणजे केवळ दोन ते सात स्वरांचा क्रम. स्वरक्रम एकापाठोपाठ असेल तर त्याची लय सुरळीत येते. लय सुरळीत असेल तर डोपामाईन उद्दिपित होते आणि सॉन्गबर्ड त्याला प्रतिसाद देते. गाण्यार्‍या पक्ष्याला गाण्यातील लय विरहित क्रम  ऐकवला तर त्याला तो प्रतिसाद देत नाही. कारण त्याच्या मेंदूतील तलीय गंडिका (Basal ganglion ) डोपामाईन स्त्रवण्याचे काम थांबते. गाणारा पक्षी  गाणे परीक्षण व त्रुटिवर मात करत (trial and error) शिकत असतो. शिक्षण सरावाने पूर्ण होते ही शिकण्याची  पहिली पायरी आहे.

विक्रम गदगकर यांनी मेंदूविषयक संशोधनात महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांना पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांना द ग्रबर फाऊंडेशनकडून दिला जातो. भौतिकशास्त्रातील विद्यार्थीही जीवशास्त्रात चांगले संशोधन करू शकतो याचे ते आदर्श आहेत.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा