गुस्ताव्ह, नोस्साल :  (४ जुलै १९३१ –     ) ऑस्ट्रियातील  बड आसची (Bad Ischl) येथे गुस्ताव्ह नोस्साल यांचा जन्म झाला. ज्यूंचा छळवाद आणि जर्मनीचे ऑस्ट्रियावरचे वाढते वर्चस्व यामुळे नोझल कुटूंबिय ऑस्ट्रेलियात आले. प्राथमिक शिक्षण संपवून गुस्ताव्ह सेंट अ‍ॅलॉयसिअस (St. Aloysius) कॉलेजमध्ये दाखल झाले. आश्चर्य म्हणजे, इंग्रजी येत नसतानाही, त्यांनी  पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांना डॉक्टर बनून आरोग्य विषयक संशोधन करत राहायचे होते. सिडनी मेडिकल कॉलेजमधून त्यांनी औषधनिर्माणशास्त्रातील (B.Sc. in Medicine)  पदवी मिळविली. तसेच त्यांनी बॅचलर इन सर्जरी (Bachelor in Surgery)  ही पदवी सुद्धा मिळविली. त्यानंतर त्यांनी काही काळ सिडनी येथील रॉयल प्रिन्स अल्फ्रेड हॉस्पिटलमध्ये काम केले.

त्यांनी वॉल्टर अ‍ॅन्ड एलिझा हॉल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मेलबोर्न येथून, सर मॅकफरलेन बर्नेट यांच्या मार्गदर्शनाखाली औषधनिर्माणशास्त्रातील पीएच्. डी ही पदवी संपादन केली. सर मॅकफरलेन बर्नेट यांच्या सेवानिवृत्तीनंतर गुस्ताव्ह यांची वॉल्टर अ‍ॅन्ड एलिझा हॉल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. सर मॅकफरलेन बर्नेट यांनी सुरू केलेले संशोधन त्यांनी पुढे नेले आणि रोगप्रतिक्षमताशास्त्रातील मूलभूत संशोधनाचा पाया रचला. शरीराच्या  नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमतेशी संबंधीत अनेक प्रक्रिया व घटकांवर त्यांनी संशोधन केले. रोगांपासून बचाव करण्यात महत्त्वपूर्ण प्रतिपिंड निर्मितीची प्रक्रिया (antibody production) सर्वप्रथम त्यांनी उलगडून दाखवली. रोगकारक प्रतिजन (antigen) आणि एका विशिष्ट प्रकारचे प्रतिपिंड हा नियम  त्यांच्या संशोधनातील शीर्षबिंदू ठरला. या नुसार, अस्थिमज्जेत (bone marrow) तयार होणारया बी-लसीकापेशी ( B-lymphocytes) परकीय प्रतिजनास प्रतिसाद म्हणून एका विशिष्ट प्रकारच्या प्रतिपिंडाची निर्मिती करतात. त्यामुळे रोगांपासून शरीराचा बचाव होण्यास मदत होते. या क्षेत्रातील हे मूलभूत संशोधन होते. त्यांचे संशोधन ५३० वैज्ञानिक लेख आणि ५ पुस्तकांतून प्रसिद्ध झाले आहे.

गुस्ताव्ह १९९६ साली सेवानिवृत्त झाले. मेलबोर्न विश्वविद्यालयात जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. याशिवाय पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूट, आंतरराष्ट्रीय युनियन ऑफ इम्युनॉलॉजिकल सोसायटी या संस्थांचे ते  अध्यक्ष होते.

त्यांनी १९९३ ते २००२ पर्यंत जागतिक आरोग्य परिषदेच्या जागतिक लसीकरण व प्रतिक्षमन समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या बालक लसीकरण मोहिमेच्या सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये ऑनर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा बहुमानाच्या पुरस्काराचा समावेश आहे.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा