प्रागैतिहासिक मानवाने रेखाटलेल्या चित्रांकृतींसाठी प्रसिद्ध असलेली स्पेनमधील एक गुहास्थळ. ते उत्तर स्पेनमधील कँटेब्रीअन प्रदेशात सँटिलाना दे मार येथे आहे. ही गुफा ३०० मीटर लांब आणि सुमारे ७ फुट उंच आहे. याचा मुख्य विषय तत्कालीन प्राणीजीवन असून यातील पहिली चित्रे उत्तर पुराश्मयुगीन कालखंडातील साधारणपणे ३६,००० वर्षांपूर्वीची असावीत, असे काही तज्ज्ञांचे मत आहे; तर काही तज्ज्ञांनी सुमारे १७,००० वर्षांपूर्वी अल्तामिरा येथे गुहाचित्रे काढले असावे, असे मत मांडले आहे. यावरून या प्रदेशातील तत्कालीन माणूस शारीरिक दृष्ट्या आधुनिक किंवा निअँडरथल मानव असावा आणि तो प्रगत अवस्थेत असावा, असे दिसते. उत्तर स्पेनच्या कँटेब्रिअन प्रदेशात अशा प्रकारच्या अनेक गुहा आढळतात.

अल्तामिरा येथील गुहेतील चित्रे अनेक रंगांत काढलेली आहेत; परंतु लाल व काळ्या या दोन रंगांवरच मुख्य भर आहे. कोळशाचा वापर करून ते पॉलिक्रोम पेंटिंग्ज या स्वरूपामध्ये चितारलेली आढळतात. यामध्ये बकरी, गेंडा, घोडा, हरिण व रानडुक्कर हे दमट जंगली हवेत राहणाऱ्या प्राण्यांच्या चित्रांबरोबर मानवी हाताच्या बोटांचेही (पंजांचे) यांत चित्र काढलेले आहेत. या चित्रांतील काही प्राणी सुमारे दोन मी. लांबीच्या पृष्ठभागावर रंगविलेले आहेत. आधी रेखांकन करून मग रंग भरून चित्रे पूर्ण केली असावीत, असे वाटते. अल्तामिराची कला अश्मयुगातील मग्डेलेनिअन संस्कृतीशी संलग्न आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, ही गुहा इ. स. १८६८ मध्ये मोदेस्तो क्युबिलास यांनी प्रकाशात आणली; तर काही तज्ज्ञांच्या मते, ही चित्रे १८७९ मध्ये दॉन मार्सिलीनो यांनी उजेडात आणली. ही चित्रे अश्मयुगीनच आहेत, हा निर्णय १९०२ मध्ये झाला. अल्तामिरा गुहाला युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

संदर्भ :

  • Altamira, Rafael Trans. Lee, Muna, A History of Spain, New York, 1966.
  • Breuil, H. Hugo, O. Trans. Boyle, M. E., The Cave of Altamira at Santillana del Mar, Spain, New York, 1935.
  • C. P. Kottak, Anthropology : The Exploration of Human Diversity, 2000.

समीक्षक : शौनक कुलकर्णी