मलेशियातील तेरा राज्यांपैकी एक राज्य आणि एक  ऐतिहासिक प्रदेश. या राज्याने बोर्निओ बेटाचा वायव्य भाग व्यापला आहे. सारावाकच्या वायव्येस दक्षिण चिनी समुद्र, उत्तरेस ब्रूनाई देश व मलेशियाचे साबा राज्य, पूर्वेस व दक्षिणेस इंडोनेशियाचा बोर्निओ (कालीमांतान) हे प्रदेश आहेत. सारावाकचे क्षेत्रफळ १,२४,४४९ चौ. किमी. व लोकसंख्या २८,१०,००० (२०१९) आहे. येथील लोकासंख्येची घनता दर चौ. किमी.स २० व्यक्ती इतकी कमी आहे. कूचिंग (लोकसंख्या ५,७०,४०७ – २०१९) हे राजधानीचे ठिकाण, तसेच राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. दक्षिण चिनी समुद्रकिनाऱ्यालगतचा मैदानी प्रदेश दलदलयुक्त आहे, तर अंतर्गत प्रदेश पर्वतीय आहे. पर्वतीय प्रदेशाची उंची ३०० मी. पासून १,२०० मी. पर्यंत आढळते. मौंट मुरुड (उंची २,४२३ मी.) हे सारावाकमधील सर्वोच्च शिखर आहे. समुद्रकिनारा बराच दंतूर आहे. विषुववृत्तीय स्थान व विषुववृत्तीय हवामान यांमुळे राज्याचा बराचसा भाग विषुववृत्तीय वर्षारण्यांनी व्यापलेला आहे. येथील वनस्पती व प्राणिजीवन समृद्ध आहे. आठ जातीचे धनेश (होर्नबिल) पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. अंतर्गत प्रदेशात पर्वतश्रेण्या व नौकानयनयोग्य नद्या यांनी एकमेकांना छेदलेले दिसते. राजांग ही येथील सर्वांत लांब नदी असून तिच्या बालुई या उपनदीवर बांधण्यात आलेले बाकून धरण हे आग्न्येय आशियातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे.

कूचिंग शहर

पंधराव्या शतकात जावाच्या मजपहित राजसत्तेचा अस्त झाला, तेव्हा सारावाक हा ब्रूनाई सुलतानशाहीचा दक्षिण प्रांत बनला. १८३९ मध्ये ब्रिटिश साहसवीर व ईस्ट इंडिया कंपनीचा माजी लष्करी अधिकारी जेम्स ब्रुक यांनी या प्रदेशाला भेट दिली. त्यांनी येथील ब्रूनाईविरुद्धचे बंड मोडून काढण्यासाठी ब्रूनाईच्या राजाला मदत केली. या मदतीच्या बदल्यात ब्रुक यांना सारावाकमधील १८,००० चौ. किमी. क्षेत्रफळाची जमीन, तसेच १८४१ मध्ये त्यांना सारावाकचा राजा हा किताब बहाल करण्यात आला. ब्रुक यांनी येथील चाचेगिरी व शिरशिकारीला (हेड हंटिंग) आळा घालण्याचा प्रयत्न केला. सारावाकला स्वतंत्र राज्य म्हणून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी १८५० मध्ये, तर ग्रेट ब्रिटनने १८६४ मध्ये मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धापर्यंत सारावाकची अनिर्बंध सत्ता वंशपरंपरेने ब्रुक कुटुंबाकडेच होती. ब्रुक यांनी हळूहळू नवीन प्रदेश जोडून किंवा खरेदी करून १९०५ पर्यंत सारावाकचा विस्तार बऱ्यापैकी वाढविला. १८६८ मध्ये ब्रुक यांचे निधन झाल्यानंतर चार्ल्स अँथनी ब्रुक (कार. १८६८ – १९१७) या त्यांच्या पुतण्याला राजेपद मिळाले. त्यांनी १९१७ पर्यंत कारभार पाहिला. त्यानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स व्हायनर ब्रुक गादीवर आले. त्यांनी सारावाकमध्ये लोकसत्ताक स्वयंशासन स्थापन करण्यासाठी संविधान तयार करून स्वतःचे राजकीय हक्क सोडले (१९४१); परंतु त्यांचा हा प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात (१९४२ – १९४५) जपानने सारावाक पादाक्रांत केल्यामुळे असफल झाला व संविधान निलंबित झाले. दुसऱ्या महायुद्धात हा प्रदेश उध्वस्त झाला. १९४६ मध्ये हा प्रदेश ब्रिटिश सत्तेखाली आला. १९६३ मध्ये स्वयंशासनाचा अधिकार प्राप्त होऊन सारावाक मलेशियाला जोडण्यात आला.

सारावाकची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. किनाऱ्यावर रबर, मिरी, सागो ही प्रमुख नगदी उत्पादने घेतली जातात. अंतर्गत भागात निर्वाह आणि स्थलांतरित शेती केली

सीबू शहर

जाते. तांदूळ हे प्रमुख पीक आहे. येथे अरण्योद्योगही महत्त्वाचा आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खनिज तेल उत्पादने, लाकूड व रबर यांची निर्यात केली जाते. लाकूड चिरकाम, सागो, खोबरे व मिरीवरील प्रक्रिया हे प्रमुख उद्योग येथे चालतात. त्याशिवाय कापड, धातूची भांडी, साबण, कौले, लहान बोटी यांचीही निर्मिती केली जाते. येथे पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे.

सारावाकमध्ये प्रामुख्याने इबान, चिनी, मलायी, बिदायूह, मेलानाऊ व ओरँग उलू या सहा वंशाचे लोक आढळतात. त्यांमध्ये ४३% इबान, २४% मलायी, २४% चिनी आणि ६.७% मेलानाऊ आहेत. नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक चालते. सीबू हे सारावाकमधील प्रमुख बंदर आहे.

 

समीक्षक : ना. स. गाडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.