वूशिएन, सूचाऊ. चीनच्या पूर्वमध्य भागातील जिआंगसू (किआंगसू) प्रांतातील एक प्रसिद्ध प्राचीन शहर. लोकसंख्या ७०,७०,००० (२०२० अंदाज). ताई जो सरोवराच्या पूर्व किनाऱ्याजवळ, ग्रँड कालव्याच्या काठावर अगदी मोक्याच्या ठिकाणी हे शहर वसले आहे. शांघायच्या पश्चिमेस ८० किमी.वर यांगत्सी नदीच्या सखल त्रिभुज प्रदेशात हे शहर स्थित असून यांगत्सीचा मुख्य प्रवाह याच्या उत्तरेस ३२ किमी.वर आहे. शहराभोवती सहा प्रवेशद्वारे असलेली १९ किमी. लांबीची आयताकृती तटबंदी (इ. स. १६६२) व खंदक आहे.
इसवी सन पूर्व पाचव्या शतकात वू राजाची ही राजधानी होती. त्यावरूनच या ठिकाणाला वूशिएन हे नाव पडले. इ. स. सहाव्या शतकातील स्वै राजवटीत याला सूजो (सूचाऊ) असे नाव देण्यात आले. ग्रँड कालव्याच्या निर्मितीपासून सूजोचे प्रशासकीय व व्यापारी महत्त्व अधिक वाढले. थांग वंशाच्या काळात (इ. स. ६१८ – ९०६) शहराचा विस्तार बराच वाढला. सुंग (इ. स. ९६० – १२७९) व युआन (इ. स. १२६० – १३६८) वंशाच्या काळातही शहराचा विकास चांगल्या प्रकारे होत राहिला. तेराव्या शतकात मार्को पोलो या प्रवाशाने सूजोला भेट दिली होती. त्यांनी या शहराच्या वैभवाविषयी वर्णन केलेले आहे. चौदाव्या शतकातील मिंग राजवटीत शहराचा काही भाग उद्ध्वस्त झाला. खांग स्यी सम्राटाच्या कारकीर्दीत त्याची पुनर्रचना करण्यात आली (१६६२). ताइपिंग बंडाच्या काळात इ. स. १८५३ मध्ये शहराच्या अधिकांश भागाचा विनाश झाला; परंतु अल्पावधीतच त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मिंग (इ. स. १३६८ – १६४४) घराण्याच्या कारकीर्दीत आणि च्यिंग (इ. स. १६४४ – १९११/१२) वंशाच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात सूजो उत्कर्षाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले होते. सुंग नदी व सूजो खाडीमुळे थेट समुद्रापर्यंत या शहराला सरळ मार्ग उपलब्ध झाला आहे. १८९६ मध्ये चीन व जपान यांच्यात झालेल्या एका तहान्वये विदेशी व्यापारासाठी हे बंदर खुले करण्यात आले; परंतु त्याचा विशेष लाभ होऊ शकला नाही. यांगत्सी नदीच्या त्रिभुज प्रदेशात होत गेलेले गाळाचे संचयन आणि जलसिंचन व समुद्र हटवून जमीन तयार करण्याची कामे कार्यान्वित झाल्यामुळे या वाहतूक मार्गात अडथळे निर्माण झाले. तसेच सूजोच्या व्यापारी वर्चस्वाला जवळच्या शांघाय शहरामुळे फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले. दुसऱ्या महायुद्धकाळात (इ. स. १९३९ – १९४५) हे जपानी सैन्याने काबीज केले होते. १९४५ पर्यंत जपानचा त्यावर ताबा होता. येथे अनेक लढाया लढल्या गेल्या. त्यांपैकी ६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर १९४८ यांदरम्यान येथे झालेली लढाई सर्वांत अलीकडची आहे. युद्धामुळे कम्युनिस्टांसाठी नानकिंगकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला. १९४९ मध्ये सूजोचा ताबा कम्युनिस्ट राजवटीकडे देण्यात आला.
शहराचा परिसर शेतीच्या दृष्टीने समृद्ध असून त्यात भात, कापूस, गहू, चहा, भाजीपाला, द्विदल धान्ये, तुती ही उत्पादने घेतली जातात. तुतीच्या झाडांवर रेशीम किडे पोसून रेशीम उत्पादन केले जाते. सुंग राजवटीपासूनच रेशीम उत्पादन, रेशीम कापडनिर्मिती व भरतकाम हे उद्योग प्रसिद्ध असून आजही त्याचे हे महत्त्व कायम आहे. कापडनिर्मिती, कशीदाकाम व अन्नप्रक्रियेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. त्याशिवाय लोह व पोलाद, प्लास्टिक, रसायने, तंबाखुप्रक्रिया, खते, कृषी अवजारे, विविध ग्राहकोपयोगी वस्तू, शिलाई मशीन, कागद, काच, यंत्रसामग्री, रेडिओ, दूरचित्रवाणी संच व मोटार निर्मितीचे कारखाने येथे आहेत. शहराच्या जवळपास कोळसा व लोहखनिजाच्या खाणी आहेत. पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जाणाऱ्या प्रमुख लोहमार्गांवरील हे प्रमुख स्थानक आहे. सूजो शहर शांघाय व नानजिंग या शहरांशी जोडणारा पहिला लोहमार्ग इ. स. १९०८ मध्ये सुरू झाला. शहर चारीही बाजूंनी कालव्यांनी वेढलेले असून शहरातील काही कालवे बुजवून त्यांचे रस्त्यांत रूपांतर केले आहे. व्यापार, आर्थिक उलाढाली व बँक व्यवसायाचे हे प्रमुख केंद्र आहे. अनेक महामार्गही येथून जातात. शहरातील अनेक प्राचीन पूल संगमरवरी किंवा कोरीव दगडातील आहेत. येथील लहान लहान तलावांभोवती मोठमोठ्या बागांची निर्मिती करण्यात आली आहे. नैसर्गिक सृष्टिसौंदर्यासाठीही सूजो प्रसिद्ध आहे. सरोवरे, कालवे व त्यांवरील कमानीयुक्त कलात्मक पूल, अनेक सुंदर उद्याने, पॅगोडे, राजवाडे, मंदिरे, ताईजो सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावरील निसर्गरम्य टेकड्या, चीनमधील सर्वाधिक उंचीचा मानला जाणारा (८० मी.) नऊ मजली भव्य पॅगोडा (इ. स. ११३१) ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. येथील अभिजात युगातील उद्यानांचा समावेश जागतिक वारसास्थळांत करण्यात आलेला आहे (१९९७ व २०००). आधुनिक तांत्रिक शिक्षणासाठीही सूजो ख्यातनाम आहे. सूजो विद्यापीठ, सूजो ललितकला विद्यालय, सदर्न किआंगसू तंत्रशिक्षण संस्था, रेशीम उत्पादन व भरतकामविषयक संस्था येथे स्थापन झाल्या आहेत. १९७८ मध्ये येथे ‘चायनीज गार्डन सोसायटी’ची स्थापना झाली आहे.
समीक्षक : ना. स. गाडे