एक सामाजिक परंपरा किंवा रुढी. यास व्याजप्रसूती, प्रसव सहचर, सहकष्टी असेही म्हणतात. मॅलिनोस्की यांच्या मते, सहप्रसविता ही चाल म्हणजे वैवाहिक जीवनास द्रुढता आणणारे एक बंधन आहे. मातृसत्ताक पद्धतीत एखाद्या पुरुषाचे पितृत्त्व सिद्ध करण्यासाठी ही पद्धत रुढ झाली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे; कारण या पद्धतीत पुरुषाला स्त्रीच्या गरोदरपणात आणि प्रसुतीच्या काळात स्त्रीबरोबर राहून तिच्या यातना पाहाव्या लागतात. या काळात नवऱ्याला स्त्रीबरोबर अंथरुणात राहावे लागते. घराबाहेर, गावाबाहेर पडण्यास त्याला परवानगी नसते. स्त्रीच्या वेदनांशी समरस होण्यासाठी ही पद्धत अस्तीत्त्वात आली असावी. या परंपरेचे प्रमाण एकूणच कमी असून पितृसत्ताक पद्धतीत ही चाल जवळजवळ ऱ्हास पावल्याचे दिसून येते.
खासी, तोडा तसेच भारताबाहेरही काही जमातीत ही परंपरा असल्याची नोंद आहे. या काळात नवऱ्यावर काही विधीनिषेधदर्शक बंधनेही असतात. खासी जमातीतील पुरुषाला आपल्या पत्नीप्रमाणेच जोपर्यंत अपत्य जन्माशी संबधित देवतांची शांती किंवा पुजा केली जात नाही, तोपर्यंत कपडे धुता येत नाहीत. या चालीची मिमांसा वेगवेगळ्या रीतीने केलेली आहे. या पद्धतीत मातृ-पितृसत्ताक पद्धतीमधील स्थित्यंतराचा अवशेष दिसून येतो. पितृसत्ताक पद्धतीत पित्याला असे वागण्याचे कारण नसते. येथे पित्याविषयी संशयास जागा नसते; मात्र मातृसत्ताक पद्धतीत पितृत्त्व नक्की करण्यासाठी काही सांकेतिक पद्धती हव्या असतात.
संदर्भ : मेहेंदळे, य. श्री., मानवशास्त्र (सामाजिक व सांस्कृतिक), पुणे, १९६९.
समीक्षक : म. बा. मांडके