शृंगी घुबड या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) गणाच्या स्ट्रायजिडी (Strigidae) कुलामध्ये होतो. हा पक्षी मूळचा पश्चिम बंगालमधील असून हिमालयापासून संपूर्ण भारत, पाकिस्तान, काश्मीर, नेपाळ, म्यानमार येथे आढळतो. प्रामुख्याने डोंगरांच्या कडेकपारी, निर्जन झाडे, ढासळलेली बुरूजे, भग्न ठिकाणे, निर्मनुष्य ठिकाणे, घनदाट जंगलांतील वृक्षांच्या ढोल्या व स्मशानांसारख्या कमी वर्दळीच्या ठिकाणी तो आढळतो. त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूस पिसांचे दोन झुपके असतात. ते शिंगांसारखे दिसत असल्यामुळे त्याला शृंगी घुबड असे म्हणतात.
शृंगी घुबडाला इंग्रजीमध्ये रॉक ईगल आउल् (Rock Eagle Owl), इंडियन ईगल आउल् (Indian eagle-owl) व बेंगाल ईगल आउल् (Bengal Eagle Owl) असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बुबो बेंगालेन्सिस (Bubo bengalensis) असे आहे. ही बुबो बुबो (Bubo bubo) या प्रजातीची उपजाती असून तिच्यासारखीच दिसते.
शृंगी घुबड एकटा किंवा जोडीने पहावयास मिळतो. हे पक्षी समूहाने कधीच राहत नाहीत. याच्या शरीरावरील पिसे तपकिरी करड्या रंगाची असतात. गळा व मानेभोवती पांढरी पिसे असून त्यावर काळ्या रंगाचे लहान पट्टे असतात. शृंगी घुबडाची लांबी ५०-५६ सेंमी., उंची ४८-५६ सेंमी. आणि शेपटी १८५-२२७ मिमी. लांब असते. पंखविस्तार १३१-१८८ सेंमी. असतो. याचे वजन १,१००-२,००० ग्रॅ. असते. नर-मादी दिसायला सारखेच असून मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते.
याचे डोळे मोठे, गोलाकार, नारिंगी-पिवळसर किंवा नारिंगी-लाल असतात. डोळ्यांभोवती वाटोळ्या तबकडीसारखे वलय असते आणि त्याच्या काठावर काळ्या पिसांची झालर असते. मोठ्या डोळ्यांमुळे ते रात्रीसुद्धा पाहू शकतात. मात्र, जवळचे त्यांना धूसर दिसते. डोके वाजवीपेक्षा मोठे व मान आखूड असते. ते डोळे हलवू शकत नाहीत म्हणून आजूबाजूला पाहण्याकरिता आपले पूर्ण डोके हलवितात. पाय आखूड, मजबूत व पिसांनी झाकलेले असतात. बोटांवरील नख्या वाकड्या, तीक्ष्ण व बळकट असतात. अंगठ्याचा शेवटचा सांधा पिसेविरहित असतो. चोच हिरवट रंगाची व वाकडी असून तिच्या टोकाशी आकडी असते.
चेहऱ्यावरील वलयांच्या काठाच्या मागे कान असून ते आकार आणि आकारमानाने सारखे नसतात. त्यांची ऐकण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. कानांच्या ठिकाणी असलेली पिसे वेगवेगळ्या कोनातून ध्वनीलहरी ग्रहण करतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात उंदराची बारीक हालचाल देखील त्यास ऐकू येते. उंदराचे स्थान निश्चित करण्यासाठी या पिसांचा उत्तम उपयोग होतो. एकूण पिसामध्ये कोमल पिसांचे प्रमाण अधिक असते. उड्डाण करताना कोमल पिसांचा ध्वनि-शोषकासारखा उपयोग होतो. त्यामुळे घुबडाच्या पंजामध्ये सापडेपर्यंत उंदराला उडणाऱ्या घुबडाचा मागमूसही लागत नाही. तो रात्रीच्या वेळी घूऽघूऽऽ असा आवाज काढतो, त्याला घुबडाचा चित्कार असे म्हणतात.
शृंगी घुबड हा शिकारी पक्षी असून तो निशाचर आहे. तो लहान किडे, उंदीर, घुशी, सरपटणारे लहान प्राणी, बेडूक व लहान पक्षी यांवर आपली उपजिविका करतो. उंदीर व घुशी हे प्रमुख भक्ष्य असल्यामुळे तो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पक्षी आहे. शृंगी घुबड हा पर्यावरणाचा समतोल राखणारा तसेच पर्यावरणपूरक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे.
याचा विणीचा हंगाम फेब्रुवारी-एप्रिलमध्ये असतो. नर-मादी दोघे मिळून निरुपयोगी जुन्या इमारती, डोंगरांच्या कडेकपारी, झाडांच्या ढोल्या, निर्जन झाडे अशा ठिकाणी पालापाचोळा, काटक्या व चिंध्या यांचा वापर करून घरटे बांधतात. घरट्यात मादी ३-४ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. नर-मादी दोघे मिळून अंडी उबवितात. अंडी ३३-३५ दिवस उबविल्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. पिलांची काळजी देखील नर-मादी दोघे मिळून घेतात. पिलांची वाढ वेगाने होते. पिलू सु. सहा महिने पालकांवर अवलंबून असते. पिलू ३-४ वर्षांनी प्रजननक्षम होते.
शृंगी घुबडाचा आयु:काल १२-१५ वर्षांचा असतो.
पहा : घुबड, पिंगळा, पिसे.
संदर्भ :
- https://www.owlpages.com
- https://en.wikipedia.org/wiki/indianegle-owl