कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील या पसरणाऱ्या वेलीचे शास्त्रीय नाव आयपोमिया बायलोबा आहे. ती आयपोमिया पेस-कॅप्री या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी या महासागरांच्या समुद्रकिनारी मर्यादवेल वाढलेली आढळून येते. भारतात मरुभूमी व समुद्रकिनारी तसेच सुंदरबन (पश्चिम बंगाल), पिलानी (राजस्थान), अंदमान बेटे इ. ठिकाणी तसेच श्रीलंका येथेही ती आढळते. समुद्राच्या वालुकामय काठावर व पाण्याच्या बाहेर मर्यादवेल पसरलेली दिसते. समुद्रावरून येणारे खारे वारे तिला मानवतात. वाळूमध्ये लांब मुळे तिला घट्ट धरून ठेवतात.
मर्यादवेलीच्या खोडाच्या पेरांपासून आगंतुक मुळे येतात. खोड हिरवे व पसरणारे असून पेरावर येणारी पाने साधी, हिरवी, लांब देठाची, एकाआड एक आणि आपट्याच्या पानांप्रमाणे खोलवर विभागलेली असतात. पानांचा आकार बकऱ्याच्या खुरासारखा दिसत असल्यामुळे मर्यादवेलीला ‘गोट्स फूटʼ हे नाव पडले आहे. तिला वर्षभर फुले येतात. फुले मोठी, सहपत्री व जांभळी असून कधीकधी एकेकटी किंवा २-३च्या ससीमाक्ष फुलोऱ्यात येतात. निदलपुंज लहान असतो. दलपुंज संयुक्त व पाच दलांचा असतो. दलपुंज कळी अवस्थेत असताना गुंडाळलेला असतो. फुलात पाच पुंकेसर असून ते लांबीला कमीजास्त असतात. अंडाशय संयुक्त व ऊर्ध्वस्थ असून त्यात चार कप्पे आणि चार बीजांडे असतात. फळ बोंड प्रकारचे, लहान व गोल असून त्यात चार बिया असतात. बिया खाऱ्या पाण्यात टिकू शकतात. समुद्राच्या लाटांमार्फत त्यांचा प्रसार होतो.
मर्यादवेलीच्या पानांचा रस संधिवात व दाह कमी करण्यासाठी लावतात. पाने वाटून दुखऱ्या भागावर लावतात. मुळांमध्ये सॅपोनीन असते. खोडापासून निघालेली जाड आणि लांब मुळे वाळवंटी जमिनीत खोलवर गेली असल्यामुळे किनाऱ्यावरची वाळू वाहून जात नाही. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची धूप होत नाही.