प्राचीन काळापासून अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडत आहेत. शंखशिंपले या मृदुकाय प्राण्यांनीसुद्धा मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भूमिका बजावलेली आहे. प्राचीन शंखशिंपल्यांच्या अभ्यासाला प्रारंभ खूप आधीच म्हणजे सतराव्या शतकातच झाला होता. विशेषतः त्या काळी जगाच्या निरनिराळ्या भागांत शोधमोहिमा काढणाऱ्या कॅप्टन जेम्स कुक यांसारख्या धाडसी लोकांनी शंखशिंपल्यांच्या अवशेषांचे वर्णन केले होते. हे अवशेष मानवनिर्मित आहेत की नैसर्गिक आहेत, अशा प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयास त्यांनी केला होता. तथापि अलीकडच्या काळात पुरातत्त्वीय अभ्यासात शंखशिंपल्यांवरील संशोधनाचे महत्त्व वाढलेले आहे. पुरातत्त्वीय उत्खननांमधून मिळणाऱ्या शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्यांचे मानवी संस्कृतीमधील महत्त्व समजून घेण्याचे कार्य पुरातत्त्वीय मृदुकायकवची प्राणिविज्ञानात (Archaeomalacology) केले जाते. ही पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानाची तुलनेने एक नवीन उपशाखा आहे.
शंखशिंपल्यांमध्ये असणारे प्राणी अपृष्ठवंशी प्रकारचे म्हणजेच पाठीचा कणा नसणारे असून त्यांचा समावेश मॉलस्का अथवा मृदुकायकवची या संघामध्ये होतो. या प्राण्यांमध्ये शरीरात हाडे नसली तरी त्यांच्यावर बाहेरच्या बाजूस भक्कम कवच असते. हे कवच कॅल्शियम कार्बोनेटचे (CaCO3) बनलेले असते. अर्थातच त्यामुळे पुरातत्त्वीय निक्षेपात कवच (शंखशिंपले) टिकून राहू शकते. कवच निरनिराळ्या आकारांचे व रंगांचे असते. शंखांमध्ये हे कवच सलग व एकसंध असते, तर शिंपल्यांमध्ये त्याला झाकणांप्रमाणे भासणाऱ्या दोन झडपा (valves) असतात. पुरातत्त्वीय संशोधनामध्ये प्राचीन अवशेषांचा नेमका काळ ठरविणे याला महत्त्व असते. शंखशिंपल्यांच्या कवचात कॅल्शियम कार्बोनेट आणि कॉन्कोलीन हे प्रथिन असते. या प्रथिनामुळे शंखशिंपल्यांचा वापर किरणोत्सर्गी कार्बन कालमापनासाठी (रेडिओकार्बन कालमापन) करता येतो.
पुरातत्त्वीय स्थळांवर मिळणारे शंख आणि शिंपले बहुधा अर्धवट मोडलेल्या अवस्थेत असतात. अनेक ठिकाणी शंखशिंपल्यांपासून तयार केलेले मणी, बांगड्या, अवजारे आणि इतर वस्तू मिळतात. काही पुरातत्त्वीय स्थळांवर मात्र यामधील काही न मिळता अशा वस्तू तयार करताना खाली पडलेला निरुपयोगी कचरा प्राप्त होतो. या सर्व पुराव्यांचा अभ्यास पुरातत्त्वीय मृदुकायकवची प्राणिविज्ञानात केला जातो. प्राचीन वसाहतींच्या ठिकाणी मिळणाऱ्या शंखशिंपल्यांचा आणि त्यांच्यापासून बनविलेल्या निरनिराळ्या वस्तूंचा अभ्यास केल्याने पुरातत्त्वीय निष्कर्षामध्ये मोलाची भर पडते.
शंखशिंपल्यांचे अनेक उपयोग आहेत. शंखशिंपल्यांचा अन्न म्हणून वापर केला जाण्याचे सर्वांत प्राचीन पुरावे मध्यपुराणाश्मयुगातील आहेत. शंखशिंपल्यांच्या अनेक जातींचा आजही अन्न म्हणून उपयोग केला जातो. त्यांच्यापासून बनविलेले पदार्थ चविष्ट असल्याने काही देशांमध्ये त्यांना विशेष मागणी असते. शंखशिंपल्यांमध्ये असणारा मऊ भाग म्हणजे कालव-मासा खाण्यासाठी उपयुक्त असतो. एका शंखात अथवा एका शिंपल्यात मिळणारे मांस जरी कमी असले, तरी शेकडो शंखशिंपले उघडून बऱ्यापैकी मांस मिळू शकते. अर्थातच पूर्णपणे या मांसावर जगणे शक्य नसले, तरी त्याचा पूरक अन्न म्हणून चांगला उपयोग होतो. कालवांमध्ये आयोडीन व थायामिन हे ॲमिनो अम्ल असल्याने आहारात त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते. सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक जमातींमधील लोक नदीनाले, तलाव व समुद्रातील शंखशिंपले गोळा करतात. बहुतेक ठिकाणी स्त्रिया व लहान मुले शंखशिंपले गोळा करून आणतात. काही वेळा तेथल्या तेथे भूक भागविण्यासाठी शंखशिंपले भाजून अथवा उकडून खाल्ले जातात. अडचणीच्या काळात विशेषतः काही कारणाने कमी शिकार मिळत असेल अथवा कमी पीक आले असेल, तर अशा मांसावर काही काळ गुजराण करणे शक्य असते. गोड्या पाण्याची तळी, नद्या, ओढे, समुद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या गाळाचा भाग, तसेच अधिक खोलीवरील शंखशिंपल्यांचाही वापर केला जातो. गुजरातमधील कुंतासी व शिकारपूर या सिंधू संस्कृतीच्या पुरातत्त्वीय स्थळांमध्ये शंखशिंपल्यांच्या एकूण बारा जातींचा अन्न म्हणून वापर केला जात होता.
शेकडो प्रकारचे शंखशिंपले अलंकार, शोभेच्या वस्तू तसेच चुना तयार करण्यासाठी सगळ्या जगभर वापरले जातात. काही विशिष्ट प्रकारचे शंख धार्मिक विधींमध्ये वापरले जात असल्याने त्यांना चांगली मागणी असते. पूजेच्या शंखाच्या जातीला प्राणिविज्ञानाच्या परिभाषेत टर्बिनेला पायरम (Turbinella pyrum) असे नाव आहे. बंगालमधील संस्कृतीत तर या शंखाला फार महत्त्वाचे स्थान आहे. बंगालमध्ये विवाहित हिंदू स्त्रिया शंखांपासून तयार केलेल्या बांगड्या वापरतात. या बांगड्या फक्त पतिनिधनानंतरच काढल्या जातात. शंखांच्या बांगड्यांचे हे महत्त्व ऐतिहासिक काळापासूनच असावे, असे दिसते. बंगालधील विष्णुपूर, बांकुरा व बरॅकपूर या ठिकाणी ‘शंखकारी’ या जातीचे लोक आजही परंपरागत पद्धतीने शंखांच्या बांगड्या बनविण्याचा व्यवसाय करतात. हे लोक त्यांना लागणारा कच्चा माल (म्हणजे शंख) तमिळनाडूतून आणतात. आज हा व्यवसाय मर्यादित झाला असला, तरी प्राचीन काळात तो भरभराटीस होता. कारण भारतात सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच शंखशिंपल्यांचे अलंकार व शोभेच्या अनेक वस्तू आढळतात. गुजरातमधील कुंतासी, शिकारपूर, नागेश्वर इत्यादी सिंधू संस्कृतीच्या पुरातत्त्वीय स्थळांमध्ये शंखांपासून बांगड्या तयार करण्याचा व्यवसाय चालत होता. टर्बिनेला पायरम, प्युगिलिना बुचिफेला (Pugilina buchephala) व चिकोरिस रामोसस (Chicoreus ramosus) या जातींच्या शंखांपासून बांगड्या तयार केल्या जातात.
शंखशिंपल्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील व्यापारी संबंधांचा मागोवा घेता येतो. विशेषतः समुद्रकिनाऱ्यापासून खूप दूर अंतरावर असणाऱ्या अनेक पुरातत्त्वीय स्थळांमध्ये सागरी शंखशिंपले आढळून आले आहेत. उदा., महाराष्ट्रात इनामगाव, वाळकी, कवठे ही ठिकाणे समुद्रकिनाऱ्यापासून किमान शंभर ते दोनशे किलोमीटर लांब आहेत. या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननात टर्बिनेला पायरम या जातीच्या शंखाचे व सिप्रिया अरेबिका (Cypraea arabica) या प्रकारच्या कवडीचे अवशेष मिळाले आहेत. तसेच मध्य प्रदेशातील चिखलदा या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील ताम्रपाषाणयुगीन ठिकाणी पुरातत्त्वीय सर्वेक्षणात कवडीचे अवशेष आढळले आहेत. शंखांच्या बांगड्या तयार करण्यासाठी टर्बिनेला पायरम या जातीचे सागरी शंख ताम्रपाषाणयुगीन रहिवाशांनी विकत किंवा कोणत्यातरी वस्तूच्या बदल्यात घेतले असावेत, असे दिसते.
शंखशिंपले प्राचीन काळातील पर्यावरणासंबंधी अत्यंत उपयुक्त माहिती देऊ शकतात, असे आढळले आहे. गोडे पाणी, नदीच्या मुखापाशी असलेले अर्धखारे पाणी आणि समुद्रातील खारे पाणी यांत जगणाऱ्या शंखशिंपल्यांच्या जाती निरनिराळ्या असतात. त्यांचा अभ्यास करून प्राचीन काळातील सागरी तापमान व समुद्रकिनाऱ्याची रेषा ठरविता येते.
पुरातत्त्वीय संशोधनामध्ये शंखशिंपल्यांचा उपयोग आणखी एका प्रकारे केला जातो. प्राचीन काळात एखाद्या ठिकाणी वसाहत कोणत्या ऋतूमध्ये झाली हे शोधणे महत्त्वाचे असते. शिंपल्यांची वाढ होताना त्याच्या कवचात सतत भर पडत असल्याने शिंपल्यांचा छेद घेतला तर त्यात वर्तुळाकार वृद्धिरेषा दिसतात. या रेषा कोणत्या ऋतूमध्ये आणि किती जाडीच्या तयार होतात, याचा अभ्यास करण्यात येतो. पुरातत्त्वीय स्थळावर मिळालेल्या शिंपल्याचा छेद घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास अशा वृद्धिरेषा स्पष्ट दिसतात. ही पद्धत खूप खर्चिक व किचकट असली, तरी मिळणारी माहिती पुरातत्त्वीय संशोधनात फार महत्त्वाची ठरते. या पद्धतीचा वापर करून एखाद्या पुरातत्त्वीय स्थळावर वसाहत नेमकी कोणत्या ऋतूमध्ये झाली असावी, याचे अनुमान काढता येते.
संदर्भ :
- Bar-Yosef Mayer, D. E. Ed., Archaeomalacology : Molluscs in Former Environments of Human Behaviour, Oxford, 2005.
- Joglekar, P. P. ‘Humans and Animals : Archaeozoological Approachʼ, Gayatri Sahiyta, Pune, 2015.
- जोगळेकर, प्रमोद; थॉमस, पी. के. ‘पुरातत्त्वीय प्राणिशास्त्र : एक उपयुक्त ज्ञानशाखाʼ, संशोधक, ६२(२) : २७-३३, १९९३.
- जोगळेकर, प्रमोद; देशपांडे, आरती ‘पुरातत्त्वीय संशोधनात शंखशिंपल्यांचे महत्त्वʼ, संशोधक ६२(२) : ३९-४८, १९९७.
समीक्षक : सुषमा देव