मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वाने मानवविद्येच्या कक्षेतून बाहेर पडून एखाद्या वैज्ञानिक ज्ञानशाखेचे रूप धारण करण्याची सुरुवात गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये झाली. अमेरिका व यूरोपमध्ये १९५०–७० दरम्यान, तर भारतात १९७०–८० पासून पुरातत्त्वीय संशोधनासाठी निरनिराळ्या वैज्ञानिकांची मदत घेण्यास प्रारंभ झाला. सन १९६०–८० दरम्यान अस्तित्वात आलेल्या नवपुरातत्त्व आणि प्रक्रियावादी पुरातत्त्व या विचारधारांमुळे हळूहळू गेल्या तीस वर्षांमध्ये पुरातत्त्वात विज्ञानाचा वापर स्थिरावत गेला. इतकेच नाही, तर सामाजिक शास्त्रांमध्ये ज्ञान संपादण्याच्या पद्धतींवर विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील अनेक पर्यायी दृष्टिकोनांचा प्रभाव पडलेला आहे.

ऑक्सफर्ड येथे १९५८ मध्ये पुरातत्त्व आणि कलेच्या इतिहासासाठी स्थापन झालेली संशोधन प्रयोगशाळा; डॉन ब्रॅाथवेल आणि एरिक हिग्ज यांचा १९६३ मधील सायन्स इन आर्किऑलॉजी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि १९७५ मध्ये सुरू झालेले जर्नल ऑफ आर्किऑलॉजिकल सायन्स हे पुरातत्त्वाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचे नियतकालिक या तीन ठळक घटना पुरातत्त्वात विज्ञानाच्या वाढत्या भूमिकेच्या निदर्शक आहेत.

प्रारंभीच्या काळात प्रामुख्याने भूविज्ञान, भौतिकविज्ञान आणि जीवविज्ञान (प्राणिविज्ञान व वनस्पतिविज्ञान) यांचा उपयोग होत असला, तरी आता आधुनिक विज्ञानाच्या जवळजवळ सर्व शाखा व उपशाखा पुरातत्त्वात वापरल्या जातात. पुरातत्त्वीय संशोधनामध्ये अलीकडच्या काळात विज्ञानाच्या अशा शाखा उपयुक्त ठरू लागल्या आहेत की, अवघ्या दहा-वीस वर्षांपूर्वी त्यांची कोणी कल्पनाही करणे शक्य नव्हते. पुरातत्त्वीय अवशेषांचा अर्थ लावण्यासाठी निरनिराळ्या वैज्ञानिक तंत्रांचा वापर करणे अपरिहार्य आहे. उदा., प्राणी आणि वनस्पतींच्या अवशेषांचा अभ्यास केल्याशिवाय प्राचीन अन्नसंपादनपद्धतींवर भाष्य करता येत नाही. तौलनिक मार्गाने कालनिश्चिती करण्याला मर्यादा असल्याने रसायनविज्ञान व भौतिकविज्ञानातील तंत्रांचा आधार घेणे जरूर असते. प्राचीन काळातील वसाहती त्या काळी असणाऱ्या पर्यावरण आणि भूरूपांशी निगडित असल्याने भूवैज्ञानिक संकल्पनांचा उपयोग करावा लागतो.

पुरातत्त्व आणि विज्ञानाच्या सहयोगातून जैवपुरातत्त्वविज्ञान, पर्यावरणीय पुरातत्त्वविज्ञान, भूपुरातत्त्वविज्ञान, पुरातत्त्वीय विकृतिविज्ञान, पुरातत्त्वीय पोषणविज्ञान, पुरातत्त्वीय रसायनविज्ञान, पुरातत्त्वीय संगणनविज्ञान आणि जैवरेणवीय पुरातत्त्वविज्ञान अशा अनेक शाखा-उपशाखा विकसित झालेल्या असून त्या पुरातत्त्वीय संशोधनास मोलाचे योगदान देत आहेत. विज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक पुरातत्त्वीय संशोधनाचे स्वरूप आंतरविद्याशाखीय झाल्याने आता एकविसाव्या शतकात पुरातत्त्वीय संशोधनाचा आवाका खूप मोठा झालेला आहे.

पुरातत्त्वीय संशोधनाचे अनेक टप्पे असतात. पुरातत्त्वीय स्थळांचा शोध, अशा स्थळांचे सर्वेक्षण, त्या स्थळांचे प्रत्यक्ष उत्खनन, अवशेषांची पद्धतशीर व तपशीलवार नोंदणी, अवशेषांचे विश्लेषण, अवशेषांचे कालनिर्धारण, प्राचीन संस्कृतिविषयक अनुमाने, निष्कर्षांचे प्रकाशन आणि उत्खननानंतर पुरातत्त्वीय स्थळाचे संरक्षण-जतन या सर्व कामांमध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग होतो. याशिवाय पुरातत्त्वीय संशोधनातून मिळालेले ज्ञान लोकांपर्यंत जाण्यासाठी संगणनक्षेत्रातील प्रगती उपयोगी पडत असून आता आभासी पुरातत्त्वविज्ञान या संकल्पनेमुळे सामान्य लोकांनाही पुरातत्त्वीय उत्खननाचा अनुभव घेणे शक्य झाले आहे.

इतिहास व पुरातत्त्वीय संशोधनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ घेणे आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर करणे, याला काहीजण ‘प्रतिष्ठा मिळविण्याचे प्रयत्नʼ असे म्हणत असले, तरी नवपुरातत्त्वविचारसरणीच्या आगमनानंतर आता पुरातत्त्वाचे मानवविद्या हे जुने स्वरूप बदलणे अपरिहार्य झाले आहे. जरी अनेकांना आवडले नाही, तरी पुरातत्त्वविज्ञान या नव्या स्वरूपात मानवी संस्कृतीचा शोध घेतला जात आहे. पुरातत्त्वातील विज्ञानाच्या वापराने नवनवीन माहिती हाती येत असल्याने मानवी इतिहासाबद्दलचे आपले ज्ञान सातत्याने वाढत आहे.

संदर्भ :

  • Brothwell, Don & Higgs, Eric Eds. Science in Archaeology, New York, 1963.
  • McGovern, P. E.  ‘Science in Archaeology : A Reviewʼ, American Journal of Archaeology, 1995.
  • Renfrew, C. & Bahn, P. G. Eds. Key Concepts in Archaeology, New York, 2004.
  • Renfrew, C. and Bahn, P. G. Archaeology, London, 2012.
  • जोगळेकर, प्रमोद; संपा. शिवदे, सदाशिव ‘उत्खननातून इतिहासाकडे नेणारे पुरातत्त्वविज्ञानʼ, संशोधन पत्रिका, इंदापूर, २०१४.

समीक्षक – सुषमा देव

प्रतिक्रिया व्यक्त करा