कृष्णमूर्ती, जे. : (११ मे १८९५ – १७ फेब्रुवारी १९८६). प्रख्यात भारतीय विचारवंत. आध्यात्मिक उन्नती ही गुरू, संस्था किंवा धर्म यांच्या मार्फत होत नसून आपल्या मनाचे सर्व व्यवहार तटस्थतेने पाहून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण या आधारांवर होऊ शकते, अशा तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली.

त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील मदनपल्ली (जि. चित्तूर) या गावात नारायणअय्या आणि संजिवाम्मा या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे आडनाव जिद्दू असून या दाम्पत्याला एकूण दहा मुले होती. त्यांपैकी कृष्णमूर्ती हे आठवे अपत्य. म्हणून त्यांचे नाव आवडीने कृष्ण असे ठेवले. डॉ. ॲनी बेझंट यांनी कृष्णमूर्ती व त्यांचा लहान भाऊ नित्यानंद (नित्या) यांचा प्रथमपासून सांभाळ केला. डॉ. ॲनी बेझंट व सी. डब्ल्यू. लेडबीटर यांना कृष्णमूर्तींमध्ये भावी काळातील मैत्रेय जगद्गुरूंच्या मीलनाची शक्यता जाणवली. डॉ. ॲनी बेझंट यांनी खासगी रीत्या नामांकित शिक्षकांकरवी इंग्लंडमध्ये कृष्णमूर्तींचे शिक्षण पूर्ण करून घेतले. त्या अनुषंगाने कृष्णमूर्तींच्या आध्यात्मिक कार्याकरिता व येऊ घातलेल्या जगद्गुरूंच्या आगमनाच्या तयारीसाठी १९११ मध्ये ‘पूर्वतारक संघ’ (द ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट) या संस्थेची आणि तिच्या हेराल्ड ऑफ द स्टार या मुखपत्राची स्थापना करण्यात आली. संघाच्या प्रमुखपदी कृष्णमूर्तींच्या नावाची घोषणा केली गेली. या संघाचे वार्षिक मेळावे भरत. तसेच जगद्गुरूंशी मीलन झाल्याची घोषणा होऊन कृष्णमूर्तींची स्वतंत्र विचारांची प्रवचने होत. त्यामुळे त्यांची कीर्ती जगभर झाली.

नंतरच्या काळात सु. १९२८ मध्ये कृष्णमूर्ती थिऑसफिकल वातावरणापासून दूर झाले. प्रत्येकाने स्वत:ची मुक्ती  स्वत: नव्याने शोधायची असते, कोणतीही संघटित धर्मसंस्था किंवा गुरू आपल्याला सत्याप्रत नेऊ शकत नाही; किंबहुना सत्याकडे जाणारा कोणताही मार्ग नाही, असे प्रतिपादन करत १९२९ च्या जाहीर प्रवचनात कृष्णमूर्तींनी या जागतिक स्वरूपाच्या संस्थेचे विसर्जन केले आणि अखेरपर्यंत त्यांनी जगभर प्रवास करून लोकांशी संपर्क व संवाद साधून मानवाच्या मूलभूत जाणिवांमध्ये (consciousness) बदल होणे कसे गरजेचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाचा किंवा धर्माचा पुरस्कार केला नाही; किंबहुना या गोष्टीच माणसाला माणसापासून कशा विभक्त करतात व त्यांतून कसा संघर्ष निर्माण होतो, याचेच सातत्याने त्यांनी विवेचन केले. दैनंदिन जीवनातील मानवीसमस्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच समाजातही कसा कलह निर्माण करतात व त्यामधूनच कशाप्रकारे हिंसा, स्पर्धा निर्माण होते आणि अंतर्गत सुरक्षा व आनंदाचा शोध यांची गरज मानवी जीवनात कशी निर्माण होते, याची त्यांनी मीमांसा केली. या सर्वांच्या पलीकडे जाण्यासाठी मानवी जीवनात असलेली सजग अवधानाची गरज त्यांनी सातत्याने प्रतिपादिली.

https://youtu.be/xXnbH6v7pWg

सत्य एक पथहीन भूमी (truth is pathless land) : कृष्णमूर्तींच्या मते, सत्य जाणून घेण्यासाठी किंवा सत्याप्रत येण्यासाठी कोणत्याही धर्मनियोजित मार्गाची किंवा संस्थेची वा गुरूची आवश्यकता नाही. ज्यानेत्याने ही उन्नती स्वत:च साध्य करावयाची असते. सत्याप्रत पोहचण्याचे विविध मार्ग पूर्वीपासून सांगितले जातात; परंतु सत्याप्रत जाण्याचा कोणताही मार्ग नाही, हेच सत्याचे खरे सौंदर्य आहे. कोणताही मार्ग हा केवळ देशकाळाशी संबंधित मृत वस्तुप्रत नेऊ शकतो; कारण ती वस्तू अवरुद्ध (static) स्वरूपाची असते. सत्य नेहमीच जिवंत व नूतन असते आणि हा जिवंतपणा आपण स्वत: आहोत. आपला राग, द्वेष, हिंसा, निराशा, क्रौर्य, दु:ख या सर्वांमध्ये आपण आहोत. या सर्वांचे समग्रतेने होणारे ज्ञान म्हणजेच सत्य होय. ते जाणून घेण्यासाठी तरल संवेदनशीलतेची व निरभ्र (विकल्परहित) सजगतेची गरज असते.

आपण ज्याला जीवन म्हणतो, त्यात आपल्या मनावर अनेक गोष्टींचे संस्कार होत असतात. त्यातूनच आपले साचेबद्ध, यांत्रिक व्यक्तिमत्त्व निर्माण होते किंवा आकार घेते. या व्यक्तिमत्त्वाला बर्‍याच चांगल्या, वाईट मानल्या जाणार्‍या विचारांची व आचारांची झालर लागलेली असते. या आचार-विचारांवरूनच समाजात आपली एक ओळख निर्माण होते आणि ती ओळख टिकविण्याचा किंवा अंशत: बदलण्याचा खटाटोप आपण जन्मभर करत असतो. या गोंधळात आपण नेमके कोण आहोत, कसे आहोत, आपले नेमके स्वरूप काय आहे, याचे भान आपल्याला राहात नाही. येथे ‘स्वरूप’ म्हणत असताना कोणतीही पारंपरिक आध्यात्मिक संकल्पना अभिप्रेत नसून मनोशारीरिक अस्तित्वाची समग्रतेने झालेली खरी ओळख म्हणजेच आत्मभान होय, हे अभिप्रेत आहे. तथापि हे आत्मभान येण्यासाठी मनाची जी तरलता, संवेदनशीलता व सजगता लागते ती आपण या साचेबद्ध व संस्कारबद्ध विचार करण्याच्या सवयीमुळे हरवून बसलेलो असतो. चांगले काय, वाईट काय याचे प्रशिक्षण आपल्या समाजाने आपल्याल्या दिलेले असतेच; शिवाय आपल्या शिक्षणातून, सामाजिक देवाण-घेवाणीतून हे संस्कार, विचार जास्तच प्रगाढ होऊ लागतात व आपण हळूहळू स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हरवून बसतो.

आपल्या बालपणापासून विचार करण्याची व प्रश्न विचारण्याची कुवत हळूहळू सभ्यतेच्या व शहाणपणाच्या जात्यात भरडली जाते. लहानपणापासूनच आपल्याला विचार कसा करावा यापेक्षा तो कशाचा करावा, हे शिकविले जाते. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा स्वतंत्र विचार करण्यापेक्षा चांगले आणि वाईट, योग्य-अयोग्य असा यांत्रिक पद्धतीने विचार करण्याची सवय आपल्याला लागते. शतकानुशतके थोरामोठ्यांनी व संतांनी प्रसृत केलेल्या ग्रंथांद्वारे जे ज्ञान प्राप्त होते, त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व हे दुय्यम दर्जाचे बनते आणि त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात अभिजात असे काहीही नसते; किंबहुना आपल्या स्व:बद्दलच्या कल्पनाही अशा संस्कारबद्ध विचारांतूनच निर्माण झालेल्या असतात. आपण स्वत:कडेही एका विशिष्ट चाकोरीतून किंवा चौकटीतून पाहण्यास सरावलेले असतो. त्यामुळे आपण स्वत:ला समग्रतेने जाणण्यास असमर्थ ठरतो.

आपल्या ‘स्व’ला जाणून घेण्यासाठी समाजसंबंधांशिवाय कोणताही पर्याय नाही. आपले समाजाशी असलेले संबंध, क्रिया, प्रतिक्रिया हे खर्‍या अर्थाने ‘स्व’ला जाणून घेण्यास उपकारक ठरतात. आपल्या प्रेमभावना, राग, द्वेष, मत्सर या भावभावनांची खरी ओळख आपल्याला या संबंधांतून होऊ शकते.

तत्त्वज्ञानविषयक मीमांसा : कोणत्याही व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती गुरूंमार्फत वा संस्था, धर्म यांमार्फत होत नसते, तर ती व्यक्तीने स्वत:च करून घ्यावयाची असते. त्यामुळे कृष्णमूर्तींनी परलोक, परमेश्वर, पुनर्जन्म, प्रकृति-पुरुष इत्यादी तात्त्विक वादग्रस्त विषय बाजूला सारून आपले इहलोकीचे जीवन समृद्ध कसे होईल, हाच विषय आपल्या आध्यात्मिक चिंतनाचा केंद्रबिंदू ठरविला. सांप्रतचे आपले सामाजिक जीवन कलह, द्वेष, मत्सर, युद्धे, परस्परांतील संघर्ष आदींनी भरलेले आहे. तसेच वैयक्तिक जीवनात काळजी, भीती, दु:खे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. याच्या मुळाशी मन-बुद्धी यांविषयीचे आपले अज्ञानच आहे. मन-बुद्धीची मुख्य वैगुण्ये पुढीलप्रमाणे होत : (१) मन हे पूर्वसंस्कारांनी बद्ध आहे. (२) आपण समस्यांची वर्णने, चिकित्सा, उपाययोजना इत्यादी करताना परिस्थितीला परस्परविरोधी मर्यादा घालतो. (३) मर्यादा, व्याख्या वगैरेंचा कर्ता ‘मी’ याला आपण अवास्तव महत्त्व देतो. (४) पूर्वानुभवावर विसंबल्याने नित्यनूतन वर्तमानाचा आपणास विसर पडतो. या सर्व प्रमादांवर-चुकांवर कृष्णमूर्तींच्या मते एकच उपाय आहे आणि तो म्हणजे, आपल्या मनाच्या सर्व व्यापाराकडे आपण स्तब्धतेने, त्यांना चांगले-वाईट न म्हणता अथवा त्यांबाबत कुठलीही अभिलाषा न बाळगता, निव्वळ पाहणे किंवा त्यांची अवधानपूर्वक संपूर्ण जाणीव बाळगणे (awareness) हा होय. यामुळे चुकांचे मिथ्यात्व उघड होऊन सत्याचा प्रादुर्भाव होतो. मन अधिक विचलित न झाल्यास प्रादुर्भूत सत्य दृढ होते. अशा प्रकारे स्तब्धतेने चुकांचे परिमार्जन-निरसन करणे, म्हणजे ध्यान होय. थोडक्यात, कृष्णमूर्तींचा प्रतिपादित मार्ग हा अध्यात्माचा किंवा तत्त्वमीमांसेचा नसून तो निखळ ज्ञानमीमांसात्मक योगमार्ग म्हणजे ‘समत्व’ योग आहे.

विकल्परहित जाणीव : विमुक्त, तरल संवेदनशील मनालाच ‘स्व’चा शोध लागू शकतो. ही तरलता प्राप्त करण्यासाठी मनाची सजगता प्रगल्भ असणे आवश्यक आहे. ही सजगता काही काळापुरती किंवा व्यायामासारखी विशिष्ट कालावधीत केलेला सराव नसून प्रत्येक क्षणाला आपल्या समग्र क्रिया-प्रतिक्रिया यांबद्दलची असलेली विकल्परहित जाणीव होय.

सर्वप्रथम आपल्या सभोवताली असलेल्या अस्तित्वाबद्दल जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. केवळ आपल्याला जे दिसते किंवा आपण जे पाहतो त्या वस्तूंचे वा बाह्य जगताचे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे समग्र जाणीव नसून आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या अनुषंगाने आपल्या ज्या वैचारिक प्रतिक्रिया घडतात त्यांचे भान ठेवणे, ही वरील जाणिवेच्या पातळीपेक्षा थोडी सखोल जाणीव म्हणता येईल.

विकल्परहित सजगता व एकाग्रता (concentration) यांमध्ये काही मूलभूत फरक आहे. एकाग्रता विकल्पात्मक असते, ज्यामध्ये आपण भोवतालचे सर्व विकल्प टाळण्याचा प्रयत्न करून एकाच एक विषयावर किंवा वस्तूवर आपले मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. ज्यामध्ये आपण आपल्या मनाला त्या वस्तूविषयी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. याउलट, विकल्परहित सजगतेमध्ये आपण घडणार्‍या घटनेबद्दल व त्या घटनेला दिल्या जाणार्‍या सर्व मनोशारीरिक क्रिया-प्रतिक्रियांबद्दल केवळ साक्षीभावाने जागृत असतो. येथे समजून घेण्यासारखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण घटनाक्रमात साक्षी आणि आपण ज्या घटनेबद्दल साक्षीभाव ठेवतो, ती घटनावस्तू या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच असतात.

ही विकल्परहित सजगता म्हणजे आपल्या सुप्त व जागरूक मनाची होणार्‍या प्रत्येक घडामोडीबद्दल असलेली ‘केवल’ जाणीव. ज्यामध्ये आपण आपल्या (मनोशारीरिक) क्रिया-प्रतिक्रियांबाबत, कारणीभूत असलेल्या संस्कारबद्धतेबाबत त्याला योग्य-अयोग्य, चूक-बरोबर अशा स्वरूपांत स्वीकार न करता केवळ त्याच्याबद्दल जागृत राहतो. आपण जेव्हा वास्तवाकडे कोणत्याही विचाराशिवाय पाहतो, तिथे निर्विकल्प सजगता किंवा केंद्ररहित अवधान असते, जिथे जाणलेल्या (गतकाळातील) घटना किंवा स्मृती कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करत नाहीत, जेणेकरून ते वास्तव जसे आहे तसे समग्रतेने जाणता येते.

जेव्हा या निरभ्र जाणिवेमुळे स्वत:च्या मर्यादांबाबत, संस्कारबद्धतेबाबत सजगता येते, तेव्हा खर्‍या अर्थाने या सर्व मर्यादा व संस्कारांपासून मन पूर्णपणे स्वतंत्र वा मुक्त होऊ शकते का? याबाबत चिकित्सा सुरू होते. या सजगतेमधूनच आपण स्वत:ला जसे आहोत तसे जाणण्यास सुरुवात होते.

नैसर्गिक सौंदर्य व निसर्गप्रेम हे कृष्णमूर्तींच्या चिंतनातून सहजपणे व अखंडपणे व्यक्त होते. परंतु मानवी समाज व नातेसंबंध या दोन गोष्टी निसर्ग सौंदर्यालाच बाधा आणतात. मानवी मनाचे व नातेसंबंधांतील हिंसेचे प्रक्षेपणच आपल्याला त्याच्या निसर्गाच्या संबंधातून जाणवते. कृष्णमूर्ती मानवी जीवनाचे चित्रण हे दु:खमय स्वरूपात करतात. हे दु:ख मानवानेच निर्माण केले आहे. ज्याचे प्रत्यंतर आपल्याला सामाजिक कलह, प्रतिस्पर्धा, हिंसाचार व अत्याचार या स्वरूपांत दैनंदिन स्वरूपात येते. मानवी जीवनातील सुखदु:ख व त्यातून संस्कारबद्ध झालेले जीवन, समाज व एकूणच जीवनदर्शन हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारे आहे, असे मानले जाते. धर्मसंस्था, गुरूपरंपरा व एकूणच सर्व परंपरा नाकारणे आणि कोणत्याही तात्त्विक चौकटी तत्त्वत: न स्वीकारणे या दोन प्रमुख कारणांमुळे कृष्णमूर्तींची विचारसरणी स्वीकारणे जड जाते; परंतु समाजाला एक वेगळी दिशा दाखविण्याची त्यांच्या विचारातील क्षमता महत्त्वाची ठरते.

विविध उपक्रम : कृष्णमूर्तींचे तत्त्वज्ञान हे केवळ आदर्शवत वाटणार्‍या विचारांचे स्वप्नरंजन न ठरता हे तत्त्वज्ञान वास्तवात उतरविण्यासाठी प्रयत्न म्हणून त्यांनी भारतात व इतरत्रही काही प्रयोगशील शाळांची स्थापना केली. भारतामध्ये चेन्नई, बेंगळुरू, वाराणशी अशा शहरांतून आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यांतून निसर्गरम्य परिसरात त्यांनी शाळा स्थापन केल्या. या शाळांमधून उत्कृष्ट ज्ञान संपादन करण्यास मुलांना मदत करणे तसेच त्यांच्यातील चांगले सुप्त गुण जोपासणे आणि सृजनशील विकासास वाव देणे, हे या शाळांचे प्रयोजन आहे. केवळ समाजव्यवस्था बदलण्यापेक्षा त्या व्यवस्थेला चालविणार्‍या माणसांची मने बदलणे, हे त्यांना महत्त्वाचे वाटते व त्यासाठीच शिक्षणव्यवस्थेतील अशा प्रकारच्या काही थोड्या शाळासुद्धा हा बदल घडविण्यास हातभार लावू शकतील, अशी त्यांची श्रद्धा आहे. तसेच कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेण्यासाठी त्यांच्या हयातीत ‘कृष्णमूर्ती फाउंडेशन’ (प्रतिष्ठान)ची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या विविध पुस्तकांचे, इतरांच्या भेटींत झालेल्या संभाषणांचे आणि पत्रव्यवहारांचे तसेच प्रवचनांच्या चित्रध्वनिमुद्रणांचे संग्रह करून वाचकांना व श्रोत्यांना त्याचा लाभ घडविणे हा हेतू आहे. आत्ताच्या घडीला या प्रतिष्ठानमध्ये ३०० चित्रध्वनिमुद्रणे व ४०० ध्वनिमुद्रणे उपलब्ध आहेत.

कृष्णमूर्तींचे कर्करोगामुळे ओजाइ, कॅलिफोर्निया (U. S. A.) येथे निधन झाले.

कृष्णमूर्तींची ग्रंथसंपदा : ॲट द फीट ऑफ द मास्टर (१९१०), फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम (१९५४), एज्युकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाइफ  (१९५५), कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग (तीन मालांत–१९५६, ५९, ६०), लाइफ अहेड (१९६३), धिस मॅटर ऑफ कल्चर  (१९६४), थिंक ऑन दीज थिंग्ज (१९६४), फ्रीडम फ्रॉम द नोन (१९६९), द ओन्ली रेव्हल्यूशन (१९७०), द अर्जन्सी ऑफ चेंज (१९७१), द फ्लाइट ऑफ ईगल (१९७१), यू आर द वर्ल्ड (१९७२), द इम्पॉसिबल क्वेश्चन (१९७२), द अवेकनिंग ऑफ इंटेलिजेंस (१९७३), कृष्णमूर्ती ऑन एज्युकेशन (१९७४), बिगिनिंग ऑफ लर्निंग (१९७५), कृष्णमूर्तीज नोटबुक (१९७६), ट्रूथ अँड ॲक्च्यूॲलिटी (१९७७), द व्होलनेस ऑफ लाइफ (१९७८), एक्स्प्लोरेशन इंटू इनसाइट (१९७९), क्वेश्चनिंग कृष्णमूर्ती (१९७९), कृष्णमूर्तीज जर्नल (१९८२), द नेटवर्क ऑफ थॉट (१९८२), द फ्लेम ऑफ अटेन्शन (१९८३), द एंडिंग ऑफ टाइम (१९८५), द वे ऑफ इंटेलिजेंस (१९८५), कृष्णमूर्ती टू हिमसेल्फ : हिज लास्ट जर्नल (१९८७), द मिरर ऑफ रिलेशनशिप : लव्ह, सेक्स अँड चॅस्टीटी (१९९१), ऑन लिव्हिंग अँड डाइंग (१९९२), ऑन लव्ह अँड लोनलीनेस (१९९३), फ्रीडम, लव्ह अँड ॲक्शन (१९९४), ऑन फियर (१९९४), द बुक ऑफ लाइफ (१९९५), टोटल फ्रीडम : द एसेन्शियल कृष्णमूर्ती (१९९६), रिफ्लेक्शन ऑन द सेल्फ (१९९७), द लिमिट्स ऑफ थॉट डिस्कशन (१९९८), धिस लाइट इन वनसेल्फ : ट्रू मेडिटेशन (१९९९), इनवार्ड रेव्हल्युशन : ब्रिंगिंग अबाउट रॅडिकल चेंज इन द वर्ल्ड (२००५), ॲज वन इज : टू फ्री द माइंड फ्रॉम ऑल कंडिशनिंग (२००७) इत्यादी.

संदर्भ :

  • Herder, Paul, Revolutionary Minds : The Educational Vision of J. Krushnamurti and Its Practice, Phoenix, 2010.
  • Jayakar, Pupul, J. Krushnamurti : A Biography, New Delhi, 1986.
  • Moody, David, The Unconditioned Mind, Chennai, 2011.
  • किशोर, कल्याणी (अनु.), जे. कृष्णमूर्ती : जीवन आणि मृत्यू, पुणे, १९९५.
  • कुलकर्णी, हेरंब, जे. कृष्णमूर्ती आणिकृष्णमूर्ती स्कूल्स, पुणे, २०१५.
  • जोशी, ग. ना. जे. कृष्णमूर्तींची जीवनदृष्टी, पुणे, १९९६.

समीक्षक – प्रदीप गोखले

This Post Has 2 Comments

  1. Rajesh Gajanan Vhanbatte

    Good introductory information

प्रतिक्रिया व्यक्त करा