चार्ल्स विल्यम एलियट : (२० मार्च १८३४–२२ ऑगस्ट १९२६). अमेरिकेतील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व थोर विचारवंत. त्यांचा जन्म बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे एका सामान्य कुटुंबात झाला. हार्व्हर्ड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानतंर तेथेच त्यांनी १८५४ ते १८५८ पर्यंत पाठनिर्देशकाचे काम केले. पुढे १८५८ मध्ये गणित व रसायनशास्त्र या विषयांत ते साहाय्यक प्राध्यापक झाले. १८६३ मध्ये ह्या पदाचा राजीनामा देऊन पुढील अभ्यासाकरिता दोन वर्षांसाठी ते यूरोपमध्ये गेले. त्यानंतर त्यांची मॅसॅचूसेट्सच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ ह्या संस्थेत वैश्लेषिक रसायनशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुन्हा ते काही दिवस यूरोपच्या दौऱ्यावर गेले. या वेळी त्यांनी यूरोपच्या एकूण शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला आणि तत्संबंधीचे आपले विचार अटलांटिक मंथली या नियतकालिकात द न्यू एज्युकेशन : इट्स ऑर्गनायझेशन ह्या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. त्यामुळे १८६९ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ते चाळीस वर्षे म्हणजे १९०९ पर्यंत तेथे होते. या काळात त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाच्या प्रशासनपद्धतीत, अभ्यासक्रमात व शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल केले; त्यामुळे त्यांची कीर्ती जगभर पसरली. शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत त्यांस ख्रिस्टोफर सी. लँग्डल ह्यांचे सहकार्य लाभले.
एलियट यांनी आपल्या वृत्तीनंतर उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालविले. नागरी सुधारणेचा ते पुरस्कर्ते होते, तसेच दारूबंदी व राष्ट्रसंघ ह्यांचासुद्धा ते समर्थक होते. कार्नेगी प्रतिष्ठानचा विश्वस्त व सामान्य शिक्षणमंडळाचा सदस्य ह्या नात्यानेही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
एलियट यांनी विविध विषयांवर लेखन केले. त्यांत शिक्षणास अधिक प्राधान्य होते. त्याची काही प्रमुख पुस्तके : ए कॉम्पेंडियस मॅन्युअल ऑफ क्वॉलिटेटिव्ह केमिकल अॅनॅलिसिस (सहलेखक – १८६९), द हॅपी लाइफ (१८९६), अमेरिकन काँट्रिब्युशन्स टू सिव्हिलायझेशन अँड अदर एसेज अँड अॅड्रेसिस (१८९७), एज्युकेशनल रिफॉर्म, एसेज अँड अॅड्रेसिस १८६९-१८९६ (१८९८), मोअर मनी फॉर द पब्लिक स्कूल्स (१९०३), युनिव्हर्सिटी अॅड्मिनिस्ट्रेशन (१९०६), द ड्युरेबल सॅटिस्फॅक्शन्स ऑफ लाइफ (१९१०), ए लेट हार्व्हेस्ट (१९२४), द कॉन्फ्लिक्ट बिट्विन इंडिव्हिज्युएलिझम अँड कलेक्टिव्हिझम इन ए डेमॉक्रसी. याशिवाय त्यांनी हार्व्हर्ड क्लासिक्स (१९०९-१९१०) या पन्नास खंडांच्या ग्रंथाचे संपादन केले. त्यांचे काही स्फुट लेख चार्ल्स विल्यम एलियट, द मॅन अँड हिज बिलिफ्स (१९२६) ह्या शीर्षकाखाली पुस्तकरूपाने डब्ल्यू. ए. नील्सन यांनी संपादित केले आहेत.
एलियट यांचे नॉर्थ ईस्ट हार्बर (मेन) या ठिकाणी वृद्धापकाळाने निधन झाले.
समीक्षक – संतोष गेडाम