ॲपोसायनेसी कुलातील अत्यंत काटक फुलझाड. भारतात ते नैसर्गिकपणे सर्वत्र वाढते. याच्या ७ प्रजाती आहेत. रोझिया, मेजर व मायनर या प्रजातींची प्रामुख्याने जगभर लागवड केली जाते. युरोपात रोझिया प्रजाती हरितगृहात लावतात, तर भारतात सर्व प्रजाती बागेत अथवा शेतामध्ये लावतात. या फुलझाडास भरपूर व वर्षभर फुले लागतात. झाड सदाहरित असून पाने गर्द हिरव्या रंगाची असतात. फुले गुलाबी, पांढरी व निळ्या रंगाची असतात. काही प्रजातींमध्ये फुलांच्या मध्यभागी गर्द लाल रंगाचा बिंदू असतो, त्यामुळे फुले जास्तच आकर्षक दिसतात. हे झाड हंगामी अथवा बहुवर्षायू पद्धतीने लावता येते. ताटवे (Bedding), किनारी (Borders) व कुंडीत लावण्यासाठी हे फुलझाड उत्तम आहे. कॅन्सरवर इलाज करण्यासाठी फुलातून अल्कलीयुक्त रसायन काढून औषधामध्ये उपयोग केला जातो.

भारतात वाढणाऱ्या प्रजाती उष्ण हवामानात चांगल्या वाढतात. वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. हिवाळा सोडल्यास वर्षभर लागवड करता येते. पावसाळ्याच्या सुरुवातीस व फेब्रुवारी – मार्च महिन्यात लागवड केली जाते. लागवडीसाठी रोपवाटिकेत रोप तयार करावी. बियाणे लहान असल्यामुळे पेरताना खोलवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी चाळलेली माती व शेणखत समप्रमाणात घेऊन ट्रे किंवा लाकडी खोक्यात बियाणे पेरावीत. माध्यमासाठी कोको पिटचा वापर करता येतो. एक – दीड महिन्यात रोपे तयार होतात. बऱ्याच वेळा पावसाळ्यात झाडाखाली भरपूर रोपे उगवतात अशा रोपांचा वापर करावा. छाटापासून रोपे तयार करता येतात. लागवडीचे अंतर ३० – ४५ सेमी. ठेवावे. हे फुलझाड सर्व प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते. सुरुवातीच्या काळात पाणी वेळोवेळी व गरजेनुसार द्यावे. रोपांची वाढ चांगली झाल्यास पुढे काटक झाड तयार होते व फुलांनी भरून जाते. सुंदर देखावा तयार करण्यासाठी व सुशोभीकरणासाठी हे फुलझाड उत्तम आहे. रोग किडींचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे तसेच प्राण्यांपासून धोका नसल्याने बागेसाठी हे योग्य फुलझाड आहे.

संदर्भ :

  • Encyclopedia of Garden Plants & Flowers, Readers Digest. Association London,1971.
  • Randhawa, J.S.; Mukhopadhy, A. Floriculture in India, 1985.

समीक्षक : प्रमोद रसाळ