दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) आढळून येणारे अंतर्द्रव्य जालिका हे एक पेशीअंगक (Cell organelle) आहे. परस्परांना जोडलेल्या अनेक सूक्ष्म पोकळ नलिका व पोकळ चकत्यांची चवड / कुंड (Cisterna) असे त्याचे स्वरूप असते. अंतर्द्रव्य जालिकेचे एक टोक पेशीकेंद्रक पटलाला (Nuclear membrane) चिकटलेले असते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वेगवेगळ्या रासायनिक रंगद्रव्यांनी (Stains) पेशी रंगवून पेशी अंगकांचा अभ्यास करताना अंतर्द्रव्य जालिकेचा शोध लागला. प्रारंभी याला गॅस्ट्रोप्लाजम (Gastroplasm) असे नाव दिले गेले. पेशीचे भाग रंगवून ते सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासणे यास ऊतीरसायनशास्त्र (Histochemistry) असे म्हणतात. १९४० मध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकच्या साहाय्याने याची रचना समजल्यानंतर त्यास अंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic reticulum) अशी संज्ञा दिली गेली. एन्डोप्लाजम म्हणजे पेशीतील द्रव आणि रेटिक्युलम म्हणजे सूक्ष्म जालिका होय.

अंतर्द्रव्य जालिका

अंतर्द्रव्य जालिकेचा काही भाग खडबडीत, तर काही भाग गुळगुळीत असतो. अंतर्द्रव्य जालिकेचा केंद्रक पटलाशी जोडलेला भाग प्रामुख्याने गुळगुळीत असतो. अधून मधून अंतर्द्रव्य जालिकेमध्ये रायबोसोममधून स्त्रवलेली द्रव्ये साठवण्यासाठी कुंडासारखी रचना (Cisterna) झालेली असते. अंतर्द्रव्य जालिकेच्या आतील पोकळीस अवकाशिका (Lumen) म्हणतात. अंतर्द्रव्य जालिका पेशीपटलापासून थेट केंद्रक आवरणापर्यंत पसरलेली असते. त्यामुळे अंतर्द्रव्य जालिका, अवकाशिका व केंद्रक पोकळी या एकाच पोकळीचा भाग आहेत.

गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेचे कार्य विस्तृत असून कर्बोदके व मेद स्त्रवणे हे त्यातील एक महत्त्वाचे कार्य आहे. फॉस्फोलिपीडे व कोलेस्टेरॉल यांसारखे पेशी आवरण निर्मितीतील आवश्यक घटक गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेमध्ये तयार होतात. पेशीत स्त्रवलेले घटक आवश्यक ठिकाणी नेण्यासाठी हे वाहकाचे काम करतात. यकृत पेशीत गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेमध्ये तयार झालेल्या विकरामुळे विषारी द्रव्यांचे निर्विषीकरण (Detoxification) होते. स्नायूपेशीतील गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका स्नायू आकुंचनासाठी कॅल्शियम आयने पुरवते. पीयूषिका ग्रंथी (Pituitary gland) पेशीतून पाझरलेली पुरुष व स्त्री संप्रेरके गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेमधून वाहून नेली जातात.

खडबडीत अंतर्द्रव्य जालिकेमध्ये पेशीअंगकांचे आवरण व प्रथिने तयार होतात. ही अंतर्द्रव्य जालिका त्यावरील रायबोसोममुळे खडबडीत दिसते. रायबोसोम प्रथिन संश्लेषणाचे प्रमुख अंगक आहे. काही पांढऱ्या पेशीतील खडबडीत अंतर्द्रव्य जालिकेमध्ये प्रतिपिंडे (Antibodies) तयार होतात. स्वादुपिंडातील बीटा पेशीतील अंतर्द्रव्य जालिकेमध्ये इन्शुलीन तयार होते. गुळगुळीत व खडबडीत अंतर्द्रव्य जालिका काही ठिकाणी परस्परास जोडलेल्या असतात. त्यामुळे खडबडीत अंतर्द्रव्य जालिकेत तयार झालेली पेशी आवरणे व प्रथिने गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकेमधून गॉल्जी यंत्रणेमध्ये (Golgi apparatus) खास वाहक पुटिकेमार्फत वाहून नेली जातात. गॉल्जी यंत्रणेत प्रथिनावर प्रक्रिया होते. या प्रथिनांचा वापर पेशीमध्ये होतो. ही प्रथिने आवश्यकतेनुसार बहि:सारण (Exocytosis) प्रक्रियेतून पेशीबाहेर पाठवली जातात. बहि:सारण प्रक्रिया म्हणजे पेशीआवरणामध्ये गुंडाळून एखादे विकर किंवा प्रथिन पुटिकांच्या स्वरूपात बाहेर पाठवणे .

सामान्यपणे स्त्रावीपेशीमध्ये अंतर्द्रव्य जालिकेची लांबी अधिक असते. त्यामुळे त्वचेमधील मेलॅनिन पेशी, जठरातील विकर बनवणाऱ्या पेशी, पुरस्थ ग्रंथी (Prostate gland) पेशी यात अंतर्द्रव्य जालिका सामान्य पेशीतील जालिकेपेक्षा अधिक लांबीच्या असतात.

पहा : पेशी अंगके.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/science/endoplasmic-reticulum
  • https://www.sciencedirect.com/topics/neuroscience/endoplasmic-reticulum
  • https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4700099/
  • https://www.thoughtco.com/endoplasmic-reticulum

समीक्षक : नीलिमा कुलकर्णी