मानवामध्ये त्वचा किंवा शरीराच्या इतर भागाचे तापमान हिमवर्षाव, हिमवादळ, अतिशीत पाण्याचा संपर्क यांमुळे अत्यंत कमी झाले तर हिमदंशाची लक्षणे आढळतात. हिमदंशाचे प्राथमिक लक्षण म्हणजे हिमदंश झालेला भाग बधिर होतो. यानंतर त्वचेचा रंग बदलून निळसर किंवा पांढरा होतो. हिमदंश झाल्याचे लक्षात आल्यावर तो भाग पुन्हा कोमट पाण्यात धरल्यास हिमदंश झालेल्या भागावर सूज येते किंवा फोड येतात. त्यामुळे हिमदंशावर तज्ञ व्यक्तीकडून शक्यतो रुग्णालयात उपचार करावेत. हिमदंश शक्यतो  हात, पाय आणि चेहरा या भागांस होतो.

आ. १ (अ) हिमदंश : तीव्रता व लक्षणे
आ. १ (ब) हिमदंश : तीव्रता व लक्षणे

अतिशीत ठिकाणी सतत काम करणारे सैन्य, बर्फाच्या वादळात दीर्घ काळ अडकलेल्या तसेच बर्फामध्ये खेळ खेळणाऱ्या व्यक्ती यांना हिमदंश होण्याची शक्यता अधिक असते. रक्तवाहिन्यातील रक्त गोठल्याने रक्तातील पाण्याचे हिमस्फटिक तयार होतात. हिमस्फटिकांमुळे पेशींना इजा पोहोचते. ऊती/पेशीमधील हिमस्फटिक वितळताना ऊतीनाश झाल्याने अधिक तीव्र परिणाम होतात. हिमदंश फक्त पृष्ठभागावर आहे की, त्वचेखाली खोलपर्यंत झाला आहे यावरून त्याचे उपचार ठरतात. हाडांच्या चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमेवरून (MRI) हिमदंशाची व्याप्ती समजते.

हिमदंश हा पेशीनाशाचा (Necrosis) टाळता न येणारा प्रकार आहे. तीव्रता व लक्षणे यांवरून हिमदंशाच्या पुढील चार अवस्था केल्या आहेत [आ. १ (अ) व (ब)].

आ. २ पायाच्या बोटांना झालेला हिमदंश : (अ) बारा दिवसांनंतर, (आ) एकवीस आठवड्यांनंतर.
आ. ३ हातांच्या बोटांना झालेला हिमदंश

(१) हिमदंशाच्या पहिल्या अवस्थेत केवळ त्वचेच्या पृष्ठभागास इजा झालेली असते. ही इजा तात्पुरती व कालांतराने बरी होते. या अवस्थेत त्वचा बधिर होते. कधीकधी त्वचेवर सूज येते. इजा झालेल्या त्वचेची कड तांबूस रंगाची होते. एक-दोन आठवड्यांत हिमदंशाची बाधा झालेली त्वचा खालील त्वचेपासून सुटते व त्याठिकाणी नवीन त्वचा येते.

(२) हिमदंशाच्या दुसऱ्या अवस्थेत त्वचेवर फोड येतात. या फोडामध्ये रंगहीन रक्तरस असतो. बाधित त्वचेचा पृष्ठभाग कडक होतो. काही आठवड्यांत फोड आलेली त्वचा कोरडी होऊन काळवंडते. नंतर ही त्वचा सुटून जाते. या अवस्थेत त्वचेस आलेला बधिरपणा समजतो.

(३) हिमदंशाच्या तिसऱ्या अवस्थेत त्वचेखालील ऊती गोठतात. फोडामध्ये रक्त साखळून निळसर तपकिरी द्रव जमा होतो. काही आठवड्यांनंतर वेदना होऊन फोड आलेल्या ठिकाणी खपली तयार होते. खपली धरलेल्या त्वचेखाली बरा न होणारा व्रण निर्माण होतो.

आ. ४ हातांच्या बोटांना झालेला अधिक तीव्रतेचा हिमदंश

(४) हिमदंशाच्या चवथ्या अवस्थेत त्वचेखालील स्नायू, स्नायू बंध आणि हाडे बाधित झालेली असतात. यामध्ये त्वचेचा रंग फिकट होणे, त्वचा कडक होणे व त्वचेवर गरम पाणी सोडले असता वेदना न होणे ही लक्षणे आढळून येतात. कालांतराने त्वचा काळी पडून मृत होते. हा परिणाम कायमचा आहे की नाही याचे निदान होण्यास साधारण एका महिन्याचा अवधी लागतो. दोन महिन्यांत कान, नाकाचा शेंडा, बोटे गळून जाणे असे परिणाम होतात. या अवस्थेतील हिमदंशानंतर जर बाधित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकला नाही, तर कोथ (Gangrene) होऊन जखमेतील विष शरीरात पसरून मृत्यू ओढवू शकतो.

आ. ५ हिमचित्त्याच्या पायाचा तळवा

हिमदंश होऊ नये म्हणून बर्फ असलेल्या भागात पाय कोरडे ठेवण्यासाठी उत्तम पादत्राणे व पायमोजे वापरावे, उघड्या पायांनी बर्फावर घसरणे किंवा बर्फातील खेळ खेळणे टाळावे. अपघाताने हिमवर्षावात सापडल्यावर त्वचेमधून उष्णता बाहेर जाणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी. बर्फाळ भागात ओले पायमोजे वापरणे टाळावे. कोरडे पायमोजे घालूनच चालावे. शरीराचे तापमान वाढवण्यासाठी शक्यतो मद्यपान केले जाते. परंतु, प्रत्यक्षात मद्यपानाने त्वचेलगतच्या रक्तवाहिन्या रुंद होतात व त्वचेतून अधिक उष्णतेचे विसरण होते. तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेलगतच्या रक्तवाहिन्या अरुंद झालेल्या असतात. त्यामुळे मद्यपान व धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हिमदंशाची लक्षणे अधिक तीव्र प्रमाणात व्यक्त झालेली दिसून येतात.

बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरावर दाट केस असतात. त्यामुळे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांना हिमदंश होत नाही. उदा., हिमचित्ता व ध्रुवीय अस्वल या प्राण्यांच्या पायांच्या तळव्यांवर सुद्धा केसाळ आवरण आणि जाड त्वचा असते. त्यामुळे बर्फावर सतत उभे राहून देखील त्यांच्या त्वचेतून उष्णता बाहेर पडत नाही. म्हणून त्यांना हिमदंश होण्याचा संभव राहत नाही.

पहा : पेशीनाश, पेशीमृत्यू.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/science/frostbite

समीक्षक : नीलिमा कुलकर्णी