शेलिंग, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन : (२७ जानेवारी १७७५—२० ऑगस्ट १८५४). विख्यात जर्मन तत्त्वज्ञ. जन्म जर्मनीतील लिऑनबर्ग येथे. त्याचे वडील ल्यूथरपंथीय धर्मगुरू होते. ट्यूबिंगन विद्यापीठात शिक्षण घेत असताना प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख हेगेल ह्याच्याशी शेलिंगची मैत्री झाली. १७९८ मध्ये येना विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून शेलिंगची नेमणूक झाली. १८०३ मध्ये त्याचा विवाह झाला. पुढे वुर्ट्‌सबर्ग, म्यूनिक, स्टटगार्ट, एरलांजन व शेवटी बर्लिन या विद्यापीठांतून शेलिंगने अध्यापन केले. सेवानिवृत्तीनंतर (१८४६) म्यूनिक येथे तो राहू लागला.

शेलिंगचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ असे : आयडियाज टोअर्ड अ फिलॉसॉफी ऑफ नेचर (१७९८), सिस्टिम ऑफ ट्रान्सेंडेंटल आयडिअलिझम (१८००), द फिलॉसॉफी ऑफ आर्ट (१८०२-०३, इं. भा. १८४५), फिलॉसॉफी अँड रिलिजन  (१८०४), फिलॉसॉफिकल इन्क्वायरीज इन्टू द नेचर ऑफ ह्यूमन फ्रीडम (१८०९, इं. भा. १९३६).

शेलिंगच्या तत्त्वज्ञानाचा विकास चार टप्प्यांमधून झालेला दिसतो : (१) नैतिक चिद्वाद, (२) निसर्ग-तत्त्वज्ञान, (३) एकात्मतेचे वा अव्दैताचे तत्त्वज्ञान, (४) भावपर तत्त्वज्ञान (Positive Philosophy). आरंभी योहान गोटलीप फिक्टे ह्याच्या नैतिक चिद्वादाचा प्रभाव शेलिंगवर होता; पण ह्या प्रभावातून तो लवकरच बाहेर पडला. आत्मा जितका सत्य आहे तितकाच निसर्गही सत्य आहे, असे त्याने मानले. शेलिंगच्या चिद्‌वादी तत्त्वज्ञानानुसार सर्व अंतर्बाह्य सृष्टी हा चैतन्याचाच आविष्कार आहे. त्यामुळे सृष्टीचे स्वरूप चैतन्यमय, गतिशील, विकसनशील, एकात्म, एकसंध, प्रयोजनबद्ध आहे हे मानवी बुद्धीस जाणता येईल. सृष्ट घटना या केवळ जड, यांत्रिक व नियमविरहित नाहीत. सृष्टीची बुद्धिगम्य रचना ही सृष्टीच्या गतिशील एकात्मतेची द्योतक आहे. निर्जीव व सजीव सृष्टीमध्ये दिसून येणारा भेद हा गुणात्मक नाही; कारण विविध आविष्कारांतून चैतन्यमय, अनंत सद्वस्तूच आत्मप्रकटन करीत असते.

मानव हा सृष्टीचाच एक अविभाज्य घटक आहे; त्यामुळे मानव व सृष्टी ह्यांच्यांत कोठेही मौलिक भेद नाही. एकाच एकजिनसी सद्‌वस्तूचे हे बुद्धिगम्य आविष्कार आहेत. अखिल विश्व हे जीवनकल्पनेच्या साहाय्याने अधिक स्पष्ट होण्याजोगे आहे. एकात्मता व प्रयोजनक्षमता ही जीवाची प्रधान लक्षणे आहेत व ती सर्व सृष्टिव्यापारांत प्रतीत होतात. सृष्टीप्रमाणेच मानवी जीवन आणि मानवी संस्कृती ह्यांची चिद्‌वादी दृष्टिकोणातून मीमांसा शेलिंगने केली आहे. मानवी इतिहासात ही अंतिम सद्‌वस्तूची आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया आहे, हा सिद्धांत स्वीकारून मानवी जीवनातील नीती, कला इ. क्षेत्रांतील अनुभवांची शेलिंगने मीमांसा केली आहे. स्थूल, यांत्रिक संवेदनांपासून सूक्ष्म, सर्जनशील साक्षात प्रतीतीपर्यंतचा मानवी अनुभवाचा प्रवास नीट रीतीने जाणून घेण्यासाठी कलात्मक अनुभूतीचे योग्य आकलन होणे जरूर आहे, हे दाखविण्यासाठी कलामीमांसा हेच तत्त्वचिंतनाचे खरे साधन आहे, हा विचार शेलिंगने आग्रहाने मांडलेला आहे. कलानिर्मितीच्या प्रक्रियेत सर्जनशीलता, स्वातंत्र्य, परिपूर्तीचे समाधान व रचनेचे सौंदर्य हा अंतिम सद्‌वस्तूचा सान्त आविष्कारच होय. अशा रीतीने कलामीमांसा हे तत्त्वज्ञानाचे अविभाज्य अंग आहे, हे शेलिंगने दाखवून दिले.

अंतिम सद्‌वस्तू ही केवळ आत्मलक्षी किंवा परलक्षी म्हणता येणार नाही. ती भेदशून्य व अव्दैतरूप आहे. शेलिंगची ही भूमिका आद्य शंकराचार्यांच्या अव्दैत वेदान्ताला जवळची आहे, असे म्हणता येईल. अव्दैत वेदान्तात जे प्रश्न उपस्थित होतात तशाच प्रकारचे प्रश्न शेलिंगच्या तत्त्वज्ञानातही निर्माण झालेले आहेत आणि सृष्टीची निर्मिती, तिचे नानात्व यांबद्दलचे समाधानकारक स्पष्टीकरण शेलिंगच्या तत्त्वज्ञानातही आढळत नाही.

आपल्या तत्त्वज्ञानविकासाच्या शेवटच्या टप्प्यावर शेलिंगने भावपर तत्त्वज्ञान मांडले. अभावपर तत्त्वज्ञान आणि भावपर तत्त्वज्ञान यांमध्ये शेलिंगने सूचविलेला भेद नमूद करण्याजोगा आहे. केवळ तर्कावर विसंबून परिकल्पनासृष्टी निर्माण करून सद्वस्तूचे साररूप चित्र अभावपर तत्त्वज्ञानात रंगविले जाते. भावपर तत्त्वज्ञान सद्वस्तूच्या तर्ककल्पनेत गुरफटून न राहता तिच्या अस्तित्वाविषयी श्रद्धायुक्त शुभसंकल्प मनात प्रवृत्त करते.

या संकल्पामुळे सद्‌वस्तू केवळ निर्गुण, निराकार न राहता ती प्रगाढ अध्यात्मानुभूतीत सगुण, साकार होते. तत्त्वज्ञानाचे प्रमुख कार्य जगाच्या अस्तित्वाचा प्रश्न सोडविणे हे आहे, असेही त्याने ह्या टप्प्यावर प्रतिपादन केले. शेलिंगचा हा विचार विसाव्या शतकातील अस्तित्ववादी विचारसरणीचे एक पूर्वप्रकटन म्हणता येईल. अमेरिकन धर्मतत्त्वज्ञ पॉल टिलिख ह्यांच्या विचारसरणीवर शेलिंगच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे.

स्वित्झर्लंड येथे त्याचे निधन झाले.

https://youtu.be/1_eKo_Ka_Yk

संदर्भ :

  • Bowie, A. Schelling and Modern European Philosophy : An Introduction, London, 1993.
  • Copleston, Frederick C. History of Philosophy, Vol.VIII, London, 1963.
  • Esporito, Joseph L. Schelling’s Idealism and Philosophy of Nature, Pennsylvania, 1978.
  • Jaspers, K, Schelling : Größe und Verhängnis, Munich, 1955.
  • Marx, N. The Philosophy of F. W. J. Schelling: History, System, Freedom, Bloomington, 1984.
  • Ostaric, L. Ed. Interpreting Schelling : Critical Essays, Cambridge, 2014.
  • Snow, D. E. Schelling and the End of Idealism, Albany (N. Y.), 1996.
  • Tilliette, X. Schelling : Introduction to the System of Freedom, New Haven, 1983.
  • Welchman, A.; Norman, J. Eds. The New Schelling, London, 2004.
  • Zizek, S. The Indivisible Remainder : An Essay on Schelling and Related Matters, London, 1996.
  • https://peoplepill.com/people/friedrich-wilhelm-joseph-schelling/bibliography/
  • https://plato.stanford.edu/entries/schelling/
  • https://philpapers.org/sep/schelling/
  • https://www.utpjournals.press/doi/pdf/10.3138/uram.9.1.56
  • https://schelling.org.uk/wp-content/uploads/Bibliography.pdf