बर्लिन, सर आयझेया : ( ६ जून १९०९ – ५ नोव्हेंबर १९९७ ). ब्रिटिश विचारवंत व तत्त्वज्ञ. जन्म रशियातील रीगा, लॅटव्हिया येथे. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या पालकांसमवेत इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. १९५४ मध्ये त्यांचा एलिन हल्बनशी विवाह झाला. शिक्षण ऑक्सफर्ड येथील सेंट पॉल स्कूल व कॉर्पस ख्रिस्ती कॉलेज येथे झाले. ऑक्सफर्डची शिष्यवृत्ती मिळवून ते १९३१ मध्ये बी.ए. व १९३५ मध्ये एम.ए. झाले. १९३२ पासूनच ते ऑक्सफर्डमध्ये अध्यापन करू लागले. १९४२-४५ मध्ये ते ब्रिटिश दूतावासाच्या सेवेत वॉशिंग्टन येथे होते. १९४५-४६ मध्ये ते मॉस्को येथे होते. १९५७ मध्ये त्यांची ऑक्सफर्डमधील चिचेली अध्यासनावर सामाजिक व राजकीय सिद्धांताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९६६ मध्ये न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटीत मानव्यविद्येचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. १९५७ मध्ये त्यांना नाइटहुड (‘सर’ हा किताब) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ऑस्टिन, ए. जे. एअर यांसोबत ऑक्सफर्डला तत्त्वज्ञान समृद्ध करण्यात व ते अमेरिकेत रुजविण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

‘संकल्पनांचा इतिहास’ वेगवेगळ्या युगांतील आणि भिन्न विचारसरणींच्या विचारवंतांच्या मतांचे संवेदनशील व मूलग्राही निरूपण करून त्यांनी मोलाची भर घातली आहे. ते कॉलिंगवुड यांच्यामुळे संकल्पनांच्या इतिहासाकडे वळले. त्यांच्या बहुतांश लेखनातून व्यक्तीच्या संकल्पस्वातंत्र्याचा प्रश्न केंद्रस्थानी असल्याचे दिसते. ‘टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी’ ह्या विषयावर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात १९५८ मध्ये दिलेले व्याख्यान विशेष गाजले. अभावरूप व भावरूप स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना त्यांनी मांडल्या. हे व्याख्यान १९६९ मध्ये फोर एसेज ऑन लिबर्टी ह्या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या ह्या ग्रंथाची तुलना जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६‒७३) यांच्या ऑन लिबर्टी (१८५९) ह्या प्रख्यात ग्रंथाशी केली जाते. बर्लिन यांनी आपल्या या ग्रंथात व्यक्तीच्या ‘मर्यादित’ संकल्प स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे मूलगामी विश्लेषण व  स्पष्टीकरण केले आहे. ‘टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी’ ह्या निबंधाचा मराठी अनुवाद मे. पुं. रेगे यांनी नवभारत  मासिकातून (ऑक्टो., नोव्हें. १९७७, जाने.-फेब्रु. व मार्च १९७८) क्रमशः केला आहे. इतिहासाच्या तत्त्वज्ञानासंबंधी त्यांनी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले आहेत. इतिहासाचा विषय केवळ घटनाच नसतात, तर मानवी कृतीही असतात. म्हणूनच इतिहासकाराला स्वातंत्र्य व नियती ह्या दोन विकल्पांमधून एकाची निवड करावी लागते. आपल्या हिस्टॉरिकल इनएव्हिटॅबिलिटी (१९५५) ह्या निबंधात त्यांनी नियतिवादाचे प्रामाण्य नाकारले नसले, तरी नियतिवादी विचारसरणी इतिहासाभ्यासासाठी विसंगत असल्याचे मत प्रतिपादले आहे. कृतीबाबत मानवाला जबाबदार धरण्यासाठी त्याच्या ठिकाणी संकल्पस्वातंत्र्य असल्याचे मानावे लागेल. म्हणूनच ऐतिहासिक वर्णनात संकल्पस्वातंत्र्यावर अधिक भर देणे उचित ठरेल. ऐतिहासिक तथ्ये व वैज्ञानिक तथ्ये यांत मूलभूत फरक असतो. ऐतिहासिक तथ्ये मूल्यभारित असतात आणि म्हणूनच त्यांना वैज्ञानिक नियम लावून चालणार नाही. त्यासाठी इतिहासकाराला नैतिक व मानसशास्त्रीय मूल्यांचा आश्रय काही प्रमाणात तरी घ्यावा लागतो.

बर्लिन यांच्या मते तत्त्वज्ञांनी गणित व शास्त्रांच्या तर्कापेक्षादेखील ऐतिहासिक विचारांच्या तर्काकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. ऐतिहासिक तथ्य व शास्त्रीय तथ्ये यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो, असा त्यांचा सिद्धांत होता. ऐतिहासिक तथ्ये मूल्यांनी भारावलेली असतात. सामान्य शास्त्रीय तथ्ये व्यापक नियमांद्वारे समजतात; पण ऐतिहासिक तथ्यांचे आकलन केवळ या नियमाद्वारे होत नाही. त्याच्यासाठी इतिहासकाराला नैतिक अथवा मानसशास्त्रीय मूल्यांकनाचा निदान थोडातरी आश्रय घ्यावा लागतो. मानवांचे व्यवहार सहेतुक असल्यामुळे त्यांच्याकडे केवळ बाह्य कार्यकारण संबंधाच्या दृष्टिकोणांतून पाहणे योग्य नसते.

अदृश्य शक्ती व प्रभुत्व : बर्लिन यांचे असे मत बनले आहे की, इतिहासाच्या क्षेत्रात ‘अदृश्य शक्ती व प्रभुत्व’ यांचा संचार असतो. या शक्ती जरी व्यक्तिनिरपेक्ष असल्या, तरी त्यांमुळे ऐतिहासिक परिस्थितीला एक विशिष्ट स्वरूप येऊन त्यांच्यामुळे मानव व संस्था यांचे कार्य एका विशिष्ट धोरणाने आपोआप होऊ लागते.

तात्पर्य, इतिहासाचा विषय केवळ ‘घटना’ नसून मानवाची ‘कृत्ये’ ही असतात. इतिहासकाराला इतिहास योग्य तऱ्हेने मांडावयाचा असल्यास त्याला दोन विकल्पांमधून कुठलातरी एक निवडावा लागेल. स्वातंत्र्य अथवा नियती, हे ते दोन विकल्प होत. हिस्टॉरिकल इनएव्हिटॅबिलिटी  या ग्रंथात बर्लिन म्हणतात की, नियतीवाद जर खरा असला, तर मानवाच्या जबाबदारीची कल्पना ज्या तऱ्हेने आपण ती मानतो, तशी लागू पडणार नाही; कारण मानवाला ‘जबाबदार’ समजण्यासाठी त्याच्या ठिकाणी हे करावे की, न करावे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य व सामर्थ्य लागते. म्हणून ऐतिहासिक वर्णनांत ‘इच्छा-स्वातंत्र्या’वर जास्त भर देणे क्रमप्राप्त असते.

कार्ल मार्क्स : हिज लाइफ अँड इन्व्हायर्न्मेंट (१९३९), द हेजहॉग अँड द फॉक्स (१९५३), द एज ऑफ एन्लाइट्नमेन्ट (१९५६), द कन्सेप्ट ऑफ सायंटिफिक हिस्टरी (१९६०), व्हीको अँड  हेर्डर (१९७६), द कृक्ड टिंबर ऑफ ह्यूमॅनिटी : चाप्टर्स इन द हिस्टरी ऑफ आयडियाज (१९९०), द मॅगस ऑफ द नॉर्थ : जे. जी. हॅमन अँड द ओरिजिन्स ऑफ मॉडर्न इरॅशनॅलिझम (१९९३), द प्रॉपर स्टडी ऑफ मॅनकाइंड : ॲन अँथॉलॉजी ऑफ एसेज (१९९७), व द पॉवर ऑफ आयडियाज (१९९७) हे त्यांचे इतर महत्त्वाचे ग्रंथ होत. ह्याशिवाय त्यांनी वेळोवेळी लिहिलेले निबंध ४ खंडांत आयझेया बर्लिन : सिलेक्टेड रायटिंग्ज ह्या मालेत प्रकाशित झाले आहेत. एक चिकित्सक व मूलगामी विश्लेषण करणारे विचारवंत म्हणून त्यांनी तत्त्वज्ञानात व एकूण वैचारिक क्षेत्रात घातलेली भर महत्त्वपूर्ण मानली जाते.

संदर्भ :

  • Aarsbergen-Ligtvoet, Connie, Isaiah Berlin : A Value Pluralist and Humanist View of Human Nature and the Meaning of Life, New York, 2006.
  • Baum, Bruce; Nichols, Robert, Eds. Isaiah Berlin and the Politics of Freedom : Two Concepts of Liberty 50 Years Later, New York, 2013.
  • Caute, David, Isaac and Isaiah : The Covert Punishment of a Cold War Heretic, London, 2013.
  • Cherniss, Joshua L. A Mind and Its Time : The Development of Isaiah Berlin’s Political Thought, Oxford, 2013.
  • Crowder, George, Isaiah Berlin : Liberty and Pluralism, Cambridge, 2004.
  • Dubnov, Arie M. Isaiah Berlin : The Journey of a Jewish Liberal, London, 2012.
  • Galipeau, Claude J. Isaiah Berlin’s Liberalism, Oxford, 1994.
  • Hardy, Henry, Ed. The Book of Isaiah : Personal Impressions of Isaiah Berlin, Woodbridge, 2009.
  • Ignatieff, Michael, Isaiah Berlin : A Life, London, 1998.
  • Jahanbegloo, Ramin, Conversations with Isaiah Berlin, London, 1992.
  • Kocis, Robert, A Critical Appraisal of Sir Isaiah Berlin’s Political Philosophy, New York, 1989.
  • Lilla, Mark; Dworkin, Ronald; Silvers, Robert B. Eds. The Legacy of Isaiah Berlin, New York, 2001.
  • Mali, Joseph; Wokler, Robert, Eds. Isaiah Berlin’s Counter-Enlightenment, Philadelphia, 2003.
  • Margalit, Edna and Avishai, Eds. Isaiah Berlin : A Celebration, London, 1991.
  • Ryan, Alan, Ed. The Idea of Freedom : Essays in Honour of Isaiah Berlin, Oxford, 1979.
  • Walicki, Andrzej, Encounters with Isaiah Berlin : Story of an Intellectual Friendship, Frankfurt, 2011.
  • जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड १ ते ३, पुणे, १९७५.
  • रेगे, मे. पुं. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७४.
  • वाडेकर, दे. द. संपा. मराठी तत्त्वज्ञान महाकोश, खंड १ ते ३, पुणे, १९७४.
  • https://plato.stanford.edu/entries/berlin/#WorkBerl