यूरोप खंडातील आल्प्स पर्वतराजीतील आणि स्वित्झर्लंडमधील एक प्रसिद्ध फ्योर्ड प्रकारचे गोड्या पाण्याचे सरोवर. स्वित्झर्लंड देशाच्या मध्यवर्ती भागातील चुनखडीयुक्त तीव्र उताराच्या निसर्गसुंदर डोंगराळ प्रदेशात हे सरोवर आहे. सस.पासून ४३४ मी. उंचीवर असलेले हे सरोवर पश्चिमेस पिलाटस, तर उत्तरेस रीगी या पर्वतश्रेण्यांनी वेढलेले आहे. सरोवराची लांबी ३९ किमी., कमाल रुंदी ३ किमी., कमाल खोली २१४ मी. आणि क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. आहे. सरोवराच्या वायव्य टोकाशी वसलेल्या लूसर्न शहरावरून सरोवराला हे नाव पडले आहे. हिमनद्यांच्या क्षरणकार्यामुळे तयार झालेल्या खोल दऱ्यांमध्ये या सरोवराची निर्मिती झालेली आहे. पश्चिमेकडून हॉर्फ, उत्तरेकडून मेगेनहॉर्न, तर दक्षिणेकडून बूर्गनश्टॉक आणि झेलिसबेर्क ही भूशिरे या सरोवरात प्रक्षेपित होताना दिसतात. त्यामुळे सरोवरास फ्योर्ड स्वरूपाचा अनियमित आकार प्राप्त झाला आहे.

वेगिस शहर

लूसर्न सरोवर चार प्रमुख हिमानी खोऱ्यांनी बनलेले आहे. ही खोरी विभिन्न भूवैशिष्ट्यांची असून ती अरूंद आणि नागमोडी सामुद्रधुनींनी एकमेकींना जोडलेली आहेत. त्यांपैकी सर्वांत पूर्वेस असलेले आणि दक्षिणोत्तर विस्तारलेले उरी सरोवराचे खोरे त्याच्या दक्षिणेस असलेल्या फ्लूअलन शहरापासून उत्तरेस असलेल्या ब्रुनन शहरापर्यंत पसरलेले आहे. उरी सरोवराच्या पश्चिमेस असलेले आणि पूर्व-पश्चिम विस्तारलेले गेर्झाउ सरोवर हे दुसरे खोरे आहे. ब्रुनन येथे उरी व गेर्झाउ ही दोन सरोवरे एकमेकांना मिळतात. ब्रुनन येथेच पूर्वेकडून वाहत येणारी मुओटा नदी सरोवराला मिळते. गेर्झाउ सरोवराच्या नैर्ऋत्य काठावरील बूऑक्स शहराजवळ एंजेलबर्गर आ ही नदी सरोवराला मिळते. दक्षिणेकडील बूर्गनश्टॉक आणि उत्तरेकडील रीगी या पर्वतश्रेण्यांच्या भूशिरापासून पश्चिमेस पसरलेले खोरे वेगिस खोरे या नावाने ओळखले जाते. वेगिसच्या पश्चिमेकडील चौथ्या खोऱ्यातील सरोवराचे तीन फाटे निर्माण झाले आहेत. त्यांपैकी सर्वांत पश्चिमेकडील फाटा लेक लूसर्न नावाने, उत्तरेकडील फाटा लेक क्युस्नाक्त नावाने, तर दक्षिणेकडील फाटा हेर्गिस्वील नावाने ओळखला जातो. हेर्गिस्वीलच्या नैर्ऋत्येस विस्तारलेला फाटा लेक आल्पनाच या नावाने ओळखला जातो. आल्पनाच सरोवराला दक्षिणेकडून झार्नर आ ही नदी मिळते. हेर्गिस्वील आणि आल्पनाच ही दोन्ही सरोवरे एका अरुंद सामुद्रधुनीने एकमेकांना जोडली गेली आहेत. लूसर्न सरोवराला मिळणारी रॉइस ही नदी वायव्य टोकावरील लूसर्न शहराजवळ सरोवरातून बाहेर पडते.

स्वित्झर्लंडच्या प्रशासकीय विभागांना (राज्यसंघांना) ‘कँटन’ असे संबोधतात. लूसर्न हे सरोवर लूसर्न, नीड्व्हाल्डन, उरी आणि शफीट्स या कँटननी वेढलेले आहे. किंबहुना या कँटनच्या मध्यभागी आहे. त्यावरून या सरोवरास ‘चार कँटनचे सरोवर’ म्हणूनही ओळखतात.

लूसर्न सरोवराचा परिसर ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. चौदाव्या शतकात घडलेल्या जुन्या स्विस कॉन्फरडरेशनच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या घटना या सरोवर परिसरात घडल्या आहेत. उरी, शफीट्स आणि नीड्व्हाल्डन या तीन कँटननी मिळून स्थापन केलेल्या ‘एव्हरलास्टिंग लीग ऑफ १३१५’ ची स्थापना या सरोवराच्या काठावरील ब्रुनन या शहरी झाली होती. स्वित्झर्लंडचा देशभक्त-लोकनायक म्हणून ख्याती असलेल्या विल्यम टेल यांस क्रूर शासक अ‍ॅल्ब्रेक्त जेसलर जेव्हा बोटीतून तुरुंगात नेत होता, तेव्हा उरी सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावर टेल यांनी बोटीतून उडी मारली होती. याच ठिकाणी ‘चॅपेल ऑफ टेल’ स्थित आहे. विल्यम टेल यांनी अ‍ॅल्ब्रेक्त जेसलरची हत्या केली; ते स्थळ क्युस्नाक्त सरोवराच्या उत्तरेस आहे.

लूसर्न सरोवर जलवाहतुकीसाठी सुयोग्य असल्याने स्वित्झर्लंडमध्ये रस्ते आणि लोहमार्गाचा विकास होण्याआधीच्या काळात या सरोवराने पूर्व आणि पश्चिमेकडील भूभागांना जोडण्यात, तसेच व्यापार उदीम वृद्धींगत करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लूसर्न सरोवराच्या विलोभनीय नैसर्गिक सौंदर्यामुळे हा परिसर पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. नौकानयनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. रोइंग या जलक्रीडा प्रकाराच्या स्पर्धा भरविण्यासाठी देखील हे सरोवर उपयोगात आणले जाते. सरोवराच्या वायव्य काठावर वसलेले लूसर्न हे ग्रीष्मकालीन रिझॉर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले प्रमुख शहर आहे. त्याशिवाय फ्ल्युलन, ब्रुनन, बूऑक्स, वेगिस, आल्पन्स्ताड, क्युस्नाक्त, गेर्झा, हेर्गिस्वील ही लूसर्न सरोवराच्या काठावर वसलेली शहरेदेखील महत्त्वाची आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी