मध्य इटलीतील आल्बान टेकड्यांमधील ज्वालामुखी शंकू कुंडात (कटाह/काहील) निर्माण झालेले एक सरोवर (Lake). ते इटलीची राजधानी रोम (Rome) शहराच्या आग्नेयीस १३ किमी. अंतरावर आहे. हा मृत ज्वालामुखी असून त्याच्या दोन प्राचीन ज्वालामुखी शंकू कुंडांचे एकत्रीकरण होऊन त्यात ह्या सरोवराची निर्मिती झालेली आहे. समुद्रसपाटीपासून २९३ मी. उंचीवर असलेल्या या दीर्घवर्तुळाकार सरोवराचा परिघ १० किमी., लांबी ३.२ किमी., रुंदी २.३ किमी., कमाल खोली १७० मी. आणि क्षेत्रफळ ५ चौ. किमी. आहे. सरोवरातील पाण्याच्या पातळीपासून काठाची कमाल उंची २५० मी. असून शंकू कुंडाचे उतार खडकाळ आहेत.

ग्रीक इतिहासकार प्लूटार्क (Plutarch) यांच्या विश्लेषणानुसार इ. स. पू. ४०६ मध्ये त्या प्रदेशात पाऊस पडला नसताना किंवा कोणतीही नदी किंवा प्रवाह आल्बानो सरोवरास येऊन मिळाला नसतानाही सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. सरोवराच्या तळाशी असलेल्या गाळात साचून राहिलेला ज्वालामुखीजन्य वायू बाहेर येऊ लागल्याने अचानकपणे सरोवरातील पाण्याची पातळी वाढून ते काठांवरून वाहू लागले होते. त्या पाण्यामुळे आलेल्या पुरात सभोवतालच्या प्रदेशातील शेतीचे तसेच द्राक्ष मळ्यांचे खूप नुकसान झाले. भूमिगत स्रोतांद्वारे सरोवराला पाणीपुरवठा होतो. इ. स. पू. ३९८-३९७ मध्ये सरोवराच्या पश्चिम टोकाच्या खडकाळ काठातून बोगदा खोदण्यात आला आहे. त्यातून सरोवरातील पाणी बाहेर पडून पुढे ते टायबर नदी (Tiber River) यास जाऊन मिळते. अद्याप हाच सरोवराचा निर्गममार्ग आहे. या बोगद्याची लांबी सु. १,२०० मी., रुंदी १२० मी. आणि उंची २ मी. आहे. बोगद्याचा शेवट कास्तेल गान्दॉल्फो नगराच्या खालील बाजूस आहे. बोगद्याला ठराविक अंतरावर भक्कम उभे स्तंभ ठेवण्यात आले आहेत.

सरोवराजवळ आल्बा लाँगा ही प्राचीन लॅटिन नगरी होती. रोमनांनी इ. स. पू. सातव्या शतकाच्या मध्यात तिचा विध्वंस केला. आल्बानो लास्त्याल, कास्तेल गान्दॉल्फो ही निसर्गसुंदर नगरे सरोवराच्या काठी वसली आहेत. आल्बानो लास्त्याल येथे रोमन अवशेष, रोमन थडगी आणि प्राचीन काळी रोमनांनी बांधलेले सुंदर व्हिला (उद्यानगृह) आढळतात. आजही याच्या परिसरात अनेक सुंदर व्हिला आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर विशेष महत्त्वाचा असून परिसरात द्राक्षमळे आहेत. १९६० मध्ये रोम येथे झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक खेळांपैकी डोंगी (लहान नावा) शर्यती आणि होड्या वल्हविण्याच्या शर्यती या सरोवरात घेतल्या होत्या.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा