महानीम हा वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिया डुबिया आहे. तो मेलिया कंपोझिटा या शास्त्रीय नावानेही परिचित आहे. कडू लिंब व मॅहॉगनी या वनस्पतीही मेलिएसी कुलातील आहेत. भारतात पूर्व हिमालयातील पायथ्याच्या वनांमध्ये आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांमध्ये महानीम वृक्ष आढळून येतो. त्याला निंबारा किंवा लिंबारा असेही म्हणतात.
महानीम वृक्ष सु. २० मी. उंच वाढतो. त्याची वाढ जलद होते. पूर्ण वाढलेल्या वृक्षाच्या खोडाचा व्यास ५०–७० सेंमी. असतो. साल तपकिरी व भेगाळलेली असून ती लहानलहान तुकड्यांत सुटून निघून जाते. पाने संयुक्त, दोनदा किंवा तीनदा पिसांसारखी विभागलेली असून पर्णिका लांबट व किंचित दंतुर असतात. महानीम वृक्षाचा पर्णसंभार दाट असल्यामुळे तो सहज नजरेत भरतो. मार्च-एप्रिलच्या सुमारास त्याला फुले येतात. फुले लहान, हिरवट-पांढरी व अनाकर्षक परंतु सुगंधी असतात. प्रत्येक फुलात ५ सुट्या व लांबट पाकळ्या असून १० पुंकेसरांच्या जुडग्याची नलिका तयार झालेली असते. फळे आठळीयुक्त, लांबट, गोलसर आणि हिरवी असतात. पिकल्यावर ती पिवळी होतात. बिया पाच व कठीण असतात.
महानीम वृक्षाच्या फळातील गर कडू असतो, म्हणून त्याला हिंदी भाषेत कडू खजूर म्हणतात. तो कृमिनाशक आणि वेदनाहारक आहे. तो रस्त्यांच्या कडेला किंवा बागांमध्ये लावण्यास उपयुक्त आहे. नवीन वने तयार करण्यासाठी महानीम वृक्षाचा उपयोग करतात. त्याचे लाकूड हलके असून ते कडू लिंबाएवढे कठीण व टिकाऊ नसते. खोकी, पेन्सिली व प्लायबोर्ड तयार करण्यासाठी महानीम वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो.