बर्क, रॉबर्ट ओहारा : (१८२१ ? –१८६१). ऑस्ट्रेलिया खंड उत्तर-दक्षिण पार करणारा धाडसी प्रवासी. त्याचा जन्म आयर्लंडमध्ये सेंट क्लेरन्स येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव जेम्स हार्डीमॅन बर्क. रॉबर्ट बर्क हा त्यांचा तिसरा मुलगा. त्याचे सुरुवातीचे शिक्षण वूलविच अकादमीमध्ये, तर पुढील शिक्षण बेल्जियममध्ये झाले. पुढे ऑस्ट्रियन सैन्यात दाखल होऊन बर्क कप्तान पदावर पोहोचला. पुढे सैन्यातील नोकरी सोडून तो आयर्लंडमध्ये पोलीस दलात भरती झाला (१८४८). १८५३ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केले व त्याच वर्षी तो मेलबर्न येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम बघू लागला. त्याला ओव्हन्स या जिल्ह्याचा प्रमुख पोलीस निरीक्षक या पदावर बढती मिळाली. क्रिमिया युद्धाच्यावेळी तो सैन्यात भरती होण्यासाठी इंग्लंडला जायला निघाला, पण तो लिव्हरपूलला पोहोचला तेव्हा युद्ध थांबले होते. म्हणून गेला त्याच जहाजाने तो ऑस्ट्रेलियात परतला (१८५६). पुढे कॅसलमेन येथे त्याला पोलीस अधिक्षक या पदावर बढती मिळाली (१८५८).

न्यू साउथ वेल्सपासून ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत मोहीम काढण्याचे ठरले (१८६०) आणि खूप चर्चा झाल्यानंतर बर्कची या मोहिमेचा नेता म्हणून निवड झाली. जी. जे. लँडेल याला दुसरे आणि विल्यम जे. विल्स याला तिसरे स्थान देण्यात आले. या मोहिमेत त्यांच्याबरोबर इतर १५ माणसे, २६ उंट व २८ घोडे आणि भरपूर अन्नधान्य देण्यात आले. उंट मुद्दामहून भारतातून मागवण्यात आलेले होते. मोहिमेवर निघण्यापूर्वी ६ जुलै १८६० या दिवशी सर्व पथकाचा सत्कार करून सार्वजनिक जेवण देण्यात आले.

मोहिमेने २० ऑगस्ट १८६० रोजी मेलबर्न येथील रॉयल पार्क सोडले. २४ ऑगस्टला बर्कने सँडहर्स्ट येथे आपला तळ ठोकला आणि दुसर्‍या दिवशी निघून मोहीम ६ सप्टेंबरला स्वान हिल्स येथे पोहोचली. त्यानंतर मरे नदीची उपनदी असलेल्या डार्लिंग नदीच्या काठावर असलेल्या मेनिनडी येथे जी. जे. लँडेल आणि काही जण भांडण झाल्यामुळे मोहीम सोडून गेले. त्यानंतर बर्कने विल्यम विल्सला बढती दिली आणि त्याच्या जागी विल्यम राइट याची नेमणूक केली. १८६१ मध्ये बर्कने काही निवडक लोक आणि साधनसामग्रीसह उत्तरेकडे धडक मारायचे ठरवले आणि विल्यम राइटला पाठोपाठ येण्याची सूचना केली.

बर्क ११ नोव्हेंबर १८६० रोजी कूपर्स क्रीक येथे पोहोचला आणि तेथे त्याने तळ ठोकला. त्या वेळी कूपर्स क्रीकच्या पलीकडच्या प्रदेशात कोणीही गेलेले नव्हते. विल्यम ब्राहे याच्यावर कूपर्स क्रीक तळ सांभाळण्याची जबाबदारी सोपवून १६ डिसेंबरला विल्स, ग्रे आणि किंग या तिघांसह सोळाशे किमी. अंतरावर असलेल्या कार्पेन्टारियाच्या आखाताकडे बर्क निघाला. कूपर्स क्रीक सोडल्यावर त्यांना वाटेत एका स्थानिक आदिवासी टोळीने त्यांच्या गावात नेले, तेथे त्या आदिवासींनी त्यांचे नृत्य करून दाखविले. त्या लोकांच्या हातात एक ढाल, मोठे बुमरँग व लांब भाला असल्याची नोंद आहे. कुपर्स क्रीक ओलांडल्यानंतर पुढील मुक्कामावर त्यांनी गुरूच्या उपग्रहांचे ग्रहण बघितल्याचे व काही अक्षांश निरीक्षणे केल्याचे लिहून ठेवलेले आहे.

विल्स, ग्रे आणि किंग या तिघांसह बर्क ९ फेब्रुवारी १८६१ या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील कार्पेन्टारियाच्या आखाताजवळ पोहोचला. तेथील किनारा खूप दलदलीचा असल्याने त्यांना किनाऱ्यावर पोहोचण्यास खूप त्रास झाला. १३ फेब्रुवारीला त्यांनी परतीचा प्रवास चालू केला. परंतु दमट हवामानामुळे त्यांचा सुरुवातीचा प्रवास खूप हळू झाला. त्यात त्यांच्या जवळच्या उंटांना व घोड्यांना अशक्तपणा आला. कूपर्स क्रीकला पोहोचण्याच्या चार दिवस आधी त्यांचा एक घोडा आजारी पडला आणि मरण पावला. कूपर्स क्रीकला पोहोचल्यावर विल्यम ब्राहे जवळजवळ सगळी साधनसामग्री घेऊन तेथून अगोदरच निघून गेल्याचे आढळले. ब्राहेला गाठणे शक्य नाही, हे लक्षात आल्याने बर्कने दोनशे चाळीस किमी. अंतरावर असलेल्या माउंट होपलेसकडे जाण्याचे ठरवले; तथापि तो फारसा लांब जाऊ शकला नाही. तेथे त्यांनी काही दिवस गवताच्या बिया (नार्डू सीड्स) खाऊन दिवस काढले. उपासमारीमुळे व अशक्तपणामुळे १८६१ च्या जून महिन्याच्या अखेरीस बर्क व विल्स दोघे मरण पावले. अशा प्रकारे या मोहिमेचा अंत झाला. आदिवासींची मदत झाल्याने या मोहिमेतला किंग फक्त वाचला.

अत्यंत खर्चिक (६०००० पौंड) अशा या मोहिमेच्या अपयशाची चैाकशी झाली. बर्कने विल्यम राइटची योग्यता न तपासता त्याच्यावर टाकलेला विश्वास, नियोजनाचा अभाव, राइटने कामात केलेली ढिलाई आणि अपुऱ्या साधनसामग्रीसह पुढे जाणे यासाठी बर्कला जबाबदार धरले गेले.

या सर्व प्रवासाचा वृतांत विल्यम विल्स याने आपल्या नोंदवहीत लिहून ठेवला. या वर्णनात त्याने आपला मार्ग प्रत्येक दिवसाच्या मुक्कामाप्रमाणे लिहिलेला असून त्यात जागांचे अक्षांश-रेखांश, पाण्याची ठिकाणे, त्यातील अंतरे, लागलेला वेळ, जमिनीचा प्रकार, दिसणारी झाडे-झुडपे, गवताचे प्रकार, आढळणारा दगड, आजूबाजूस दिसणारी नैसर्गिक वैशिष्ट्ये यांबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे. याचबरोबर त्याच्या नोंदवहीत त्यांच्या जवळ असलेल्या अन्नसाठ्याचा विस्तृत तपशील वाचायला मिळतो. यात साखर, लोणी, सुकवलेले मांस, सुकवलेल्या भाज्या, पीठ, पोर्ट्युलॅक नावाची भाजी असल्याचे लिहिलेले आहे.

एकोणिसाव्या शतकात बर्क याने केलेली ही मोहीम अत्यंत दुर्देवी शोधमोहीम म्हणून प्रसिद्ध आहे. असे असले तरी त्याने विल्यम विल्स व जॉन किंग यांच्याबरोबर या मोहिमेअंतर्गत ऑस्ट्रेलियाचा दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत ३२५० किलोमीटरचा विलक्षण खडतर असा प्रवास केला. या मोहिमेत नियोजनाअभावी अनेक कटू घटना घडल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागातून उत्तरेकडे जाण्याचा कायमस्वरूपी मार्ग निश्चित करण्यात या दोघांना अपयश आले. या मोहिमेतील यशापयश व चुका लक्षात घेऊन नंतर एक वर्षाने जॉन मॅकडॉवेल स्टुअर्ट याने दक्षिण-उत्तर दिशेने ऑस्ट्रेलिया खंड ओलांडण्यात व परत येण्यात यश मिळवले.

बर्क आणि विल्स यांचे स्मारक मेलबर्न शहरात आहे.

संदर्भ :

  • Fitzpatrick, Kathleen, Burke, Robert O’Hara (1821–1861), Australia, 2020.
  • Jackson, Andrew, Robert O’Hara Bruke and the Australian Exploring Expedition of 1860, London, 1882.
  • McLaren, I. F. ‘The Victorian Exploring Expedition and Relieving Expeditions, 1860-61: The Burke and Wills Tragedy’, Victorian Historical Magazine, Vol. 29, No 4, 1959.
  • जोगळेकर, प्रमोद, यांनी घडवलं सहस्रक, ‘ऑस्ट्रेलिया दक्षिणोत्तर पार करणारा रॉबर्ट ओहारा बर्क’, पुणे, २००३.

                                                                                                                                                                                    समीक्षक : प्रमोद जोगळेकर