रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील किल्ला. गुढे या गावातून पेठेतील मारुती मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर हा किल्ला असून वाटेतील एक ओढा पार करून पायवाटेने सु. १०० फूट चढून किल्ल्यात प्रवेश करता येतो.

किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजूस खूप दाट जंगल वाढलेले आहे. त्यामुळे किल्ल्याचे अवशेष स्पष्टपणे दिसणे तर दूरच, किल्ल्यात प्रवेश करणेही अवघड जाते. ज्या ओढ्याजवळून किल्ल्याकडे येतो, त्या ओढ्यातील नैसर्गिक कातळाला तासून ओढ्याचा खंदक म्हणून कल्पकतेने वापर केलेला आहे. या खंदकामध्ये १९५६ साली दगडाच्या बांधाने ओढ्याचे पाणी अडवले होते. पुढे तो बांध फुटला व पाणी गावात शिरले (१९६७). या फुटलेल्या बांधांचे अवशेष आजही ओढ्यामध्ये दिसून येतात. ओढ्याची किल्ल्याच्या बाजूची भिंत सुमारे १५ फूट उंच आहे व नंतर या नैसर्गिक भिंतीवर तटबंदी बांधलेली दिसून येते. तटावर दाट झाडी वाढलेली असल्याने ही तटबंदी सहजासहजी दिसून येत नाही.

कातळावर तटबंदीयुक्त बुरूज बांधल्याचे दिसून येते. किल्ल्याच्या तटाबाहेरील भागात मानवरूपी देवतेचे शिल्प कोरलेले दिसून येते. किल्ल्याच्या आतील भागात तीन ठिकाणी बांधकामाची जोती आढळून येतात. पश्चिमेकडील खंदकाजवळ खडकात खोदलेले पाण्याचे एक टाके आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्या दिसतात. तटबंदी पूर्णतः अस्तित्वात नसून अंदाजे ३ फुटांचा तटाचा भाग काही ठिकाणी दिसतो. तरी तटबंदीमुळे गडाची सीमा अधोरेखित करता येते. किल्ल्यातून बाहेर पडून हनुमान मंदिरापर्यंत गेल्यास समोरच प्रशस्त सपाटीची जागा दिसते. या भागात हनुमान मंदिराव्यतिरिक्त वामनेश्वर मंदिर, अर्धवट बुजलेल्या स्थितीतील सात विहिरी, शेषशायी विष्णूची दगडी मूर्ती, हनुमान मंदीर व बांधकामाची अनेक जोती दिसून येतात. विजयनगर साम्राज्यात बाजारपेठ याच भागात अस्तित्वात होती.
गुढे किल्ला किंवा किल्ले नवते याचा उल्लेख अंजनवेलची वहिवाट या दत्तो वामन पोतदार यांनी प्रकाशित केलेल्या मोडी कागदपपत्रांत येतो. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वार्षिक इतिवृत्त शके १८३५ मध्ये हे मोडी कागद लिप्यंतर करून प्रकाशित केले आहेत. यातील उल्लेखानुसार पवार नावाच्या विजयनगर साम्राज्याच्या कोकणातील सरदाराने गुढे गावाजवळ किल्ला बांधला व तेथे पेठ वसवली. किल्ल्याच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणामध्ये असे लक्षात येते की, किल्ला बांधून बाजारपेठ किल्ल्यात न वसवता किल्ल्याच्या बाहेरील भागात वसवली होती. आजही पेठेचे अवशेष किल्ल्याच्या बाहेरील परिसरात दिसून येतात. विशेष म्हणजे किल्ल्याजवळील मारुती मंदिराला पेठेतील मारुती असेच संबोधले जाते.
संदर्भ :
- जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव , पुणे, २०१३.
- पोतदार, द. वा. अंजनवेलची वहिवाट, भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक, पुणे, १९१३.
- रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई, १८८०.
समीक्षक : जयकुमार पाठक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.