महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली असलेल्या उत्तर दक्षिण पसरलेल्या डोंगररांगांवर वसलेला आहे. याच डोंगररांगांवर रसाळगड व सुमारगड हे महत्त्वाचे किल्ले आहेत. दहिवली गावातून वाडी-बेलदार गावामार्गे पायवाटेने वाटेने गडावर जाता येते. २०१९ मध्ये वाडी-बेलदारपर्यंत डांबरी रस्ता झाल्यामुळे किल्ल्यावर पोहोचणे सहज शक्य झाले आहे.

महिपतगड

या गडाला वेगवेगळ्या दिशेला एकूण सहा दरवाजे होते. आज या सर्व दरवाजांचे फक्त अवशेष आहेत. दरवाजांच्या कमानी अस्तित्वात नाहीत. गडावर प्रवेश केल्यावर प्रथम एका जुन्या बंधाऱ्याची भिंत व त्या भिंतीमध्ये जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी केलेली वाट दिसते. गडावर राबता होता, त्या वेळी पाणी या छोट्या बंधाऱ्याच्या आधारे अडवून गडावरील पाण्याची गरज अंशतः भागविली जात होती. बंधाऱ्या शेजारून वाट पारेश्वर मंदिराकडे जाते. गडावरील मुक्कामाची सर्वांत उत्तम जागा म्हणजे पारेश्वराचे मंदिर. मंदिरासमोरच विहीर असून त्या जवळून पूर्वेकडे म्हणजे वाडी-बेलदार गावाच्या दिशेने गेल्यास आग्नेय दिशेस गडाचा दुसरा दरवाजा — यशवंत दरवाजा — दिसतो. या दरवाजाजवळ अंदाजे २५-३० फूट उंचीचा बुरूज आहे. बुरुजाच्या आतील भागात सपाटीवर चुन्याचा मोठा ढिगारा दिसतो. याला पुरातत्त्वीय भाषेमध्ये ‘पांढरीचे टेकाड’ असे संबोधले जाते. याचा अर्थ या जागेवर पुरातत्त्वीय अवशेष मिळण्याची शक्यता जास्त असते. गडावर बांधकामाची अनेक जोती दाट झाडीमध्ये झाकलेली असून तेथपर्यंत सहज पोहोचता येत नाही. गडाचा पसारा अंदाजे ११० एकर आहे.

महिपतगडावरील जुने बांधकाम.

यशवंत दरवाजापासून पूर्वेला गडाचा तिसरा दरवाजा म्हणजे पुसाटी दरवाजा आहे. या दरवाजाचे अवशेष दिसून येतात. पूर्वेकडील तटबंदीकडून उत्तरेकडे गेल्यास या तटावरून पूर्वेला मकरंदगड, महाबळेश्वर व खाली जगबुडी नदीचे खोरे दिसते. तसेच या तटावरून ईशान्येला गडाचा चौथा दरवाजा लाल देवडी दरवाजा दिसतो. या दरवाजाचे देखील अवशेषच अस्तित्वात आहेत. उत्तर टोकाकडे कोतवाल दरवाजा हा पाचवा दरवाजा असून शेजारीच दोन भक्कम बुरूज दिसतात. कोतवाल दरवाजाजवळ भग्नावस्थेतील मारुती मंदिर आहे. या मंदिराचे फक्त जोते शिल्लक असून त्यावर हनुमानाची मूर्ती आहे. कोतवाल दरवाजापासून पश्चिमेकडील तटावरून पुढे खेड दरवाजा लागतो. गडाच्या पश्चिमेला सहावा आणि शेवटचा शिवगंगा दरवाजा आहे. या ठिकाणी एक शिवलिंग आहे.

महिपतगडावरील गणपती व मारुतीचे शिल्प.

साधारणत: गडाच्या मध्यभागी एका मोठ्या जोत्यावर गणपती व मारुतीचे शिल्प ठेवलेले आहे. पूर्वी गडावर या मूर्ती मोठ्या मंदिरात ठेवलेल्या असतील. या दोन्ही मूर्तींना आज शेंदूर लावलेला दिसून येतो.

महिपतगड किल्ल्याचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रांत येतो. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संबंधांचे महत्त्व दर्शविणारे या किल्ल्याशी संबंधित एक पत्र उपलब्ध आहे. छ. शिवाजी महाराज हे साधुसंतांचा कायम आदर करीत असत. महाराजांचे हे मोठेपण महिपतगडासंबंधी लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. १६७६ मध्ये महिपतगड स्वराज्यात होता. दसमाजी नरसाळा हा गडाचा हवालदार होता. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी महिपतगडाच्या हवालदाराला ८ ऑगस्ट १६७६ रोजी एक पत्र लिहिले होते. हे पत्र श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे-भाग १ यात प्रसिद्ध आहे.

संदर्भ :

  • गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
  • जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.
  • देव, शंकर, श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे  (भाग१), धुळे, १९२०.

                                                                                                                                            समीक्षक : जयकुमार पाठक