पृष्ठवंशी अधिवर्ग

रज्जूमान संघातील पृष्ठवंशी उपसंघात पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. पृष्ठवंशी उपसंघामध्ये पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची संख्या सुमारे ६९,९६३ एवढी झाली आहे. या उपसंघाचे जबडा नसलले जंभहीन अधिवर्ग व जंभयुक्त अधिवर्ग असे दोन अधिवर्ग केले आहेत.  जंभहीन अधिवर्गामध्ये गोलमुखी (Cyclostomata) या नावाने ओळखला जाणारा एकच वर्ग आहे. जंभयुक्त अधिवर्गाचे कास्थिमत्स्य/उपास्थिमत्स्य (Chondrichthyes), अस्थिमत्स्य (Osteichthyes/Bony fish), चतुष्पाद अधिवर्गातील उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी असे सहा वर्ग करण्यात आले आहे.

पृष्ठवंशी उपसंघातील प्राण्यांमध्ये कमालीची विविधता दिसून येते. सर्वांत लहान आकाराचा पृष्ठवंशी केवळ ७.७ मिमी. लांबीचा असून तो एक बेडूक आहे; तर सर्वाधिक लांबीच्या ब्लू व्हेल या सस्तन प्राण्याची लांबी ३३ मीटर एवढी आहे. वर्गीकरण केलेल्या सजीवांमधील पृष्ठवंशी प्राण्यांचा वाटा केवळ पाच टक्के असून उर्वरित अपृष्ठवंशी प्राणी आहेत.

पूर्वापार चालत आलेल्या वर्गीकरणानुसार गोलमुखी अधिवर्गामधील हॅग फिशमध्ये पाठीच्या कण्यातील मणक्यांचा उत्क्रांतीमध्ये ऱ्हास झाला आहे. त्यांच्या अधिक जवळच्या लॅम्प्रे (Lamprey; ईलसारखा पृष्ठवंशी प्राणी) व हॅग फिश यांमध्ये असलेले साम्य म्हणजे दोन्हीमध्ये असणारी कास्थियुक्त (कूर्चांनी बनलेली) कवटी (Cranium) हे होय. शरीर वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना यांना क्रेनियाटा (Craniates; कवटीधारी) असे म्हटले जाते. १९९२ साली केलेल्या रेणवीय तुलनेनुसार (Comparative genomics) हॅग फिश व लॅम्प्रे हे अधिक जवळचे प्राणी आहेत. पृष्ठवंशी उपसंघ सजीव एका समान पूर्वजापासून उत्क्रांत झालेले म्हणजे एकोद्भवी असल्याने  गोलमुखी अधिवर्ग व पृष्ठवंशी यांचा उगम एक आहे असे आता मान्य झाले आहे.

गोलमुखी जंभहीन अधिवर्ग

पाठीचा कणा असलेल्या पृष्ठवंशी अधिवर्ग सजीवांमध्ये रज्जुमान संघाची सर्व लक्षणे आहेत. उदा., पाठीचा कणा किंवा पृष्ठवंश रज्जू, नलिका असलेली चेतासंस्था, ऊर्ध्व बाजूस चेतासंस्था आणि अधर बाजूस अन्ननलिका, शीर्ष बाजूस डोके, पुच्छ बाजूस गुदद्वार व गुदद्वारानंतर पुच्छ असते. पृष्ठवंशी अधिवर्गामधील सर्व सजीवांमध्ये पृष्ठवंश रज्जूचे पाठीच्या कण्यामध्ये रूपांतर झालेले असते. पाठीच्या कण्याच्या मणक्यामध्ये असलेली कास्थी चकती (Intervertebral disc) एके काळच्या कास्थी रज्जूचा भाग आहे. स्टर्जन (Sturgeon), सीलाकॅन्थ (Coelacanth) यांसारख्या माशांमध्ये पुन्हा एकदा पृष्ठवंश रज्जू स्थापित झाला आहे.

जंभयुक्त पृष्ठवंशी सजीवांत शरीरास पंख (उदा., मासे) किंवा अवयवांच्या दोन जोड्या (उदा., चतुष्पाद प्राणी) असतात. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये कायमचे किंवा गर्भावस्थेमध्ये कल्ले असतात. हे कल्ले डोक्याच्या मागे घशामधून बाहेरच्या बाजूस उघडतात. प्रत्येक कल्ल्यास आधारासाठी कास्थी किंवा अस्थी सांगाडा असतो. कास्थिमत्स्यामध्ये कल्ल्यांच्या पाच किंवा सात जोड्या, तर अस्थिमत्स्यामध्ये कल्ल्यांच्या तीन जोड्या असतात. जंभहीन माशांमध्ये कल्ल्यांच्या सात जोड्या असतात.

तक्ता क्र. १ पृष्ठवंशी अधिवर्ग व त्यांची लक्षणे

उभयचर प्राणी व काही अस्थिमत्स्य यांमध्ये भ्रूणावस्थेत बाह्य कल्ले असतात. प्रौढावस्थेत बाह्य कल्ले नाहीसे होतात. त्यांचे कार्य अस्थि मत्स्यामध्ये कल्ल्यामार्फत व उभयचर प्राण्यांत फुफ्फुसामार्फत होते. काही उभयचर प्राण्यांचे बाह्य कल्ले प्रौढावस्थेत सुद्धा तसेच टिकून राहतात. इतर पृष्ठवंशींमध्ये फक्त भ्रूणावस्थेत कल्ले असतात. या कल्ल्यांच्या घटकापासून थायरॉइड, स्वरयंत्र, सरपटणाऱ्या प्राण्यांत मध्यकर्णातील कर्ण स्तंभिका (Columella) आणि सस्तन प्राण्यांच्या मध्यकर्णातील घणास्थी (Malleus) व ऐरणास्थी (Incus) या अस्थी तयार होतात.

पृष्ठवंशी अधिवर्गातील सजीवांमध्ये मध्यवर्ती चेतासंस्था पोकळ नलिकेसारखी असून ती शरीराच्या  लांबीएवढी असते. रज्जूमान संघातील फक्त पृष्ठवंशी अधिवर्गातील सजीवांमध्ये मस्तक व मस्तकामध्ये एकत्र आलेला मेंदू असतो. डोळे, कान, नाक इत्यादी शरीराच्या पुढील बाजूस मेंदूजवळ असतात. मेंदू अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्क अशा तीन भागांनी बनलेला असतो.

पृष्ठवंशी अधिवर्गाचे वर्गीकरण मत्स्य वर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप, पक्षी वर्ग, स्तनी वर्ग अशा पाच वर्गांमध्ये केले आहे (तक्ता क्र. १).

पहा : अपृष्ठवंशी, उभयचर वर्ग, पक्षी वर्ग, पृष्ठवंशी (पूर्वप्रकाशित नोंद), सीलाकॅन्थ,  मत्स्य वर्ग, रज्जुमान संघ, सरीसृप वर्ग, स्तनी वर्ग, हॅग फिश.

संदर्भ :

    समीक्षक : किशोर कुलकर्णी