पृष्ठवंशी संघातील स्तनी (mammalia) वर्गाच्या खुरी अधिगणाच्या समखुरी गणातील (Artiodactyla) सर्वांत मोठी वन्य मेंढी आहे. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन (Ovis ammon) असे असून बोव्हिडी (Bovidae) कुलात तिचा समावेश केला जातो. सायबीरिया, मंगोलिया व तिबेटच्या डोंगराळ प्रदेशांत ही आढळते. ‘आर्गली’ हा वन्य मेंढ्यांसाठी वापरला जाणारा मंगोलियन शब्द आहे.
मार्को पोलो किंवा पामीर आर्गली (ओव्हिस ॲमॉन पोलिआय; Ovis ammon polii), नयन (ओव्हिस ॲमॉन व्हॉग्सनाय; Ovis ammon hodgsonii), ओव्हिस एरीज एरीज (Ovis aries aries), माऊफ्लॉन (ओव्हिस एरीज ओरिएन्टॅलिस; Ovis aries orientalis) या आर्गलीच्या काही उपजाती आहेत.
इतर मेंढ्यांप्रमाणे आर्गली ही कळपात राहते. हे कळप २–१५० मेंढ्यांचे जनावरांचे असून नर व मादी यांचे कळप वेगवेगळे असतात. नर व मादी फक्त विणीच्या हंगामातच एकत्र येतात. मादींची संख्या नरांच्या तुलनेत जास्त असते. आर्गलीची खांद्यापाशी उंची ११०–१२० सेंमी., तर डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी १३६–२०० सेंमी. आहे. नराचे वजन सु. १४० किग्रॅ. असून मादीचे वजन नराच्या वजनाच्या जवळजवळ निम्मे असते. शरीराचा रंग बहुतांशी सभोवतालच्या परिसराशी मिळताजुळता असतो. त्यामुळे शरीराच्या रंगांमध्ये फिकट पिवळा, लालसर तपकिरी ते गडद राखाडी अशी विविधता आढळते. हिमालयातील आर्गली रंगाने गडद असून रशियातील आर्गली रंगाने फिकट असते. हिच्या पाठीचा रंग इतर भागांपेक्षा जास्त गडद असतो. अतिथंड हवामानात शरीरावरील लोकर अधिक जाड होत जाते आणि रंग फिकट होत जातो. नराला मळसूत्राकार शिंगे असतात. ही शिंगे सु. १९० सेंमी. लांब असून त्यांचे वजन सु. २३ किग्रॅ. असते. ती बाहेरच्या बाजूला वाकलेली असतात. नर एकमेकांशी लढताना शिंगांचा उपयोग करतात. मादीची शिंगे नराच्या तुलनेत खूपच लहान म्हणजेच सु. ५० सेंमी. लांब असतात. सायबीरियन आर्गलीची शिंगे लांबीने कमी असून अधिक जाड असतात.
आर्गली शाकाहारी असून ती मुख्यत: गवत खाते. पूर्ण वाढ झालेल्या आर्गलीला दिवसाला १६–१९ किग्रॅ. खाद्य लागते. उपलब्धतेप्रमाणे गवत, झुडपे यांशिवाय पाने, फुले आणि फळेही ते खातात. या मेंढ्यांना हिमवृष्टी आणि कडक ऊन यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच पाणी आणि अन्नाच्या शोधात त्या वरचेवर स्थलांतर करतात. यांचे डोळे आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतात.
प्रजनन काळात नर आणि मादी दोघे आक्रमक होतात. आपापल्या शिंगांनी संघर्ष करून एकमेकांवर ते आपला प्रभाव पाडतात. प्रजनन काळ ऑक्टोबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असतो. नर अनेक माद्यांशी समागम करतात. समागमानंतर नर दुसऱ्या कळपात जातो. गर्भावधिकाल सु. १६५ दिवसांचा असतो. जूनच्या सुमारास एकावेळी एक किंवा क्वचितच दोन पिले जन्मतात. पिलांच्या संगोपनाचे संपूर्ण कार्य मादीच करते. जन्माच्या वेळी पिलाचे वजन २.५–४.५ किग्रॅ. असते. नवजात पिलू आईसोबतच राहते. एका वर्षात पिलाचे वजन त्याच्या जन्माच्या वेळेच्या वजनाच्या १० पटीने वाढते. पिलास तीन महिन्यात दुधाचे दात येतात. दातांची पूर्ण वाढ होण्यास सहा महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर मादी दुग्धपान बंद करते.
मादी कोकरू प्रजननक्षम होण्यास दोन वर्षे लागतात. नर कोकरू प्रजननक्षम होण्यास तीन ते चार वर्षे लागतात. आर्गलीचे आयुर्मान १०–१३ वर्षांचे असून मादीचे आयुर्मान हे नरापेक्षा कमी असते. नर क्वचितच २० वर्षांपर्यंत जगतात.
लांडगा, बिबट्या आणि हिमबिबट्या हे आर्गलीचे प्रमुख भक्षक आहेत; तर कुत्रा व कोल्हा हे नवजात आर्गलीचे प्रमुख भक्षक आहेत. मांस, केस आणि विशेषत: शिंगांसाठी आर्गलीची शिकार केली जाते. तसेच ट्रॉफी हंटिंग (Trophy hunting) या जंगली शिकारी खेळासाठी नर आर्गलीची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. आर्गलीची शिकार करून तिचे शिंगांसहित डोके घरी किंवा हॉटेलमध्ये शोभेसाठी अडकवून ठेवणे यास ट्रॉफी असे म्हणतात.
नर-मादी जन्मदरातील विषमता तसेच विविध कारणांसाठी केली जाणारी शिकार या कारणांमुळे आर्गली मेंढी धोक्यात आलेली आहे.
संदर्भ :
समीक्षक – सुरेखा मगर-मोहिते