पुरापरागविज्ञान ही पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानाची एक उपशाखा आहे. प्राचीन काळात पर्यावरणात झालेले बदल आणि अशा बदलांचा मानवी संस्कृतींवरील परिणाम यांचा अभ्यास केला जाणाऱ्या पर्यावरणीय पुरातत्त्व या पुरातत्त्वविद्येच्या शाखेमध्येही पुरापरागविज्ञान उपयोगी पडते. एच्. ए. हाइड आणि डी. ए. विल्यम्स या वनस्पतिवैज्ञानिकांनी सर्वप्रथम १९४५ मध्ये परागविज्ञान (Palynology) हा शब्द वापरात आणला. वनस्पतिविज्ञानाची ही शाखा प्रामुख्याने सूक्ष्मदर्शक तंत्रज्ञानामधील प्रगतीच्या बरोबरीने विकसित झाली.
परागकण किंवा वनस्पतींचे बीजकण म्हणजे सपुष्प वनस्पतींच्या लैंगिक पुनरुत्पादनात भाग घेणारे नरबीज आहे. परागकण हे अत्यंत सूक्ष्म असल्याने डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांचा आकार ५ ते २०० नॅनोमीटर (एक नॅनोमीटर म्हणजे मिलिमीटरचा एक दशलक्षांश भाग) असतो. परंतु त्यांचे कवच कठीण असल्याने ते हजारो वर्षे टिकून राहतात. परागकणांच्या या गुणधर्माचा उपयोग पुरापरागविज्ञानात केला जातो. परागकणांचे कवच दोन भागांचे असते. बाहेरचे कवच अधिक कठीण असून त्यांच्यावर विविध प्रकारचे आकृतिबंध असतात. हे कवच स्पोरोपोलेनिन या संयुगापासून बनलेले असते. कवचाचा आतील भाग मऊ असून त्याच्या आत नरबीजपेशी असते. आकाराने सूक्ष्म असलेले व वजनाला अत्यंत हलके असे परागकण हवेमधून पसरतात. काही वनस्पतींमध्ये परागकण स्त्रीपुष्पापर्यंत जाण्यासाठी म्हणजेच परागीभवनासाठी कीटकांची मदत लागते. स्त्रीपुष्पापर्यंत पोहोचल्यानंतर फलन होऊन बीज तयार होते.
सपुष्प वनस्पतींच्या लैंगिक पुनरुत्पादनाचा काळ सुरू झाल्यावर नरपुष्पांमधून अथवा द्विलिंगी संयुक्त फुलातील पुंकेसरांतून शेकडो परागकण बाहेर पडून हवेत मिसळतात. यांतील काही परागकण जमिनीवर पडून मातीत मिसळतात. वारा, पाणी वगैरेंमुळे परागकण नदीनाल्यांत जातात आणि तळ्याच्या अथवा कोणत्याही खोलगट भागात वर्षानुवर्षे साठत जातात. परागकणाचे कवच आधी उल्लेख केलेल्या स्पोरोपोलेनिन संयुगापासून बनलेले असल्यामुळे जमिनीत गाडले गेल्यानंतरही दीर्घकाळ टिकून राहते. अशा तळ्यांच्या मातीमधून पूर्वी साठलेले परागकण प्रयोगशाळेत विशिष्ट प्रक्रिया करून शोधून काढता येतात. या प्राचीन परागकणांची तुलना सध्याच्या परागकणांशी करून ते वनस्पतीच्या कोणत्या प्रजातीचे आहेत, हे ठरविता येते.
पुरातत्त्वीय अवशेषांमधील परागकणांवरून त्या तळ्याच्या परिसरातील त्या वेळच्या वनस्पतींची व पर्यायाने तत्कालीन पर्यावरणाची माहिती मिळते. उदा., डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व विभागातील संशोधकांनी राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात असलेल्या जैसलमेरजवळील कनोद व जोधपूर जिल्ह्यातील फालोदीजवळील मल्हार येथील खाऱ्या पाण्याच्या तळ्यांतील थरांमधून मातीचे नमुने गोळा केले. या तळ्यांच्या भोवताली अनेक सूक्ष्म पाषाणयुगीन मानवी वस्तीचे अवशेष सापडतात. वरील दोन्ही तळ्यांतील परागकणांच्या व पुरातत्त्वीय पुराव्यांवरून असे दिसून आले की, सुमारे १०,००० वर्षांपूर्वी ही तळी अस्तित्वात आली आहेत. साधारणतः ७,००० वर्षांपर्यंत तेथे पाणी होते आणि सभोवताली गवताळ आणि काटेरी झुडपांचा प्रदेश होता. या कालावधीत पर्जन्यमानामध्ये चढउतार असल्याचे मातीच्या थरांवरून व परागकणांच्या संख्येवरून दिसून आले. त्यानंतर हळूहळू ती तळी कमी पर्जन्यामुळे व वातावरणातील बदलामुळे कोरडी पडली. यानंतरच्या काळात प्राचीन मानवी वसाहतीचे अवशेष आढळून येत नाहीत. आजच्या वाळवंटी प्रदेशात काही हजार वर्षांपूर्वी वसाहतीसाठी अनुकूल वातावरण होते आणि ते हळूहळू प्रतिकूल झाल्यामुळे तत्कालीन मानवसमूह दुसरीकडे स्थलांतरित झाले, असे दिसते.
संदर्भ :
- Brothwell, Don & Higgs, Eric Eds. Science in Archaeology, New York, 1963.
- Dinacauze, D. F. Environmental Archaeology, Principles and Practice, Cambridge, 2000.
- Evans, J. & O’Connor, T. Environmental Archaeology, Principles and Method, Stroud, 2001.
- Fuller, Dorian ‘Agricultural Origins and Frontiers in South Asia : A Working Hypothesisʼ, Journal of World Prehistory 21 (1): 1-86, 2006.
- Hastor, Christine A. ‘Recent Research in Paleoethnobotanyʼ, Journal of Archaeological Research 7 (1): 55-103, 1999.
- Madella, Marco; Lanceolatti, Carla & Savard, Manon Eds. Ancient Plants and People, Tucson, 2014.
समीक्षक : सुषमा देव