ढाकी, मधुसुदन अमिलाल : (३१ जुलै १९२७ — २९ जुलै २०१६). मंदिरस्थापत्य व कलेतिहासाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरजवळील ढांक या गावात एका श्वेतांबर जैन कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमिलाल जीवनभाई ढाकी हे उद्यान अधिकारी होते. त्यांचे मूळ गाव ‘ढांक’ असल्यामुळे त्यांचे आडनाव ‘ढाकी’ असे पडले. मधुसूदन ढाकी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले. पुढे त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भूगर्भशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. विज्ञानाचे पदवीधर असूनही प्राचीन भारतीय इतिहास, कला, संस्कृती तसेच पुरातत्त्वशास्त्र या विषयांकडे त्यांचा ओढा होता.

ढाकी यांनी पोरबंदर येथे एक पुरातत्त्व संशोधक गट स्थापन केला (१९५१) आणि सोळंकीकालीन कला व स्थापत्य यांबद्दल निरीक्षणात्मक लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी काही काळ बँका तसेच कृषिखात्यात नोकरी केली. मात्र पुरातन कलेतिहासाच्या ओढीमुळे जुनागढ येथील वस्तुसंग्रहालयात अभिरक्षक व पुरातत्त्व अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे विख्यात पुरातत्त्वज्ञ बी. सुब्बाराव (१९२१—१९६२) यांच्यासोबत गुजरातमधील पाटण येथील उत्खननात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.

भारतीय स्थापत्य, कलेतिहास आणि निर्ग्रंथ (जैन) या विषयांचा अभ्यास करताना ढाकी यांच्यावर वासुदेवशरण अग्रवाल, सी. शिवराममूर्ती आणि मोतीचंद्र या तीन प्रस्थापित विद्वानांचा प्रभाव होता. वासुदेवशरण अग्रवाल यांनी केलेल्या विविधांगी आणि विशिष्ट कल्पनाबंधांवर (मूर्ती व चित्रकलेतील) आधारित लेखनाचा मोठा प्रभाव ढाकी यांच्यावर पडला. पुढे त्यांनी अग्रवाल यांच्याच मार्गदर्शनाखाली १९६५ मध्ये द व्याळ फिगर्स ऑफ मिडेव्हल टेंपल्स ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले, त्याला अग्रवाल यांची प्रस्तावना आहे. शिवराममूर्ती यांनी ढाकींना भारतीय कलेचा अभ्यास करताना मूळ प्रमाणग्रंथांचे संपूर्ण अध्ययन करण्यास प्रवृत्त केले, तर मोतीचंद्र यांच्या भारतीय कलेचे समग्र आकलन तसेच सर्वसमावेशक लेखनाचा ठसा त्यांच्यावर उमटला.

पदवीनंतर त्यांनी पदव्युत्तर व पीएच.डीचे शिक्षण पूर्ण केले नाही. तरीही एल. डी. इन्स्टिट्यूट, अहमदाबाद या संस्थेने त्यांचा व्यासंग आणि अधिकार लक्षात घेऊन १९९६ मध्ये त्यांना ‘प्रोफेसर ऑफ इंडीयन आर्ट अँड आर्किऑलॉजी’ या पदावर नियुक्त केले आणि त्यानंतर ‘प्राध्यापक’ ही उपाधी कायमची त्यांच्या नावामागे जोडली गेली. ढाकी यांची विद्वत्ता वादातीत होती. दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय विद्यालयात कला व स्थापत्य विषयांतील पीएच.डी प्रबंधांचे ते पर्यवेक्षक होते. पुढे म्हैसूर, पुणे, बडोदा आणि गुजरात या विद्यापीठांत पीएच.डी प्रबंधांचे बाह्य परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या व्यतिरिक्त लंडन आणि बर्लिन येथील विद्यापीठांत भारतीय कला व स्थापत्य या विषयांतील संशोधकांना ते नियमितपणे मार्गदर्शन करीत.

ढाकी हे कला, सौंदर्यशास्त्र, जैन तत्त्वज्ञान, प्राकृत भाषा व जैन छंदशास्त्र यांच्या जोडीने उत्तर भारतीय तसेच कर्नाटक संगीत, उद्यानविद्या, रत्नशास्त्र आणि भरतकामाचे जाणकार व सखोल अभ्यासक होते. विविध विषयांवरील त्यांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. क्रोनोलॉजी ऑफ सोळंकी टेंपल्स ऑफ गुजरात (१९६१), द व्याळ फिगर्स ऑफ मिडेव्हल टेंपल्स ऑफ इंडिया (१९६५), द इम्ब्रोयडरी अँड बीड वर्क ऑफ कच्छ अँड सौराष्ट्र (१९६६), द टेंपल्स ऑफ कुंभारीया (२००१), द इंडियन टेंपल फॉर्म्स इन कर्नाटक इन्स्क्रीप्शन्स अँड आर्किटेक्चर (२००५), द इंडियन टेंपल ट्रासरीज (२००५), स्टडीज इन निर्ग्रंथ आर्ट अँड आर्किटेक्चर (२०१२) असे ११ ग्रंथ आणि विविध विषयांवरील सु. ३२५ संशोधनपर लेख त्यांच्या नावावर आहेत. प्रभाशंकर ओम सोमपुरा यांच्यासह त्यांनी भारतीय किल्ले या विषयाला वाहिलेला भारतीय दुर्गविधान (१९७१) हा ग्रंथ लिहिला. निर्ग्रंथ या त्रैभाषिक संशोधक नियतकालिकाचे ते संपादक होते. बडी मोतीबाई, रसूलनबाई, सिद्धेश्वरीदेवी या ख्यातनाम शास्त्रीय गायिका आणि काही वादकांबद्दलही ढाकी यांनी लेखन केले. उत्तर भारतीय आणि कर्नाटक या दोन्ही प्रकारांतील संगीतरचना आणि त्या त्या भागांतील प्राचीन स्थापत्य यांत काही साम्यस्थळे (तत्त्वाधिष्ठित, संरचनात्मक आणि प्रतिकात्मक) आढळून येतात, असे त्यांचे मत होते.

द एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन टेंपल आर्किटेक्चर  हा भारतीय मंदिरस्थापत्यावरील कोश म्हणजे ढाकी यांचे महत्कार्य होय. सेंटर फॉर आर्ट अँड आर्किऑलॉजी ऑफ द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज, गुरगाव (हरियाणा) या संस्थेत ते संचालक होते. मात्र १९९६ ला निवृत्त झाल्यानंतरही संस्थेने त्यांना मानद पदावर राहण्याची विनंती केली. २००५ पर्यंत त्यांनी मानद संचालक म्हणून काम पाहिले. १९६६ ते २००५ या प्रदीर्घ कालावधीत ढाकी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन टेंपल आर्किटेक्चर या कोशाचे काम पूर्ण झाले. विविध प्राचीन ग्रंथ व हस्तलिखितांतून (विशेषत: संस्कृत) भारतीय मंदिर स्थापत्याचे बारकावे, तांत्रिक परिभाषा शोधून काढणे, त्यांचा वेगवेगळ्या कालखंडातील स्थापत्यशैलीत कसा उपयोग केलेला आहे, ते अभ्यासणे तसेच त्यांतील प्रांतिक वैविध्य पडताळणी असा या कोशाचा प्रचंड आवाका होता. त्यासाठी ढाकी यांच्या दिग्दर्शनाखाली देशभरातील हजारो देवळे, धार्मिक आणि पुरातत्त्वीय स्थळे पालथी घालण्यात आली व प्रत्येक ठिकाणचे सविस्तर दस्तऐवजीकरण (छायाचित्रांसह) करण्यात आले. परिणामत: १४ खंडांचा हा बृहद्कोश पूर्ण झाला; त्यांपैकी ४ खंडांचे संकलन, एका खंडाचे समन्वयन आणि दक्षिण भारतीय मंदिरांना वाहिलेल्या एका पूर्ण खंडाचे लेखन स्वत: ढाकी यांनी केले होते. आपल्या मृत्यूपूर्वी ते याच खंडाची शब्दार्थ सूची पूर्ण करण्यात मग्न होते.

ढाकी यांनी अनेक संस्थांचे सभासदत्व आणि अध्यक्षपद भूषविले. हैदराबाद येथे घेण्यात आलेल्या इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेसच्या नवव्या सत्राचे ते अध्यक्ष होते (२००१). विविध संस्थांनी त्यांचा अनेक पुरस्कार देऊन गौरव केला. एशियाटिक सोसायटी, मुंबई यांच्यातर्फे ‘कँपबेल मेमोरियल’ सुवर्णपदक; गुजरात इतिहास परिषद, अहमदाबाद यांचेकडून ‘आर. सी. पारेख सुवर्णपदक’, तर जसवंत धर्मार्थ, दिल्ली यांचेकडून १९९७ मध्ये ‘हेमचंद्राचार्य’ पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांचे प्राकृत भाषेवरील प्रभुत्व आणि त्यातील योगदानाबद्दल प्राकृत ज्ञानभारती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले (१९९३). भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला (२०१०).

आगमग्रंथ, त्यांवरील टीका आणि प्राचीन तसेच मध्ययुगीन काव्यरचना या सर्व रचनांसह जैन वाङ्मयाचा इतिहास कालानुक्रम लिहिण्याचे, मुख्यत: निर्ग्रंथांच्या रचनाकारांचा काळ ठरविण्याचे महत्त्वाचे कार्य ढाकी यांनी केले. इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषांमध्ये त्यांची लेखणी तितक्याच सफाईने चालत असे. भारतीय कलेच्या अभ्यासक कपिला वात्स्यायन यांनी ढाकी यांच्या लेखनाचे वर्णन करताना म्हटले आहे की, “प्रा. ढाकींनी आपल्या लेखनात पर्वतांची उंची आणि सागराची खोली गाठली ती केवळ त्यांच्या विद्वत्तेच्या आधारे नव्हे, तर दुर्मीळ अशा विनयाने.”

कृश शरीरयष्टी, अफाट विद्वत्ता आणि विलक्षण विनोदबुद्धी असलेले ढाकी पत्नी गीताबेन यांच्या मृत्यूनंतर एकाकी झाले (२०१५).

वयाच्या ८९ व्या वर्षी नारनपुरा, अहमदाबाद (गुजरात) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Desai, Devangana, ‘Obituary : Prof. Madhusudan Amilal Dhaky (31st July 1927-29th July 2016)’, Kala – The Journal of Art History Congress, Vol – XXII,  2016-17.
  • Tiwari, M. N. ‘Obituary : Prof. Madhusudan Amilal Dhaky : A Scholar of Indology and Jaina Art’, Jnana-Pravaha – Research Journal, No. XX, pp. 161-168, 2016-17.

                                                                                                                                                  समीक्षक : मंजिरी भालेराव