रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील एक किल्ला. हा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून १० किमी. अंतरावरील तुरळ या गावाजवळ आहे. तुरळ गावापासून कडवई मार्गे शिर्केवाडी नावाचे गाव गडाच्या मेटावर (चौकी) असून गाडीरस्ता या गावापर्यंत बांधलेला आहे.

भवानीगड

शिर्केवाडी हे गाव भवानीगडाच्या उतारावर असून या गावात शिर्के आडनावाचे लोक शिवकाळापासून वास्तव्य करीत आहेत. गावातूनच पायवाटेने गडावर पोहोचता येते. गडाच्या पूर्वेकडील कातळात खोदलेली तीन टाकी दिसून येतात. त्यांना साखरटाके, राजनमुख टाके व पाळणाटाके अशी नावे आहेत. यांपैकी दोन टाकी ही खांब टाकी आहेत. या टाक्यांमध्ये बारमाही पाणी असते. गडाचा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून सध्या फक्त अवशेषच दिसतात. दरवाजाची कमान दिसत नाही.

भवानी देवीचे मंदिर, भवानीगड.

किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेला पालापाचोळा आणि वाढलेले गवत दिसते. गडाचा आतील परिसर फक्त दीड ते दोन एकर आहे. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे भवानी देवीचे मंदिर. गेल्या काही वर्षांत या मंदिराची अनेक वेळा डागडुजी व दुरुस्ती झालेली आहे. भवानी देवीचे मंदिर व शंकराची पिंड समोरासमोर एकाच कौलारू मंदिरात आहे. मूळ मंदिराचे जुने कोरीव खांब शंकराच्या मंदिराला लावलेले दिसून येतात. मंदिरासमोर बाहेरील बाजूस तुळशी वृंदावन आहे. मंदिरात छोट्या आकाराची एक तोफ ठेवलेली असून तिला शेंदूर फासलेला आहे. ही तोफ साधारणतः ३ फूट लांबीची आहे. अशा प्रकारच्या तोफा कोकणातील रसाळगड, साठवली, महिमतगड इ. किल्ल्यांवर दिसतात. गडावरील तटबंदीच्या खाली उतारावर खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. त्याला देवटाके असे म्हणतात. देवटाक्याच्या शेजारी म्हसोबाची मूर्ती आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे तुरळक अवशेष गडावर विविध ठिकाणी दिसतात.

भवानीगडावरील तोफ.

किल्ल्याच्या सध्याच्या बांधकामावरून तो शिवकाळातील की शिवपूर्वकाळातील आहे, हे निश्चित सांगता येत नाही. १६६१ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची दुरुस्ती करून भवानी देवीचे मंदिर बांधले, असे काही तज्ज्ञांचे मत आहे, पण याला ठोस ऐतिहासिक पुरावा नाही. परंतु गडावरील पुरातत्त्वीय अवशेषांवरून ती जागा किल्ला म्हणून अस्तित्वात होती, हे मात्र निश्चित सांगता येते. भवानी देवीचा दरवर्षी जानेवारी महिन्यात उत्सव होतो.

 

 

 

संदर्भ :

  • जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव, पुणे, २०१३.
  • पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, पुणे, १९९५.

                                                                                                                                                                                   समीक्षक : जयकुमार पाठक