रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ला. तो चिपळूण तालुक्यातील मांडकी (खुर्द) या गावाजवळ आहे. किल्ल्याची उंची पायथ्याच्या मांडकीपासून २५० मी. आहे.

माणिकदुर्ग, रत्नागिरी.

गडाच्या शेवटच्या टप्प्यात बालेकिल्ला सदृश्य भाग असून बालेकिल्ल्याच्या पश्चिमेला कातळात पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. यातील पहिल्या टाक्याची लांबी १८ फूट असून रुंदी १२ फूट आहे. सध्या हे टाके साडेचार-पाच फूट खोल आहे. टाक्यामध्ये खूप गाळ साठलेला असून हे टाके जवळजवळ बुजण्याच्या मार्गावर आहेत. दुसरे टाके पहिल्या टाक्यापासून १५ फूट अंतरावर आहे. या टाक्याच्या मुखदर्शनावर ललाटावर शिल्पकाम केलेले आढळते. दगडामधे कोरीव काम करून केलेल्या या शिल्पपटामध्ये दोन्ही बाजूंना दोन भारवाहक यक्ष, मध्ये हत्ती व एक स्त्रीसदृश्य प्रतिमा कोरलेली आहे. या भारवाहकाची उंची ५० सेमी. व रुंदी ३८ सेमी. आहे. एका भारवाहकाचे हात व पाय स्पष्ट दिसतात, तर दुसऱ्या भारवाहकाचे डोळे, नाक, त्याच्या कानातील कुंडल इ. व्यवस्थित आहेत. भारवाहक असलेल्या टाक्याची लांबी १५ फूट व रुंदी १५ फूट असून खोली ३ फूट आहे. या टाक्यामध्ये देखील खूप मोठी दरड पडलेली आहे. टाक्यापासून एक पायवाट गडमाथ्यावर जाते. माथ्यावर पूर्ण सपाटी आहे.

टाक्यावरील शिल्पपट, माणिकदुर्ग.

गडाच्या दक्षिणेकडील कातळामध्ये पाच लेण्यांचा समूह आहे.  पण ही लेणी अंशत: गाळाने भरली आहेत. लेण्यांजवळ गेल्यावर त्याचा खूपच थोडा भाग दृष्टीपथात येतो. या लेण्यांमध्ये देखील शिल्पपट होता, असे तेथील अवशेषांवरून दिसून येते. या लेण्यांपर्यंत जाण्याची वाट थोडी अवघड आहे. उत्तर टोकाकडील बुरुजाखाली, सपाटीवर सुकाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरापासून लेण्यांच्या समूहापर्यंत पोहोचता येते.

गडाचा माथा उत्तर-दक्षिण पसरलेला असून उत्तर टोकावर एका बुरुजाचे अवशेष आहेत. हे अवशेष मातीच्या  थराने पूर्ण झाकले गेलेले आहेत. गडाच्या दक्षिणेकडील भागात ३ ते ४ फूट खोल विहीरसदृश्य खड्डा आहे. गडावर मोठ्या प्रमाणात खापरांचे (मडक्यांचे) तुकडे पसरलेले आहेत.

उत्खननाचे एक दृश्य, माणिकदुर्ग.

या किल्ल्याचा उल्लेख अंजनवेलची वहिवाट या मोडी लिपीमध्ये लिहिलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांत आहे. दत्तो वामन पोतदार यांनी या कागदपत्रांचे वाचन करून ते देवनागरीमध्ये प्रसिद्ध केले (१९१३). यातील माहितीनुसार, विजयनगर साम्राज्याचा विस्तार दाभोळ बंदरापर्यंत होता. दाभोळ भागात पवार नावाच्या विजयनगरच्या सरदाराचा अंमल होता. त्याच्या ताब्यात गुढे, माणिकदुर्ग आणि कासारदुर्ग हे किल्ले व गुढे येथील बाजारपेठ होती. माणिकदुर्ग किल्ल्याच्या परिसरात सर्वेक्षण केल्यावर असे दिसून आले की, किल्ला जरी विजयनगर काळातील असला तरी गडावरील पाच लेण्यांचा समूह व पाण्याची दोन टाकी ही अंदाजे आठव्या ते नवव्या शतकातील असावीत. पुण्यातील डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागातर्फे येथे झालेल्या उत्खननात मध्ययुगीन काळातील खापरे, बांगड्या इ. गोष्टी मिळालेल्या आहेत. हे सर्व अवशेष १५-१६ व्या शतकातील आहेत, असा अंदाज आहे. माणिकदुर्ग किल्ल्यावर प्रस्तुत लेखकाने (सचिन जोशी) सन २००९-१० मध्ये उत्खनन केले होते. या कामी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे विश्वास गोगटे, अभिजीत दांडेकर,  शिवेंद्र काडगावकर यांचे सहकार्य लाभले.

संदर्भ :

  • जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव, पुणे, २०१३.
  • पोतदार द.वा. अंजनवेलची वहिवाट, भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक, पुणे, १९१३.
  • रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई, १८८०.

                                                                                                                                                                                      समीक्षक : जयकुमार पाठक