‘रहस्यवाद’ वा ‘गूढवाद’ हे पद विश्वाचे अंतिम सत्यस्वरूप आणि ते जाणून घेण्याचा मार्ग यांविषयी एक विशिष्ट समजूत, भूमिका अथवा प्रवृत्ती दर्शविते. अंतिम सत्य तार्किक विचारसरणीला ज्ञात होत नसते. सद्वस्तू ही प्रत्यक्षानुभूतीतच प्रतीत होते. विश्वाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन, सर्वव्यापी, चैतन्यमय शक्तीशी मानवाला एकरूप होता येते. जिवाशिवाच्या भेटीची अनुभूती ही आडपडदा नसलेली, आनंदमय, निःशब्द अनुभूती असते. सत्यप्राप्तीला शब्दांचा आणि प्रतिमांचा अडसर बाधक असतो. तो अडसर या उच्च अनुभूतीत दूर होतो. निर्विकल्प समाधीत ज्ञाता व ज्ञेय वस्तू वा दोहोंचे द्वैत, ‘मी-तू’ चे वेगळेपण गळून जाते, असे रहस्यवादाचे म्हणणे आहे.
गूढ वा रहस्यवादाचा धर्माशी अत्यंत निकटचा संबंध आहे. धर्माची शिकवण गूढवादी असते. ईश्वर आणि मनुष्य यांचे जवळचे नाते असून मनुष्याला ईश्वराशी प्रत्यक्ष संपर्क साधता येतो. नैष्ठिक आचरणाने आणि दैवी प्रसादाने हा दिव्य संपर्काचा साक्षात्कार मिळविता येतो, अशी धर्माची धारणा असते; परंतु आपणास येथे गूढवादाचा धार्मिक तसेच तात्त्विक व सैद्धांतिक दृष्टिकोणांतूनच विचार करावयाचा आहे.
गूढवाद हा अध्यात्मशास्त्राहून निराळा आहे. अध्यात्मशास्त्र तर्कनिष्ठ असते, तर गूढवादाच्या नजरेत तर्कनिष्ठ विचारसरणी कुचकामाची असते. अध्यात्मशास्त्र हे सद्वस्तुसोबत इंद्रियगोचर सृष्टीचाही खुलासा करीत बसते; पण गूढवादाला इंद्रियगोचर सृष्टीशी कर्तव्य नसते. सृष्टीच्या पसाऱ्यातून सुटून परब्रह्माच्या समाधीत विलीन व्हावयाचे एवढीच गूढवादाची विवंचना असते. अशा प्रकारे गूढवादाची प्रवृत्ती अध्यात्मशास्त्राच्या प्रवृत्तीहून निराळी असते. पण अध्यात्मशास्त्रास गूढवादाचे वावडे नसते. ते कधी कधी गूढवादी निष्कर्षांचाही स्वीकार करते. पायथॅगोरस (इ.स.पू.सु. ५७५−४९५), प्लेटो (इ.स.पू.सु. ४२८−सु. ३४८), ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४–३२२), ब्रूनो (१५४८–१६००), स्पिनोझा (१६३२−१६७७), बर्क्ली (१६८५−१७५३), हेगेल (१७७०−१८३१), ब्रॅड्ली (१८४६−१९२४) यांच्यासारखे पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते, त्याचप्रमाणे आपल्याकडील शंकराचार्यांसारखे अद्वैत वेदान्ती, तर्कप्रिय विचारसरणीच्या आधाराने गूढवादी निष्कर्षांपर्यंत येऊन पोहोचले.
गूढवादीप्रिय तत्त्ववेत्ते सामान्यतः असे प्रतिपादन करतात की, ईश्वर म्हणजे अंतिम सत्य, जडातीत चैतन्य, विश्वाचे विशुद्ध मर्म, निर्गुण व निराकार सद्वस्तू होय. त्याचे ठिकाणी पूर्णत्व आणि मूल्याश्रयित्व, अमृतत्त्व व अपरिवर्तनीयत्व असते. तो साऱ्या इंद्रियगोचर पसाऱ्यापलीकडला असला, तरी मानवाच्या अंतर्यामी त्याचा अंश वास करीत असतो. या दैवी अंशाद्वारेच मानवास त्या अंतिम सत्याशी असलेले आपले नाते ओळखता येते. शिवाय ते अंतिम तत्त्व, तो परमात्मा, दृश्यस्पृश्य वस्तुस्थितीपलीकडचा, अमूर्त व अनंत असतो. त्याला मूर्त, सान्त वस्तुदर्शक कोणतेही पद अथवा गुणधर्म चिकटविता येत नाही. त्यावर कुठलाही गुणधर्म लादणे म्हणजे निराकारास साकार करणे, अमर्यादिताला मर्यादित करणे होय. सारे ज्ञात गुणधर्म सान्त असल्याकारणाने ते ईश्वराच्या अनंत स्वरूपापासून दूरच ठेवावे लागतात. ‘नेति नेति’चा मंत्र जपावा लागतो. ईश्वरी भेटीसाठी आत्म्याला सर्व वासना-विकारांपासून मुक्त करावे लागते आणि ती भेटही शब्दशून्य, मूक, नीरव, शांतिपूर्णच असते.
विधायक दृष्टिकोण असलेल्या विचारवंतांना, विशेषतः आदर्शवादी तत्त्ववेत्त्यांना, गूढवादाचे नेहमीच आकर्षण वाटत असते. जगाचे आणि जीवनाचे कोडे सोडविण्याचे सारे बौद्धिक प्रयास वाया गेले की, विश्वाचे रहस्य मानवाच्या तर्कबुद्धीला सोडविता येत नाही, अशी प्रामाणिक कबुली देण्याचा या विचारवंतांवर प्रसंग येतो. पण त्याचसोबत संशयवादाच्या सर्वनाशी दरीतही न पडण्याची खबरदारी घ्यावी लागते. अशा वेळी गूढवादाचा आश्रय करणे अत्यंत सोयीस्कर व हितप्रद असते.
पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात गूढवादाचा प्रारंभ पायथॅगोरसच्या शिकवणीपासून झाला, असे म्हणावयास हरकत नाही. विश्वाचे रहस्य ‘अंक’ या गूढ संकल्पनेत दडलेले आहे. मनुष्याचा आत्मा अमर असून इहलोकीच्या मरणानंतर तो परलोकी जात असतो. अशी गहन तत्त्वे सांगून पायथॅगोरसने समाजसुधारणेच्या उद्देशाने एक मंडळ स्थापन केले आणि कडक शिस्तप्रिय संन्यासमार्गी नीतीचा उपदेश केला. त्याच्या शिकवणीचा परिणाम सॉक्रेटीसावर (इ.स.पू. ४६९−३९९) झाला आणि सॉक्रेटीसाद्वारे ती शिकवण प्लेटोपर्यंत येऊन पोहोचली. जगताचे अंतिम तत्त्व, त्याच्याशी आत्म्याचे नाते, आत्म्याची ऐहिक बंधनांतून मुक्ती, त्याचा परलोकवास इ. तत्त्वमीमांसापर कल्पनांवर प्लेटोने केलेले गूढगुंजन जगप्रसिद्ध आहे.
ग्रीक संस्कृतीच्या ऱ्हासानंतर जेव्हा जेव्हा राज्यसंस्था कमकुवत होऊन लोकांची दैन्यावस्था वाढली आणि धर्मभावना बलवत्तर बनली, तेव्हा तेव्हा पाश्चात्त्यांची मने पायथॅगोरस, प्लेटो आदी ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या गूढवादी शिकवणीकडे वळली. ग्रीक तत्त्वज्ञानाच्या पायावरच ख्रिश्चनांचे गूढवादी धर्मशास्त्र उभारले गेले. प्लोटायनसने (२०५−२७०) नव-प्लेटोमतवाद प्रस्थापित केला. त्याच्या मते, ईश्वर हा विश्वाचा आदी आणि अंत असून सर्व वस्तू त्याच्यापासून निघतात आणि परत त्याच्याप्रत येऊन पोहोचतात. त्याच्या स्वरूपात विलीन होणे हाच मानवी जीवनाचा मुख्य कार्यभाग आहे. तो साधण्यासाठी मनुष्याने सर्व वासनांचा क्षय केला पाहिजे. प्लोटायनसच्या या तत्त्वचिंतनात ग्रीक तत्त्वज्ञान व पौर्वात्य धर्म यांचा मिलाप झाला होता.
मध्ययुगात सेंट टॉमस अक्वाय्नस (१२२५?−१२७४) याच्या विचारसरणीत ख्रिश्चन गूढवादाचा परमोत्कर्ष झाला. त्यानेही वासनाक्षयाने व तत्त्वचिंतनाने चित्तशुद्धी करून मनुष्याने ईश्वराशी एकरूप होण्याची इच्छा धरावी, असे प्रतिपादिले. त्याच्या तत्त्वज्ञानावर ॲरिस्टॉटलच्या तत्त्वमीमांसेचा प्रभाव पडलेला दिसतो.
मध्ययुगीन ख्रिश्चन तत्त्वज्ञानात गूढवाद हा छायेप्रमाणे अखंड वावरत होता. शुष्क तार्किक विचारसरणी ईश्वरी ज्ञान प्रदान करावयास असमर्थ बनली की, गूढवादी ख्रिश्चन विचारवंत पुढे येत आणि भावनांकित श्रद्धेच्या बळावर ईश्वराप्रत पोहोचण्याचा मार्ग दाखवून देत. माइस्टर एक्हार्ट (१२६०−१३२७), याकोब ब्योम (१५७५−१६२४), स्वीड्नबॉर्ग (१६८८−१७७२), केंब्रिज प्लेटॉनिस्ट्स (सतरावे शतक) आदी नावे या संदर्भात ठळकपणे नजरेत भरतात.
प्रत्यक्षात गूढवाद हा अनेकदा प्रस्थापित ख्रिश्चन धर्मव्यवस्थेला विरोधी ठरला. या धर्मव्यवस्थेची शिकवण अशी होती की, मानवाचे जीवन पापमूलक असून देवा-मानवामधले अंतर तोडणे अशक्यप्राय आहे. पण पोप आदी धर्मगुरूंच्या मध्यस्थीने मात्र देवाजवळ जाता येते. याच्या उलट गूढवादी विचारवंत म्हणत की, पोपमहाशयांच्या मध्यस्थीविनादेखील व्यक्तीला ईश्वरी साक्षात्कार होऊ शकतो. ख्रिश्चन धर्मसंस्थेच्या मते, अमृतसुखाची प्राप्ती परलोकात पवित्र देवदूतांनाच होऊ शकते; ती या पृथ्वीतलावर पापी मानवास होणे शक्य नाही. परंतु गूढवादी विचारवंत आपणास ईश्वरी दृष्टान्त झाल्यामुळे स्वर्गीय सुख मिळाल्याचा दावा करीत. गूढवादी मनुष्य स्वतः अशिक्षित असला, तरी गूढानुभूती प्राप्त झाल्यावर स्वतःस सुशिक्षित पाद्यांपेक्षाही शहाणा समजत असे. आपल्या उज्ज्वल अनुभूतीच्या बळावर ‘परमेश्वराची लाडकी बाळे’ आपली एक स्वतंत्र, पवित्र संघटना स्थापन करीत. पोपच्या सत्तेला भीक घालीत नसत. प्रचलित ख्रिश्चन कर्मकांडास महत्त्व देत नसत. त्यांना साहजिकच सनातनी धर्ममार्तंडांच्या हातून विरोध व छळ सहन करावा लागे. आपणास ईश्वरी दृष्टान्त झालेला आहे, असा दावा सांगणारे अनेक लोक धर्माधिकाऱ्यांच्या रोषास बळी पडून अग्निज्वाळात नष्ट झाले, हे इतिहासाला विश्रुत आहे.
भारतीय विचार : भारतीय तत्त्वज्ञान हे धर्माला आधारभूत असून गूढवादास पोषक आहे. अद्वैत वेदान्ताने सांगितलेले मायावाद आणि अद्वैतवाद हे दोन सिद्धान्त आपोआप गूढवादाकडे झुकतात. इंद्रियगोचर सृष्टी ही केवळ माया आहे असे मानले की, मन आपोआप सत्यस्वरूप परब्रह्माकडे धाव घेऊ लागते. सान्त हे सारे असार आहे असे वाटू लागले की, चित्ताला अनंताची ओढ जाणवू लागते आणि सगळीकडे एकच मूळ तत्त्व भरलेले असून द्वैतास कुठेच थारा नाही असे गृहीत धरले की, मग त्या अंतिम तत्त्वात सारे स्वत्व विसरून व अहंकार झाडून टाकून विलीन होण्याची इच्छा निर्माण होते.
भारतीय तत्त्वज्ञानात ब्रह्मप्राप्तीचे गूढवादी उद्दिष्ट उपदेशिलेले आहे. ब्रह्मप्राप्तीचा मार्ग हा दुःख विमोचनाचा मार्ग होय. या मार्गाने गेल्यास मनाच्या आधिव्याधी दूर होतात. अशा प्रकारची शिकवण ही एक प्रकारे मानसोपचार पद्धती ठरते. भारतीय तत्त्वज्ञानाने ज्ञानप्राप्ती आणि मानसोपचार यांमध्ये अविभाज्य संबंध कल्पिलेला आहे. विद्या ही विमुक्तीसाठीच असते, असा त्याचा आग्रह आहे. त्याने व्यक्तिगत अनुभूतीला विशेष प्राधान्य दिलेले आहे; पण पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाने वस्तुनिष्ठ सत्यास शिरोधार्थ मानलेले आहे.
ब्रह्मपदी विलीन होण्याचे उद्दिष्ट साध्या होण्यासाठी विशिष्ट योगिक साधना करावी लागते. तिचे भारतीय तत्त्ववेत्त्यांनी सविस्तर वर्णन केलेले आहे. तसेच ब्रह्मभेटसूचक समाधीच्या विविध अवस्थांचीही त्यांनी तपशीलवार माहिती दिलेली आहे.
भारतीय गूढवाद हा कधी विश्व-ईश्वर-ऐक्यवादाशी, तर कधी ईश्वरवादाशी निगडित झालेला दिसतो. व्यक्तीने ज्यात विलीन व्हावयाचे असते त्याचे वर्णन निर्गुण, निराकार, भावशून्य ब्रह्मतत्त्व असेही केलेले आहे आणि सगुण, भक्तवत्सल ईश्वर असेही केलेले आहे. उपनिषदांची शिकवण प्रायः बुद्धिनिष्ठ विश्व-ईश्वर-ऐक्यवादी आहे. तेथे मुख्यत्वेकरून ज्ञाता आणि ज्ञेय वस्तू यांचे नाते वर्णिलेले आहे. भक्त आणि देव यांचे नाते सांगितलेले नाही. परंतु भगवद्गीतेत आणि तत्त्वज्ञानी-संतांच्या शिकवणीत भक्तिमार्ग प्रशंसिलेला आहे. भक्तिमार्ग हा भावनांनी भरलेला, प्रेमाने ओथंबलेला पंथ आहे. प्रेयसीला प्रियकराची, तद्वत् भक्ताला देवाची ओढ लागली पाहिजे, अशी त्याची शिकवण आहे.
गूढवाद : काही चिकित्सक विचार : ‘गूढवाद’ हे पद व्यवहारात अत्यंत शिथिल आणि हानिकारक ठरलेले आहे. गूढवादाच्या नावाखाली जादूटोणा, जंतरमंतर, गुप्त विद्या, अद्भुत ऋद्धिसिद्धींची प्राप्ती, बीभत्स कर्मकांड, कल्पनारम्य भावनाविलास, भोंगळ चैतन्यवाद, दांभिक भोंदूगिरी इ. पुष्कळ गोष्टी खपविल्या जातात. संदिग्ध, बुद्धीला न कळणारे, भावनांना जाणवणारे, असे काही तरी दर्शविण्यासाठी गूढवाद या पदाचा उपयोग केला जातो. त्यामुळे प्रश्न पडतो की, खरा सत्यस्पर्शी गूढवाद आणि अन्य खोटी सोंगे या दोहोंमधला फरक कसा ओळखावयाचा? खऱ्या आध्यात्मिक गूढानुभूतीची कसोटी कोणती? मद्यप्राशनाच्या नशेप्रमाणे किंवा मनोविकृतिमूलक आभासांप्रमाणे तथाकथित दैवी अनुभूती ही एक निव्वळ भ्रांती नसेल कशावरून?
गूढवादात प्रत्यक्षानुभूतीची तरफदारी आणि तर्कबुद्धीची अवहेलना केलेली असते; परंतु तर्कबुद्धीशी प्रतारणा करणे श्रेयस्कर नव्हे; कारण खऱ्या-खोट्याचा निर्णय फक्त तर्कबुद्धीच्याच मदतीने करता येतो. तिजवर बहिष्कार न टाकता, तिच्या साहाय्यानेच गूढवादी भूमिकेचे समर्थन केले पाहिजे. तर्कबुद्धीच्या मदतीने शक्य तेवढे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे आणि आता यापुढचे काही कळेनासे झाले आहे असे तिने म्हटले की, मग गूढवादास आवाहन करावे, हेच उचित होय. तर्कबुद्धीच्या मर्यादा तर्कबुद्धीला कळू शकतात. बुद्धिदत्त ज्ञान कदाचित गूढानुभूतिदत्त ज्ञानाहून कनिष्ठ प्रतीचे असेलही; पण म्हणून तर्कबुद्धीकडे सर्वस्वी दुर्लक्ष करणे योग्य नव्हे. वरच्या पातळीवर जाण्यासाठी कनिष्ठ पायरी ओलांडणे आवश्यक असले, तरी त्या पायरीची संपूर्ण उपेक्षा करणे हिताचे नाही.
गूढानुभूती ही अनिर्वचनीय आणि अवर्णनीय असते; म्हणून तिच्याविषयी बोलताना गूढवादी विचारवंत कल्पनाशक्तीचा आसरा घेतात आणि आपला आशय काव्यमय, प्रतीकात्मक भाषेत व्यक्त करतात; परंतु प्रतीकांची भाषा ही हमेशा धोक्याची असते. सांगणाऱ्याचा आशय अशा भाषेत पूर्णतः सुस्पष्ट होत नाही आणि त्यामुळे गैरसमज पसरण्यास जागा राहाते.
संदर्भ :
- Arberry, A. J. Sufism : An Account of the Mystics of Islam, London, 1956.
- Butler, Cuthbert, Westren Mysticlsm, London, 1922.
- Dasgupta, S. N. Hindu Mysticism, London, 1927.
- Inge, W. R. Mysticism in Religion, London, 1907.
- James, William, The Varieties of Religious Experience, London, 1902.
- Leuba, J. H. The Psychology of Religious Mysticism, London, 1925.
- Otto, Rudolf, Mysticism, East and West, New York, 1932.
- Ranade, R. D. Indian Mysticism : Mysticism in Maharashtra, Pune, 1933.
- Russell, Bertrand, Mysticism and Logic, London, 1918.
- Stace, W. T. Mysticism and Philosophy, Philadelphia, 1960.
- Suzuki, D. T. Mysticism : Christian and Buddhist, London, 1957.
- Underhill, E. What is Mysticism, New York, 1936.
- Zahner, R. C. Mysticism : Scared and Profane, Oxford, 1957.
- https://plato.stanford.edu/entries/mysticism/