पदार्थप्रकाराविषयीच्या उपपत्तीचा स्पष्ट प्रारंभ ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. आपण वेगवेगळे शब्द किंवा शब्दप्रयोग एकत्र जोडून विधाने बनवितो. अशा शब्दप्रयोगांतून ‘काही’, ‘सर्व’, ‘नाही’ इ. तार्किक शब्दप्रयोग वगळले आणि उरलेले शब्दप्रयोग घेतले, तर त्यांतील प्रत्येकाकडून काहीतरी व्यक्त होत असते, निर्दिष्ट होत असते. हे जे शब्दप्रयोगाकडून निर्दिष्ट होत असते, हा जो पदार्थ असतो, तो कोणत्या तरी अंतिम पदार्थ प्रकारामध्ये मोडतो, असे ॲरिस्टॉटलचे म्हणणे आहे. उदा., ‘माणूस’ किंवा ‘टेबल’ ह्या शब्दाने जे निर्दिष्ट होते ते द्रव्य असते, ‘शहाणपण’ किंवा ‘रंग’ ह्या शब्दाने जे निर्दिष्ट होते तो गुण असतो. ॲरिस्टॉटलने अशा शब्दांनी निर्दिष्ट होणाऱ्या पदार्थांचे दहा अंतिम किंवा सर्वोच्च प्रकार मानले आहेत. ते असे : द्रव्य, परिमाण, गुण, संबंध, स्थान, काल, संस्थिती, अवस्था, प्रवर्तन आणि परकृतता (दुसऱ्याकडून वस्तूवर कार्य केले जात असण्याची वस्तूची अवस्था). उदा., माणूस हा एक प्राणी, म्हणजे (सजीव असलेली) भौतिक वस्तू, म्हणजे अखेरीस एक द्रव्य आहे. पांढरा हा एक रंग म्हणजे एक गुण आहे. लहान हे परिमाण आहे, अधिक बळकट असणे हा संबंध आहे, पलीकडे हे स्थान आहे, उद्या किंवा १५ नोव्हेंबर १९७८ हा काल आहे, आडवा, उभा ही संस्थिती आहे, उष्ण ही अवस्था आहे, धावणे, विचार करणे हे प्रवर्तन आहे आणि मागे लोटले जाणे ही परकृतता आहे. पदार्थांचे असे दहा अंतिम प्रकार आहेत, असे ॲरिस्टॉटलने मानले असले, तरी सर्व पदार्थांचे ह्या दहांत आणि नेमक्या ह्या दहांत वर्गीकरण करता येते, असा त्याचा दावा नाही.

ज्या कोणत्याही गोष्टीचा आपण निर्देश करू तिला उद्देशून ह्या दहा पदार्थ प्रकारांपैकी कोणत्या तरी प्रकाराचे विधेयन करता येईलच, असे हे पदार्थ प्रकार आहेत. म्हणून ॲरिस्टॉटल त्यांना विधेयप्रकार म्हणतो. आता समजा माणूस हा पदार्थ आपण घेतला, तर तो द्रव्य ह्या प्रकारात मोडतो आणि ते विधेयही आहे. उदा., ‘देवदत्त माणूस आहे’ असे त्याचे विधेयन करता येते. पण देवदत्त हेही द्रव्य आहे आणि त्याचे मात्र विधेयन करता येत नाही. देवदत्त हे कशाचे विधेय होऊ शकत नाही. देवदत्त, हिमालय ह्यांसारख्या ज्या विशिष्ट वस्तू असतात, ज्यांच्या ठिकाणी विधेये असतात; पण जी कुणाची विधेये नसतात, त्यांना ॲरिस्टॉटल प्रथम द्रव्ये म्हणतो. माणूस, पर्वत ह्यांसारख्या गोष्टींना तो द्वितीय द्रव्ये म्हणतो. ही विधेये असतात व देवदत्त, हिमालय ह्यांसारख्या विशिष्ट वस्तू कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत, हे सांगणारी ती विधेये असतात. इतर पदार्थप्रकार विशिष्ट वस्तूच्या समग्र स्वरूपात कोणते घटक आहेत, उदा., विशिष्ट वस्तूच्या ठिकाणी कोणते गुण किंवा संबंध आहेत, तिची अवस्था काय आहे, हे सांगणारी विधेये असतात.

ॲरिस्टॉटलनंतर पदार्थप्रकारांचे विवेचन करणारा मोठा तत्त्ववेत्ता म्हणजे इमॅन्यूएल कांट (१७२४‒१८०४) हा होय. ॲरिस्टॉटलची पदार्थप्रकारांविषयीची जी संकल्पना होती तिच्याहून पूर्णपणे वेगळी अशी संकल्पना कांटने मांडली. कांटच्या म्हणण्याप्रमाणे आपला वस्तूविषयीचा अनुभव हा इंद्रियगोचर वस्तुंविषयीच्या निर्णयांच्या स्वरूपाचा असतो. आपल्याला इंद्रियसंवेदना लाभतात आणि त्यांच्यापासून अवकाश व काल ही पूर्वप्राप्त प्रतिमाने आणि ‘द्रव्य-गुण’, ‘कारण-कार्य’ इ. पूर्वप्राप्त संकल्पना ह्यांच्या साहाय्याने आपला अनुभव सिद्ध होतो. ह्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंचे स्वरूप इंद्रियसंवेदना, अवकाश व काल ही प्रतिभाने आणि पूर्वप्राप्त संकल्पना ह्यांनी घडविलेले असते. द्रव्य-गुण इ. ह्या पूर्वप्राप्त संकल्पना म्हणजेच पदार्थप्रकार होत. ह्या पूर्वप्राप्त संकल्पना किंवा पदार्थप्रकार आपल्या आकलन-शक्तीतून (Understanding) निःसृत होतात, पण ते इंद्रियगोचर वस्तूंचे स्वरूपही घडवितात. ‘द्रव्य-गुण’ इ.  पदार्थप्रकार कांटच्या मताप्रमाणे आकारिक असतात. ॲरिस्टॉटलचे पदार्थप्रकार म्हणजे पदांनी ज्यांचा आपण उल्लेख करतो, अशा सर्व गोष्टींचे अंतिम प्रकार होत. उदा., हे टेबल हे अंतिमतः द्रव्य ह्या पदार्थप्रकारात मोडते. कांटच्या म्हणण्याप्रमाणे ‘हे टेबल एक द्रव्य आहे’ ह्या प्रकारचे पदार्थांचे वर्गीकरण करणे हे ‘द्रव्य’ इ. पदार्थप्रकारांचे कार्य नसते. वस्तूंचा आपला अनुभव ‘हे टेबल काळे आहे’ ह्या प्रकारच्या निर्णयांच्या स्वरूपाचा असतो. ह्या अनुभवात किंवा निर्णयात ‘द्रव्य-गुण’ हा पदार्थप्रकार अनुस्यूत असतो. टेबल हे द्रव्य आणि काळे हा गुण ह्यांना एका अनुभवात, एका निर्णयात गुंफण्याचे कार्य करून हे काळे टेबल पाहण्याचा अनुभव तो शक्य करतो. आपल्या अनुभवाला व अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंना आकार देणे, हे पदार्थप्रकारांचे कार्य असते.

कांटच्या पदार्थप्रकाराविषयीच्या भूमिकेला जी. डब्ल्यू. एफ. हेगेल (१७७०‒१८३१) याने अधिक व्यापक स्वरूप दिले. पदार्थप्रकार हा विवेकशक्तीचे एक रूप असते व  ते अस्तित्वाचेही रूप असते. कांटच्या पदार्थप्रकारांप्रमाणे हे

गेलचे पदार्थप्रकार आकारिक नाहीत. ते आकारिक व आशयिक असे दोन्ही आहेत. प्रत्येक पदार्थप्रकार हा अनुरूप अशा आशयात मूर्त झालेला असतो आणि असा मूर्त पदार्थप्रकार हे अस्तित्वाचे एक विशिष्ट रूप असते. शिवाय जो पदार्थप्रकार अस्तित्वाचे समग्र व सम्यक स्वरूप ग्रहण करू शकत नाही, स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत नाही त्याची ही अपूर्णता त्याच्यात उद्‌भवणाऱ्या व्याघाताच्या स्वरूपात व्यक्त होते. असा पदार्थप्रकार स्वतःच्या विरोधी अशा पदार्थप्रकारात परिणत होतो आणि ह्या व्याघाताचे निराकरण ह्या दोन्ही परस्परविरोधी पदार्थप्रकारांचा स्वतःमध्ये सुसंगतपणे समावेश करून घेणाऱ्या पदार्थप्रकाराचा उद्‌भव होऊन होते. पदार्थप्रकारांचा अशा द्वंद्वात्मक पद्धतीने विकास होत होत ह्या विकसनाची परिणती केवल चित् ह्या पूर्णपणे सुसंवादी व समावेशक पदार्थप्रकारात होते. ही सर्वोच्च सत्ता.

पदार्थप्रकारांविषयीच्या कांटच्या उपपत्तीचा प्रभाव जसा हेगेलवर पडला आहे तसाच एटमुंट हुसर्ल (१८५९‒१९३८) आणि चार्ल्स सँडर्स पर्स (१८३९‒१९१४) ह्या तत्त्ववेत्त्यांनी पदार्थप्रकारांविषयी मांडलेल्या उपपत्तीवरही पडला आहे.

पदार्थप्रकारांविषयीच्या एका वेगळ्या प्रकारच्या उपपत्तीचा उगम बर्ट्रंड रसेल (१८७२‒१९७०) यांच्या आकारिक तर्कशास्त्रात आढळतो. ही उपपत्ती पदार्थांच्या प्रकारांविषयी न मांडता भाषिक प्रयोगांविषयी मांडण्यात येते. तिचा थोडक्यात आशय असा की, भाषिक प्रयोग-शब्द, शब्दसमूह हे वेगवेगळ्या तार्किक प्रकारांचे असतात आणि अर्थपूर्ण वाक्ये बनविण्यासाठी योग्य त्या तार्किक प्रकारांच्या भाषिक प्रयोगांची सांगड घालावी लागते. वेगवेगळ्या तार्किक प्रकारांच्या भाषिक प्रयोगांची अयोग्यपणे सांगड घातली, तर ती एक ‘पदार्थप्रकार-चूक’ (Category-Mistake) असते आणि बनणारे वाक्य व्याकरणदृष्ट्या ठीक असले, तरी अर्थशून्य असते. पण भाषिक प्रयोगांचे नेमकेपणे भिन्न तार्किक प्रकारांत वर्गीकरण करता येईल का आणि पदार्थ प्रकारांमधील किंवा तार्किक प्रकारांमधील भेदांचे समाधानकारकपणे स्पष्टीकरण करता येईल का, हा एक चर्चेचा प्रश्न झाला आहे.

भारतीय पदार्थप्रकार : पदार्थ ही संकल्पना ‘पदार्थ’ ह्या पदाने प्रथम कणाद (इ.स.पू.सु. सहावे शतक) याच्या वैशेषिक सूत्रांत निश्चितपणे वापरण्यात आली. अर्थबोधक शब्द म्हणजे पद होय. भाषेतील वर्ण किंवा वर्ण-समुदाय अर्थयुक्त असल्यास त्यास पद म्हणतात. मनुष्य आपली जाणीव वा विचार शब्दाने किंवा वाक्याने व्यक्त करतो. वाक्यामध्ये अनेक शब्द किंवा पदे असतात. मुनुष्याला स्वतःचे आणि विश्वाचे ज्ञान होत असते. ते तो पदाने वा वाक्याने व्यक्त करतो. या ज्ञानाचे असंख्य विषय असतात. त्या विषयांचे वाचक किंवा बोधक शब्दही असंख्य असतात. त्या सर्व असंख्य विषयांचे संपूर्ण वर्गीकरण करून संपूर्ण विश्वाचे किंवा अस्तित्वाचे तत्त्वज्ञान कणादाने जे मांडले त्यात विश्वाची सहा तत्त्वे ठरविली. त्या सहा तत्त्वांनाच सहा ‘पदार्थ’ असे म्हटले. ते म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. ‘श्वेत अश्व धावतो’ या वाक्यातील ‘अश्व’ या विशेष्य पदाने अश्व ही विशिष्ट व्यक्ती आणि अश्वत्व हा सामान्य धर्म बोधित केला आहे. येथे व्यक्ती हे द्रव्य होय.  या द्रव्याची जाती म्हणजे अश्वत्व हा सामान्य पदार्थ होय. ‘श्वेत’ या पदाने श्वेत हा गुण बोधित केला आहे. श्वेत गुणयुक्त आणि अश्वत्व या सामान्याने युक्त द्रव्य अशा ‘श्वेत अश्व’ या वाक्यांशाचा अर्थ झाला. ‘धावतो’ या पदाने वर्तमानकालीन धावणे हे कर्म बोधित केले. या वाक्यातील सर्व पदे एकवचनी व पुल्लिंगी आहेत. एकवचनाने एकत्व ही संख्या आणि लिंगवाचक प्रत्ययाने पुंल्लिंग बोधित केले आहे. संख्या हा गुण आणि पुल्लिंगत्व हा सामान्य धर्म सांगितलेला आहे. एकंदरीत या वाक्याने द्रव्य, गुण , कर्म आणि सामान्य हे चार पदार्थ बोधित केले. अश्व ह्या द्रव्याच्या ठिकाणी श्वेतगुण, धावनकर्म त्याचप्रमाणे अश्वत्व आणि पुल्लिंग हे सामान्य धर्म अविभाज्यपणे किंवा अपृथकत्वाने राहतात. हे अविभाज्यपणे ज्या संबंधाने राहतात, त्या संबंधास वैशेषिक दर्शनात ‘समवाय’ ह्या शब्दाने निर्दिष्ट केले आहे. अश्व हा पशू आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी पशुत्व हा गाय, बैल, हत्ती, हरिण इ. सर्व पशूंत राहणारा सामान्य धर्म आहे आणि अश्वत्व हा धर्म विशेष आहे. म्हणून यास ‘विशेष’ पदार्थ असेही वैशेषिक दर्शनाच्या दृष्टीने म्हणता येते; परंतु वैशेषिक दर्शनातील विशेष हे पद पारिभाषिकही आहे. या पारिभाषिक पदाने परमाणु, आकाश, काल, दिक्, आत्मे आणि मने या नित्य द्रव्यांच्या ठिकाणी त्यांचे अत्यंत पृथकत्व सिद्ध करणारे वैशिष्ट्य राहते; त्यास ‘विशेष’ हा पारिभाषिक शब्द वैशेषिक दर्शनाने लावलेला आहे. न्याय-वैशेषिक दर्शनांमध्ये वरील सहा भावपदार्थांबरोबरच भाषेतील नकारदर्शक पदाचा अर्थ अभाव हाही सातवा पदार्थ सातव्या शतकाच्या नंतर अंतर्भूत केला आहे.

प्रत्येक तत्त्वज्ञानात प्रतिपाद्य म्हणून अनेक मुख्य विषय असतात. त्या सर्व विषयांचे पारिभाषिक शब्दांनी वर्गीकरण केलेले असते. त्यास ‘पदार्थप्रकार’ असे म्हणता येते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात पदार्थप्रकारांच्या संदर्भात व्याकरण आणि पूर्वमीमांसा यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. व्याकरणात शब्दांचे म्हणजे पदांचे, त्यांच्या अर्थाचे संपूर्ण वर्गीकरण केलेले असते व त्यावरून व्याकरणाचे मुख्य नियम ठरविलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वमीमांसेमध्येसुद्धा वेदवाक्यांचा विचार करताना पदांच्या अर्थांचे संपूर्ण वर्गीकरण केलेले असते. वैशेषिक दर्शनातील पदार्थविचाराची संस्कृत व्याकरणशास्त्र आणि पूर्वमीमांसा ही पार्श्वभूमी आहे. पाणिनिव्याकरणाच्या पातंजल महाभाष्यात (इ.स.पू. दुसरे शतक) जातिशब्द, गुणशब्द, क्रियाशब्द आणि द्रव्यशब्द अशा प्रकारच्या संज्ञा वापरून शब्दार्थाचे वर्गीकरण केले आहे. पूर्वमीमांसेतदेखील द्रव्य, गुण, कर्म, जाती, व्यक्ती ही पदे वापरून कर्मकांडातील पदार्थांची विवरणे केली आहेत. म्हणून पूर्वमीमांसेतील भाट्ट संप्रदाय आणि प्रभाकर संप्रदाय हे दोन्ही वैशेषिक दर्शनातील द्रव्य, गुण, कर्म आणि सामान्य हे पदार्थ मान्य करून आपापली अधिक पदार्थसंख्या सांगतात.

सबंध विश्वाचे मूलभूत किती पदार्थांमध्ये वर्गीकरण करायचे, या संबंधाचा विचार ऋग्वेदापासून सुरू आहे. ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तात प्रारंभीच सत् व असत् असे दोन पदार्थ सांगून विश्वोत्पत्तीपूर्वी हे दोन्ही पदार्थ नव्हते, असे म्हटले आहे. प्राचीन उपनिषदांमध्ये एक सत् हाच पदार्थ सांगून त्याला ब्रह्म किंवा आत्मा या पदांनी निर्दिष्ट केले आहे आणि हा एकच पदार्थ बहुविध झाला आणि तेच सबंध विश्व होय, असे म्हटले आहे.

त्रिगुणात्मक प्रकृती आणि अगणित चैतन्यरूप आत्मे म्हणजे पुरुष असे दोनच पदार्थ मिळून विश्व होय, असे सांख्यदर्शनामध्ये सांगितले आहे. बौद्ध दर्शनात रूप, विज्ञान, वेदना, संज्ञा आणि संस्कार असे पाच स्कंध म्हणजे सबंध विश्व होय, असा सिद्धांत प्रतिपादिला आहे. स्कंध म्हणजे समुदाय. जैन दर्शनात जीव व अजीव असे विश्वाचे दोन विभाग करून हेच दोन पदार्थ मिळून विश्व होय, असे म्हटले आहे.

वेदान्त परंपरेमध्ये केवलाद्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत, शुद्धाद्वैत इ. अनेक तत्त्वदर्शने निर्माण झाली असून त्यांनी आपापली पदार्थसंख्या निश्चित केली आहे. केवलाद्वैतवादामध्ये एकच एक सच्चिदानंद परब्रह्म हाच सत्य पदार्थ मानला असून त्याच्या शिवाय बाकी माया होय, असे म्हणून त्या पदार्थांना मिथ्या किंवा असत्य ठरविले आहे. द्वैताद्वैतवादामध्ये ब्रह्म व त्याचा परिणाम असे दोन पदार्थ स्वीकारले आहेत. विशिष्टाद्वैतवादात चित्, अचित्, आणि परमेश्वर असे तीन पदार्थ मिळून विश्व होय, असे प्रतिपादिले आहे. काश्मीर शैव संप्रदायात शक्तियुक्त शिव हाच एक मूळ पदार्थ मानून त्यातून विश्वविस्तार झाला, असे सिद्ध केले आहे. शाक्त पंथात शिवसहित शक्ती हाच एक पदार्थ सांगून त्यातून विश्वविस्तार झाला, असे मत प्रतिपादिले आहे. मध्याचार्याच्या द्वैतवादामध्ये स्वतंत्र असा परमेश्वर आणि अस्वतंत्र (परमेश्वराधीन) असे बाकीचे जग, असे दोन पदार्थ मिळून विश्व होय, असा विचार सांगितला आहे. एक शैव दर्शन द्वैतवादी आहे; त्या दर्शनाप्रमाणे पती (परमेश्वर), पशू (जीवात्मे) आणि पाश (बाकीचे विश्व) असे तीन पदार्थ प्रतिपादिले आहेत. न्यायदर्शन वैशेषिक दर्शनाप्रमाणेच सहा किंवा सात पदार्थ मानते. नास्तिक चार्वाक दर्शन (लोकायत दर्शन) पृथ्वी, जल, तेज आणि वायू असे चारच पदार्थ मिळून विश्व होय, असे सांगते.

 

संदर्भ :

  • Ackrill, J. L. Aristotle’s Categories and De interpretatione, Oxford, 1963.
  • Aquinas, Saint Thomas, Summa Theologica, New York, 1948.
  • Bambrough, R. Ed. New Essays on Plato and Aristotle, London, 1965.
  • Barnes, J.; Schofield, M.; Sorabji, R. Eds. Articles on Aristotle : Vol 1. Science, London, 1975.
  • Bogen, James; McGuire, James E. Eds. How Things Are : Studies in Predication and the History of Philosophy, Dordrecht, 1985.
  • Brentano, Franz; George, R. Trans. On the Several Senses of Being in Aristotle, California, 1975.
  • Cohen, S. M.; Matthews, G. B. Trans. Ammonius : On Aristotle Categories, London, 1991.
  • Dillon, John, Trans. Dexippus : On Aristotle Categories, London, 1990.
  • Düring, I. Ed. Aristotle and Plato in the Mid-Fourth Century, Goteborg, 1960.
  • Furth, Montgomery, Substance, Form and Psyche : An Aristotelian Metaphysics, Cambridge, 1988.
  • Gaskin, R. Trans. Simplicius : On Aristotle’s Categories, London, 2000.
  • Graham, D. W. Aristotle’s Two Systems, Oxford, 1987.
  • Haaparanta, Leila; Heikki, J. Koskinen, Eds. Categories of Being : Essays on Metaphysics and Logic, Oxford, 2012.
  • Irwin, T. H. Aristotle’s First Principles, Oxford, 1988.
  • O’Meara, Dominic J. Ed. Studies in Aristotle, Washington, 1981.
  • Owens, Joseph, The Doctrine of Being in the Aristotelian Metaphysics, Toronto, 1978.
  • Rowan, J. P. Trans. Commentary on the Metaphysics of Aristotle, vols. 2, Chicago, 1961.
  • Shields, Christopher, Ed. Oxford Handbook of Aristotle, Oxford, 2012.
  • Smith, N. Kemp, Trans. Critique of Pure Reason, London, 1965.
  • Spade, Paul V. Trans. Five Texts on the Medieval Problem of Universals, Indianapolis, 1994.
  • Strange, Steven K. Trans. Porphyry : On Aristotle’s Categories, Ithaca, 1992.
  • Trendelenburg, Adolf, Geschichte der Kategorienlehre, Berlin, 1846.
  • Warnock, G. L. English Philosophy Since 1900, London, 1958.
  • https://link.springer.com/article/10.1007/s11245-006-9009-1
  • https://www.jstor.org/stable/20126736?seq=1
  • https://plato.stanford.edu/entries/categories/
  • https://study.com/academy/lesson/categories-by-aristotle-summary.html#:~:text=Now%2C%20Aristotle%20divides%20’things%20that,condition%2C%20action%2C%20and%20passion.&text=This%20is%20similar%20to%20a,for%20everything%20in%20the%20world