गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे विविचेन येथे प्रथम करण्यात आलेले आहे. त्यानंतर धर्मशास्त्र आणि तत्त्वमीमांसा यांमध्ये या संकल्पनेचे करण्यात आलेले विविध अर्थ आणि त्यांमधून निर्माण होणारे प्रश्न यांचे विविरण केलेले आहे.

तर्कशास्त्र आणि गणित ह्यांमधील ‘अनंत’ ही संकल्पना : अंनत म्हणजे अंत नसलेला. सामान्य व्यवहारात ज्याची गणती करणे अशक्यप्राय असते किंवा ज्याच्या वाढीला किंवा विस्ताराला शेवट नाही त्याला आपण ‘अनंत’ म्हणतो. पूर्णांक (१,२,३….अशा संख्या) किती आहेत ? या प्रश्नाचे उत्तर ‘अनंत आहेत’ असे आपण चटकन देतो; कारण कितीही मोठी संख्या घेतली, तरी तिच्या वरचढ मोठी संख्या असतेच व सर्वांत मोठी संख्या सांगणे केवळ अशक्य होय. तसेच सरळ रेषा कितीही वाढविली, तरी ती संपत नाही. दोन समांतर रेषा कितीही वाढविल्या, तरी एकमेकींस मिळत नाहीत; म्हणजेच ‘त्यांचा छेदनबिंदू अनंतस्थ आहे’ असे म्हणतात. पण एखादी संख्या खूप मोठी आहे एवढ्यावरून ‘ती अनंत आहेत’ असे म्हणता येणार नाही. जसे, समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचे कण किंवा रात्री आकाशात दिसणारे तारे हे अनंत (म्हणजे मोजण्यास जवळजवळ अशक्य) आहेत, असे सामान्यपणे म्हटले जाते; तरी ते तत्त्वत: अनंत नाहीत.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘अनंत’ ही संकल्पना : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ‘अनंत’ ही संकल्पना दोन स्वरूपात आढळते : (१) ग्रीक तत्त्वज्ञानात तिला जो अर्थ देण्यात आला आहे, त्या स्वरूपात आणि (२) ख्रिस्ती आणि आधुनिक तत्त्वज्ञानात ती ज्या अर्थाने वापरण्यात येते, त्या स्वरूपात.

(१) ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अनंत ही संकल्पना प्रथम ॲनॅक्झिमँडर (इ.स.पू.सु. सहावे शतक) ह्या तत्त्ववेत्याने मांडली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे दृश्य विश्वाचे घटक असलेली विवक्षित स्वरूपाची मूलतत्त्वे (जल, वायू इ.) एका अनंत अशा द्रव्यातून उगम पावतात आणि त्याच्यात विलीन होतात. हे द्रव्य अनंत असते. ह्या म्हणण्याचा मुख्य अर्थ असा की, त्याचे स्वरूप अमर्यादित ‘निर्विशेष’ असते. पस्परविरोधी स्वरूपाची विविक्षित तत्त्वे त्याच्यातून उदयाला येत असल्यामुळे ह्या मूलद्रव्याचे स्वत:चे स्वरूप विविक्षित असू शकत नाही. विचाराचे हेच सूत्र पकडून पायथॅगोरसने वस्तूच्या मूळच्या ‘अमर्यादित’ अनंत प्रकृतीली परिमित व म्हणून निश्चित, सुव्यवस्थित स्वरूप प्राप्त करून देणारे, ‘सीमा’ असे एक तत्त्व आहे, असे कल्पिले. सीमा हे रचनेचे, व्यवस्थेचे तत्त्व आहे आणि वस्तू सुरचित, सुव्यवस्थित असली, तर ती चांगली, शोभन असते. म्हणून सीमित वस्तू चांगली असते, असे असण्यात वस्तूचे कल्याण असते. प्लेटोनेही रचनेचे, व्यवस्थेचे, नियमनाचे सीमा हे तत्त्व आणि त्याला विरोधी असलेले असीम असे द्रव्य हे द्वंद स्वीकारले. प्लेटोने ह्या द्वंद्वाचा वेगवेगळ्या रीतींनी अर्थ लावला आहे. उदा., विवक्षित वस्तू, केवळ व्यक्ती ही असीम द्रव्यात मोडते; परंतु तिचे बुद्धिग्राह्य स्वरूप, ज्याच्यामुळे ती एका प्रकारची वस्तू असते ते, सीमेच्या तत्त्वाला अनुसरणारे असते. नैतिक क्षेत्रात माणसाची सुखाची वासना असीम द्रव्यात मोडते; परंतु सीमेच्या तत्त्वापासून निष्पन्न होणाऱ्या नैतिक नियमांनी ह्या इच्छांचे नियमन होणे आवश्यक असते. सारांश, ग्रीक तत्त्वज्ञानात अनंत ही संकल्पना ‘अमर्यादित, निर्विशेष, निराकार असे द्रव्य’ ह्या अर्थाने वापरतात. उलट रूप, आकार नेहमी सीमित व सान्त असतो. ह्याचा अर्थ असा की, अनंत असणे ही श्रेयस्कर गोष्ट नव्हे. जे द्रव्य स्वत: सुव्यवस्थिच असू शकत नाही आणि सुव्यवस्थित व म्हणून श्रेयस्कर, स्वरूप प्राप्त होण्यासाठी ज्याला स्वत:हून वेगळ्या अशा सीमेच्या तत्त्वाची अपेक्षा असते, असे द्रव्य म्हणजे अनंत द्रव्य. उदा., ईश्वराला अनंत हे विशेषण लावता येणार नाही. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात ईश्वराचे स्वरूप सीमेच्या तत्त्वाचा आदर करणारा आणि ह्या तत्त्वाला अनुसरून अव्यवस्थित, अनंत द्रव्यापासून सुव्यस्थित विश्वाची रचना करणारा विधाता, असे आहे. अनंत द्रव्य ईश्वराला परके आहे. मर्यादा, सीमा हे तत्त्व ईश्वराला समीप, त्याच्याशी सरूप आहे.

(२) ख्रिस्ती तसेच आधुनिक तत्त्वज्ञानात अनंत ह्या संकल्पनेला वेगळा अर्थ देण्यात आला आहे. ज्या वस्तूचे अस्तित्व इतर वस्तूंकडून मर्यादित झालेले असते, अशी वस्तू म्हणजे सान्त वस्तू. सान्त वस्तूचे अस्तित्व दोन रीतींनी मर्यादित झालेले असते. एक तर तिचे अस्तित्व अन्य वस्तूच्या अस्तित्वावर अवलंबून असते आणि ह्या अर्थाने ते मर्यादित असते. दुसरे असे की, अन्य वस्तूंना अस्तित्व असल्यामुळेही सान्त वस्तूचे अस्तित्व मर्यादित असते. सान्त वस्तू म्हणजे केवळ एका प्रकारचे अस्तित्व. त्याहून अस्तित्वाचे अन्य प्रकार असल्यामुळे तिचे अस्तित्व ह्या इतर प्रकारच्या अस्तित्वांनी मर्यादित असते. उलट अनंत अस्तित्व हे संपूर्णपणे स्वावलंबी, स्वायत्त, स्वाधिष्ठित असते व इतर अस्तित्वे त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणून ते इतर अस्तित्वांकडून मर्यादित नसते. शिवाय ते अस्तित्वाचा एक प्रकार नसते, तर अस्तित्वाच्या सर्व शक्यता अनंत अस्तित्वात नि:शेषपणे व्यक्त, फलद्रूप झालेल्या असतात. असे अनंत अस्तित्व म्हणजे ईश्वर किंवा कैवल्य. अनंत अस्तित्व आणि सान्त अस्तित्व ह्यांच्या परस्परसंबंध कसा लावावयाचा, हा मध्ययुगीन व आधुनिक तत्त्वज्ञानातील एक कूट प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला दोन प्रकारची उत्तरे मिळतात. एक अंतर्शायीवादी. ह्या विचारसरणीप्रमाणे विश्वातील प्रत्येक वस्तू जरी सान्त असली, तरी ह्या वस्तूंचा संपूर्ण समूह किंवा संपूर्ण व्यवस्था ही एका स्वायत्त, परिपूर्ण अशा तत्त्वाचा आविष्कार आहे. हे स्वायत्त (म्हणून अनंत) अस्तित्व ज्याच्यात नि:शेषपणे आविष्कृत झाले आहे, असे हे विश्व अनंत आहे. हे विश्व सान्त आहे आणि अनंत अस्तित्व त्याच्या पलीकडे आहे, असे नव्हे. विश्व हे अनंत तत्वाची केवळ अभिव्यक्ती आहे, पण विश्वरूपाने व्यक्त झाल्याशिवाय अनंत अस्तित्व राहू शकत नाही व म्हणून अनंत व सान्त वस्तू परस्परावलंबी आहेत. स्पिनोझा (१६३२—१६७७) व हेगेल (१७७०—१८३१) ह्या तत्त्ववेत्यांनी हा दृष्टिकोन स्वीकारला आहे; तथापि ह्या तत्त्वेवेत्त्वांच्या भूमिकांत महत्त्वाचे भेदही आहेत. दुसऱ्या प्रकारचे उत्तर म्हणजे अतिशायीवादी उत्तर. ह्या भूमिकेप्रमाणे विश्व सान्त आहे आणि स्वत: पलीकडल्या अनंत अस्तित्वावर सर्वस्वी अवलंबून आहे. उलट सान्त विश्वापलीकडचे हे अनंत तत्त्व संपूर्णपणे स्वायत्त आहे. विशेषत: खिस्ती धर्मशास्त्रज्ञांनी व त्यांच्यापासून स्फूर्ती घेतलेल्या तत्त्ववेत्यांनी ही भूमिका स्वीकारली आहे. अनंत अस्तित्वात अपेक्षित असलेली परिपूर्णता आणि विश्वाची अपूर्णता ह्यांच्यात सुसंगती कशी साधायची, ही अंतर्शायीवादातील प्रमुख अडचण आहे. अतिशायितावादाची अडचण वेगळी आहे. सान्त वस्तूंच्या सर्वस्वी पलीकडचे असे अस्तित्व अनाकलनीय ठरणार; कारण ज्या संकल्पनांच्या साहाय्याने आपण त्याचे आकलन करू पाहू, त्या सान्त वस्तूंना अनरूप असल्यामुळे अनंत तत्त्वाला लावता येणार नाहीत. म्हणून सर्वस्वी अनाकलनीय असे अनंत तत्त्व असून नसल्यासारखे होईल. विश्वाचे स्वरूप समजून घेताना ह्या तत्त्वाचे प्रयोजन उरणार नाही.

हे विश्व म्हणजे इंद्रियगोचर वस्तूंचा समूह किंवा मालिका एवढेच जे तत्त्ववेते मानतात, त्यांच्या दृष्टीने अनंत ही संकल्पना अवकाश, काल, संख्या इत्यादींच्या स्वरूपाचे वर्णन करतानाच काय ती आवश्यक असते. अनंताची ही संकल्पना म्हणजे गणितात जिचे विश्लेषण व निरूपण करतात ती संकल्पना होय.

भारतीय तत्त्वज्ञानातील ‘अनंत’ ही संकल्पना : भारतीय तत्त्वाज्ञानातील अनंत संकल्पना प्रथम उपनिषदांत आली आहे. तैत्तिरीयोपनिषदात ब्रह्याचे स्वरूप ‘सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म’ ब्रह्म हे सत्य, ज्ञान व अनंत होय, अशा प्रकारे वर्णिले आहे. छांदोग्योपनिषदात ‘अनंत’ पदाचा पर्यायशब्द ‘भूमा’ हा सांगितला आहे, असे शंकराचार्य म्हणतात. ‘भूमा’ची व्याख्या तेथे ‘यत्र नान्यद्विजानाति’ – ‘जेथे एकाहून दुसरे असे जाणले जात नाही ते भूमा’ अशी केली आहे. म्हणजे घट, पट इ. वस्तूंचा भेद जेथे मावळतो अशी वस्तू. शकराचार्यांनी ‘जी वस्तू कशापासूनही वेगळी नाही ती अनंत होय’, अशी अनंताची व्याख्या केली आहे. ‘वेगळेपणा’ म्हणजेच अंत; तो जेथे नाही ते अनंत.

शंकराचार्यांनी देशत:, कालत: व वस्तूत: अशी ब्रह्माची त्रिविध अनंतता सांगितली आहे. आकाश नाही असा प्रदेशच नाही, म्हणून आकाश देशत: अनंत होय. परंतु आकाश हे कार्य आहे, ते उत्पन्न होते, म्हणून आकाशाला कालत: अनंतता नाही. जे उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही, ते कालत: अनंत होय; ब्रह्म असे अनंत आहे. ‘अ’ व ‘ब’ अशा दोन वस्तू आहेत असे म्हटले तर ‘अ’ नव्हे तो ‘ब’ व ‘ब’ नव्हे तो ‘अ’; ‘अ’ला ‘ब’ने मर्यादा पडते व ‘अ’ ने ‘ब’ला मर्यादा पडते. ‘ब्रह्म’ ही एकच वस्तू आहे, अन्य सर्व मिथ्या आहे; म्हणून ब्रह्म हे वस्तुत: अनंत होय.

‘अनंत’ शब्दाने व्यक्त होणारी देशत: अनंतता वैशेषिक दर्शनात ‘विभु’ या पदाने व्यक्त केली आहे. आकाश, काल, दिक् व आत्मा ही विभु द्रव्ये आहेत. विभु म्हणजे सर्व मूर्त द्रव्यांशी संयुक्त. याच दर्शनात नित्य व अनित्य असे द्रव्यांचे वर्ग पाडले आहेत. नित्य म्हणजे कालत: अनंत उत्पत्ती व विनाश नसलेले. परमाणू, आकाश, काल, दिक् व आत्मा हे नित्य होत.

हे वस्तुमात्र बोद्ध विनाशी व क्षणभंगुर मानतात. परंतु वस्तूंचा कार्यकारणभावाने निर्माण होणारा प्रवाह अनादी मानतात. ते निर्वाण म्हणजे मोक्ष नित्य मानतात.

संख्याविषयक अनंतता भारतीय तत्त्वज्ञानात ‘अगण्य’ वा ‘असंख्य’ शब्दांनी व्यक्त करतात. परंतु अनंत नामक संख्या भारतीयांच्या साहित्यात निर्दिष्ट केलेली आढळत नाही.

जैन तत्त्वज्ञानाप्रमाणे कर्मबंधातून मुक्त जीवाच्या ठिकाणी अनंतचतुष्ट्य (चार अनंतगुण) म्हणजे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख व अनंत वीर्य असे व्यक्त होतात. विविध कर्मबंध असेपर्यंत हे जीवाचे गुण आवृत म्हणजे झाकून गेलेले असतात.

संदर्भ :

  • Copleston, Frederick, A History of Philosophy, vol. VII, London, 1963.
  • Cornford, F. M. Principium Sapientia, Cambridge, 1952.
  • Courant, R.; Robbins, H. What is Mathematics, New York, 1961.
  • Dantzig. T. Number the Language of Science, London, 1947.
  • Farrer, A. M. Finite and Infinite, London, 1943.
  • Hack-forth, R. Plato’s Examination of Pleasure, Cambridge, 1945.
  • Newman, J. R. World of Mathematics, Vol. II, New York, 1956.