सॉलोमन, ग्लॅडस्टन : ( २४ मार्च १८८० – १८ डिसेंबर १९६५ ). ब्रिटिश लष्करी अधिकारी व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या भारतातील विख्यात कला शिक्षणसंस्थेचे संचालक. त्यांचे पूर्ण नाव विल्यम इव्हर्ट ग्लॅडस्टन सॉलोमन (William Ewart Gladstone Solomon). त्यांचा जन्म केपटाउन (दक्षिण आफ्रिका) येथे झाला. त्यांचे कुटुंबीय इंग्लंडमधील गोल्डर्स ग्रीन या लंडनच्या उपनगरातील प्रतिष्ठित रहिवासी होते. त्यांचे वडील सॉल सॉलोमन एक प्रभावशाली राजकीय नेते होते. त्यांच्या आईचे नाव जॉर्जियाना. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्लॅडस्टन यांनी लंडनमधील रॉयल अकादमीमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी अकादमीचा अभ्यासक्रम उत्तमरीत्या पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.
सॉलोमन पहिल्या महायुद्धात सैनिकी कामगिरीवर हिंदुस्थानात आले व त्यांनी कॅप्टन या पदापर्यंत बढती मिळवली. हिंदुस्थानातील वास्तव्यात त्यांना येथील निसर्ग, लोककला व संस्कृती यांविषयी आकर्षण निर्माण झाले. युद्ध संपले तेव्हा ते पुण्यात होते. त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरांजवळ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये संचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आपले मनोगत व्यक्त केले. त्याप्रमाणे त्यांची नेमणूक झाली (२९ नोव्हेंबर १९१९).
१९१९ साली मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये होगार्थ आणि केबल हे दोन ब्रिटिश शिक्षक होते. या दोघांनी सॉलोमन यांना संस्थेतील शिक्षणपद्धतीबाबत माहिती दिली. दृश्यकलेच्या शिक्षणामध्ये चांगले बदल घडवून रॉयल अकॅडमीच्या तोडीचे कलाकार तयार करण्याचा सॉलोमन यांचा मानस होता. त्यावेळी संस्थेत एल. एन. तासकर, तलवाडकर, एम. व्ही. धुरंधर, जी. एच. नगरकर, फर्नांडिस, अनंत अत्माराम भोंसुले इत्यादी कलाकार कलाशिक्षणाचे काम करीत होते. या गुणी शिक्षकवर्गास सूचना देऊन सॉलोमन यांनी संस्थेत नवनवीन कल्पना राबविण्यास सुरुवात केली.
१९०५ ते १९२० या कालावधीत हिंदुस्थानातील कलाशिक्षण गोंधळलेल्या स्थितीत होते. बाँबे स्कूलवर पाश्चिमात्य शैलीचा पगडा होता. तर बंगाल स्कूलवर पौर्वात्य कलेचा परिणाम होता. सॉलोमन यांच्या कारकीर्दीत भारतीय शैलीच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली. भारतीय संस्कृती व कलाशैली जोपासण्याच्या दृष्टीने या चळवळीने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सॉलोमन यांची संचालक पदाची कारकीर्द खूप गाजली. या कालावधीत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. त्यांनी संस्थेत अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे ही संस्था भारतभर विख्यात झाली. १९२० मध्ये त्यांनी भित्तिचित्र सजावटीचा (म्यूरल डेकोरेशन) अभ्यासवर्ग सुरू केला. बाँबे रिव्हायव्हलिस्ट स्कूल या संप्रदायाच्या शैलीत तेथील विद्यार्थ्यांनी चित्रे काढण्यास आरंभ केला व त्यातून एक नवीन भारतीय शैली निर्माण झाली. या कलाशिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी पाश्चिमात्य आणि भारतीय शैलीतही प्रावीण्य संपादन केले.
पाश्चिमात्त्य शैलीतील मानवाकृतींचे भारतीय शैलीत लयपूर्ण आरेखन व त्यात जलरंगाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर यांचा सुरेख संगम तेथील विद्यार्थ्यांच्या कलाकृतीतून प्रत्ययास येत असे. सॉलोमन यांनी चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष नग्न प्रतिमानावरून (न्यूड मॉडेल) अभ्यास करण्यासाठी ‘न्यूड लाइफ क्लास’ सुरू केला. त्यामुळे प्रत्यक्ष मानवी शरीरावरून रेखाटन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सॉलोमन यांनी ‘इंडियन डेकोरेटिव्ह पेंटिंग’ या विषयाचा स्वतंत्र वर्ग सुरू केला. या वर्गात प्रामुख्याने भित्तिचित्रांचा आविष्कार व अभ्यास झाल्याने तो भित्तिचित्र अभ्यासवर्ग (म्यूरल क्लास) म्हणून ओळखला जाऊ लागला. विद्यार्थ्यांची अंगभूत असलेली क्षमता व निसर्गाच्या अभ्यासाचा मेळ त्यांच्या कलाकृतींतून दिसू लागला. सॉलोमन स्वत: त्यांना मार्गदर्शन करत व प्रोत्साहन देत. कलादेव्या: प्रतिष्ठा हे भित्तिचित्र त्यांनी जे. जे. स्कूलच्या मध्यवर्ती दालनाच्या भिंतीवर ३३’×२२’ (सुमारे १०.०५ मी. × ६.७० मी.) या आकारात करून घेतले. गव्हर्नर लॉर्ड लॉईड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
विख्यात चित्रकार व जेजेमधील प्राध्यापक प्र. अ. धोंड आपल्या रापण (१९७९) या ग्रंथात म्हणतात, ‘‘तत्कालीन परिस्थितीत गोरे वरिष्ठ अधिकारी हिंदी माणसाला सहसा जवळ करीत नसत किंवा त्यांची कदरही करीत नसत. पण सॉलोमननी मात्र भारतीयांवर खरेच प्रेम केले. भारतीय चित्रकलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, एक संपूर्ण पिढी ते संस्कार घेऊन बाहेर पडली. जेजे भारतीय, तेते सर्व समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला व त्याला प्रोत्साहन दिले.’’
सॉलोमन यांच्या कार्यकाळातच १९२९ च्या दरम्यान दिल्लीच्या रायसीना हिलवरील सेक्रेटेरिएट (सचिव मंडळ) इमारतीचे अत्यंत महत्त्वाचे काम या कलासंस्थेस मिळाले. संस्थेतील विद्यार्थी कलावंत व निष्णात कलाशिक्षकांनी ते पूर्ण केले. अनेक ललित कलांवरील भित्तिचित्रे व घुमटांमध्ये भारतातील वेगवेगळ्या आठ कालखंडांमधील भारतीय शैलींतील प्रतिकात्मक देवदेवतांच्या रंगविलेल्या आकृती लक्षणीय आहेत. सॉलोमन यांनी म्यूरल पेंटिंग्ज ऑफ द बाँबे स्कूल (१९३०) या आपल्या ग्रंथामध्ये या चित्रांच्या संकल्पना अधिक स्पष्टपणे मांडल्या आहेत. सॉलोमन यांच्या कारकीर्दीतील हे एक महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते.
१९२९ मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या कलासंस्थेस स्वतंत्र कलाविभाग म्हणून मान्यता मिळाली. तेव्हा प्राचार्यपदी सॉलोमन यांचीच नेमणूक झाली. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी उत्तेजन दिले. त्यांतील अनेकजण पुढे प्रसिद्ध कलाकार म्हणून मान्यता पावले. १९३० मध्ये सॉलोमन यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे प्रदर्शन लंडनमधील इंडिया हाउस येथे भरविले.
१९३२ साली टॉमस कमिटी अहवालाच्या आधारे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही संस्था बंद करावी असा ठराव झाला. सॉलोमन यांना या समस्येलादेखील तोंड द्यावे लागले; तथापि समाजातील सर्व थरांतून जोरदार विरोध झाल्याने अखेर तो ठराव रद्द झाला. १९३५ मध्ये सॉलोमन निवृत्त झाले. त्यानंतर ते इंग्लंडला परत गेले.
केपटाउन येथे सॉलोमन यांचे निधन झाले.
संदर्भ :
- दिवाळी अंक, चिन्ह, २००७.
- धुरंधर, महादेव विश्वनाथ, कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे, १९४०.
- धोंड, प्र. अ., रापण, पुणे, १९७९.
- बहुळकर, सुहास, बॉम्बे स्कूल, २०१५.
समीक्षण : मनीषा पोळ