जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलाखालील भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. सध्याच्या युगात कोणताही देश ऊर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पाहणीनुसार विकसित देशांचा ऊर्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ऊर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत, चीन या देशांत दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लक्षणीय प्रमाणात वाढते आहे.
कार्बन डाय-ऑक्साइड कपात व साठवण : ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. या ज्वलनातून कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात जाण्यापासून रोखणाऱ्या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळशाच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डाय-ऑक्साइड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डाय-ऑक्साइड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डाय-ऑक्साइड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत.
अमाइन मार्जन (Amine scrubbing) : अमाइनयुक्त द्रावणांमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू विद्राव्य असतो. या द्रावणामधून कार्बन डाय-ऑक्साइड विलग करण्याच्या पद्धतीला अमाइन मार्जन म्हणतात. ऊर्जानिर्मिती संयंत्रामधून (Power Plant) उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड वायूची साठवण करण्याबाबत योग्य तरतूद करणे आवश्यक आहे.
नवीन प्रकारची इंधने : कार्बन डाय-ऑक्साइडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के) प्रदूषकांची निर्मिती होते. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन करतात. अभ्यासातील पहाणी नुसार ३३-३७ टक्के कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन हे वाहनांमुळे होत आहे. परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील CO2 रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इंधने शोधणे जेणेकरून या इंधनातून कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन होणारच नाही.
हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते. पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. हायड्रोजन हा हलका वायू असल्याने तो केवळ दाबाखाली साठवता येतो. अतिशय ज्वालाग्राही असल्याने याचे इंधन म्हणून वापरण्यावर बंधने आहेत.
जैविक इंधने : शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांतून निर्माण होणाऱ्या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने मुख्यत्वे सूर्य प्रकाशापासून होणाऱ्या प्रकाश संश्लषणातून तयार होता. या इंधनातून कार्बन डाय-ऑक्साइड ची निर्मिती अटळ असली तरी खनिज तेलांपासून अथवा कोळशापासून कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती टाळता येते.
अपारंपारिक ऊर्जास्रोत (Unconventional energy sources) : अपारंपारिक ऊर्जास्रोताच्या निर्मितीवर बहुतांशी देशांचा भर आहे. अपारंपारिक ऊर्जास्रोत म्हणजे ज्यात खनिज संपत्तीचा वापर केला जात नाही असे स्रोत. जलविद्युत, पवनचक्क्या, सौरऊर्जेचा विविध प्रकारे वापर, बायोगॅस निर्मिती, शेतीमालाचे वायूकरण (Gasification), भरती ओहोटीपासून जलविद्युत, हे काही अपारंपारिक ऊर्जास्रोत आहेत.
आर्थिक, कायदेशीर व सामाजिक उपाय : उत्सर्जनावर कर – हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा उत्तम उपाय आहे. हा कर सरळपणे इंधनावर लावला जाऊ शकतो किंवा इंधनाच्या वापरानंतर एखाद्या उद्योगाने किती हरितवायूंचे उत्सर्जन केले याचे गणित मांडून केला जाऊ शकतो.
निर्बंध लादणे – हरितवायूंचे उत्सर्जनांची पर्वा न करणारे देश अथवा उद्योग धंदे यांच्यावर आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरून त्यांना हरितवायूंची पर्वा करणे भाग पडेल असे काहीसे करणे.
संदर्भ :
- Joseph J. Romm, Climate Change, 2016.
- Naomi Klein, This Changes Everything : Capitalism vs. the Climate, Canada.