जागतिक तापमानवाढीसाठी वातावरणातील वायूंप्रमाणेच इतरही कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे.

  • जगाची वाढती लोकसंख्या : जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे.
  • सूर्याकिरणांची दाहकता : सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास त्यावेळचे जागतिक तापमान कमी जास्त होते. दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नसल्याने सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जबाबदार आहे.
  • ज्वालामुखींचे उत्सर्जन : ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखील जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखील होऊ शकतो. कारण वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण वाढते जे अतिनील किरणे (Ultraviolet Rays) शोषून घेण्यात कार्यक्षम असतात.
  • एल्-निनो परिणाम : पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृत्तालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवरील हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणामामुळे मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो. एल्-निनो परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षांपर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ – ९८ साली नोंदवला गेला होता.
  • औद्योगिक क्रांती : औद्योगिक क्रांती घडल्यावर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कोणताही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती होते. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डाय-ऑक्साइड वायूबरोबर काही कोळशामध्ये असलेल्या गंधक आणि त्याची संयुगे यांच्या ज्वलनाने सल्फर डाय-ऑक्साइडही हवेत मिसळू लागला. विसाव्या शतकात कोळशाबरोबर खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडची भर पडली. नैसर्गिक तेल आणि वायू इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले की वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडमध्ये भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला.

परिणाम : सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत.

हिमनद्यांचे वितळणे
  • हिमनद्यांचे वितळणे : जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांचे वितळणे चिंतेची बाब बनली आहे १९६० पर्यंत अफ्रिकेतील माऊंट किलिमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे. हिमालय, आल्प्स व रॉकी या महत्त्वाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्क्टिक व अंटार्क्टिका व ग्रीनलँडमध्ये असे प्रचंड हिमनग आहे. येथील हिमनग पाण्यावरील हिमनग व जमिनीवरील हिमनग अशा दोन प्रकारात विभागता येतील. आर्क्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलँड व अंटार्क्टिकामधील हिमनग हे जमिनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा पाण्यावर दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलँडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल व अंटार्क्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीवरील महासागराची पातळी २० मीटरने वाढेल. असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात राहणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयॉर्क, लॉस अँजेल्स व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. ज्या देशांची समुद्रासपाटीपासून उंची ०-५ मीटर इतकी आहे त्या देशांमधील बहुतेक भाग पाण्याखालीच असेल, उदा., बांग्लादेश व नेदरलँड. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार.
  • हवामानातील बदल : हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्ट पणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले किंवा अनुभवत आहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाऊस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हे देखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. यूरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रीवादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. त्याच वर्षी जुलै २६ रोजी मुंबईत व महाराष्ट्रात न भूतो अशा प्रकारचा पाऊस पडला होता.

संदर्भ :

  • Joseph J. Romm, Climate Change, 2016.
  • Naomi Klein, This Changes Everything : Capitalism vs. the Climate, Canada.