कपूर, जगत नराय( ७ सप्टेंबर १९२३ ते ४ सप्टेंबर २००२ ) 

कपूर यांचा जन्म दिल्ली येथे झाला. दिल्ली विद्यापीठातून गणित विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच्.डी. या पदव्या त्यांनी मिळवल्या. दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयात अध्यापन कार्य सुरू करून पुढे तेथे गणित आणि सांख्यिकी विभागप्रमुख, नंतर दिल्ली विद्यापीठात आणि आय.आय.टी. कानपूर येथे ज्येष्ठ प्राध्यापक तसेच मेरठ विद्यापीठाचे कुलगुरू या पदांवर काम केले. त्याशिवाय अमेरिकेतील कार्नेजी मेलन (Carnegie Mellon) आणि कॅनडातील मनिटोब (Manitoba) विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून कपूर यांनी काम केले.

अध्यापनाबरोबरच कपूर यांनी उपयोजित गणितात, विशेषतः द्रायूंचे गतिशास्त्र (Fluid Dynamics) या विषयात अनेक शोधलेख लिहिले. या संदर्भात द्रायूंच्या फवाऱ्याचे प्रवाह (flows of fluid jets) आणि घट्ट व चिकट संपीड्य द्रायूंचे प्रवाह (flows of viscous compressible fluids) यातील त्यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्रात अतिशय उपयोगी ठरले आहे, विशेषकरून शरीरातील रक्तदाब आणि वाहिन्यांमधून होणार्‍या रक्तप्रवाहाच्या अभ्यासासाठी.

वायूंचे गतिशास्त्र (gas dynamics), आघात तरंग (shock waves), चुंबकीय द्रवगतिशास्त्रातील प्रवाहमार्ग (hydromagnetic channel flows), आघात (shocks), अव्यवस्था (turbulence) आणि वंगण (lubrication) या विषयांवर लक्षणीय संशोधन केले. उष्णताक्षयमान, जे एखाद्या प्रणालीद्वारा केल्या जाणाऱ्या उपयुक्त कार्यात वाया जाणारी औष्णिक ऊर्जा मोजते, त्या उष्णता क्षयमानाचे इष्टतमीकरण (Entropy Optimisation) या क्षेत्रातही कपूर यांचे मौलिक संशोधन आहे.

गणिताशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये रुची असल्यामुळे कपूर यांच्या शोधलेखांचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. त्यांचे सुमारे ३०० शोधलेख प्रसिद्ध झाले असून त्यांमध्ये सामान्य लोकसंख्या गतिशास्त्रातील विविध प्रतिमाने (numerous models in general population dynamics) याखेरीज गणितीय जैविकअर्थशास्त्र (Mathematical Bioeconomics), जैवयामिकी (Biomechanics), आणि समाजशास्त्रे (Social Sciences), प्रवर्तन संशोधन (operational research), निर्णयशास्त्र (Decision Science) आणि अर्थविषयक गणित (Financial Mathematics) अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

प्रगत गणितातील अनेक पुस्तकांचे लेखन कपूर यांनी केले आहे. उदाहरणार्थ, एंट्रॉपी ऑप्टिमायझेशन प्रिन्सिपल्स विथ ॲप्लिकेशन्स, मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, मॅक्झिमम एंट्रॉपी मॉडेल्स मॅक्झिमम एंट्रॉपी मॉडेल्स इन सायन्स अँड इंजिनिअरींग आणि मेजर्स ऑफ इन्फर्मेशन अँड देअर ॲप्लिकेशन्स.

गणित शिक्षण या विषयातही कपूर यांनी बरेच काम केले. सजेस्टेड एक्सपेरिमेंटस इन स्कूल मॅथेमॅटिक्स, मॅथेमॅटिकल ऑलेम्पियाड प्रॉब्लेम्स, करंट इश्युज इन हायर एज्युकेशन इन इंडिया आणि करंट इश्युज इन वर्ल्ड हायर एज्युकेशन  ही त्यांची पुस्तके उपयुक्त ठरली आहेत.

याशिवाय महाविद्यालयीन गणिताची पाठ्यपुस्तके आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसाठी (National Council for Educational Research and Training) शालेय पाठ्यपुस्तके लिहिली. गणित शिक्षणासंबंधी अनेक लेख लिहून त्यांनी गणिताच्या प्रसाराला मोठा हातभार लावला.

ते मॅथेमॅटिक्स स्टुडंट, बुलेटिन ऑफ मॅथेमॅटिक्स ॲसोसिएशन ऑफ इंडिया आणि युजीसी जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स एज्युकेशन  या नियतकालिकांचे मुख्य संपादक होते.

कपूर यांना इंडियन सायन्स काँग्रेसचे चटर्जी पारितोषिक, मॅथेमॅटिकल ॲसोसिएशन ऑफ इंडिया यांचा प्रशंसनीय सेवा पुरस्कार, इंडियन नॅशनल सायन्स ॲकेडेमीची फेलोशिप, इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक्स, इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी अँड मॅथेमॅटिक्स सेक्शन ऑफ इंडियन सायन्स काँग्रेस यांचे अध्यक्षपद आणि इन्सा सिनियर सायंटिस्ट अशी सन्मानपदे मिळाली.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर