कोस्सेल, अल्ब्रेख्त : ( १६ सप्टेंबर १८५३ ते ५ जुलै १९२७ )

अल्ब्रेख्त कोस्सेल यांचा जन्म जर्मनीतील रोस्टोक येथे झाला. तरुण वयात रोस्टोकच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्रात आवड निर्माण झाली. १८७२ मध्ये त्यांनी नुकत्याच स्थापित झालेल्या स्ट्रासबर्ग विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासास सुरुवात केली. येथे त्यांना जैवरसायनशास्त्र विभागातील विभागप्रमुख फिलिक्स होप्पी सेयलेर यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले व त्यांना  फिलिक्स व इतर प्राध्यापक वाल्देयर, एन्टोन डी बेरी व अगस्त कुन्ड यांच्या व्याख्यानांनी आणि प्रात्यक्षिकांनी खूप प्रभावित केले. कोस्सेल यांनी त्यांचे शिक्षण रोस्टोक विद्यापीठात पूर्ण केले व १८७७ साली जर्मन वैद्यकीय परवाना मिळविण्यासाठीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

कोस्सेल यांनी १८७७ मध्ये स्ट्रासबर्ग विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम सुरू केले. १८६९ च्या सुरुवातीला फ्रेडरीक मिशेर नावाच्या फिलिक्सच्या माजी विद्यार्थ्यांनी टूबिंगेन विद्यापीठातल्या फिलीक्स प्रयोगशाळेत संशोधन करत असताना न्यूक्लिईन्सचा शोध लावला व रासायनिक प्रक्रियेद्वारे पू कोशिकांतून (Pus cells) न्यूक्लिईन वेगळे केले. सखोल अभ्यासातून मिशेर यांनी सिद्ध केलेकी न्यूक्लिईन्स हे फॉस्फेटयुक्त अतिआम्लीय आणि प्रथिनांपेक्षा वेगळाच रासायनिक गुणधर्म असणारे पदार्थ आहेत. नंतर कोस्सेल यांनी ही बाब स्पष्ट केली की न्यूक्लिईन हे पेशीकेंद्रात असतात आणि ते प्रथिन व अप्रथिन घटकांचे बनलेले असतात व या पदार्थांमध्ये जिवंत कोशिकांची जनुकीय माहिती संग्रहित असते ज्याला सध्या न्यूक्लिईक ॲसिड म्हणून ओळखले जाते. १८७८ मध्ये कोस्सेल यांनी डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी मिळविली आणि १८८३ मध्ये स्ट्रासबर्ग सोडून बर्लिन विद्यापीठातल्या रसायनशास्त्र विभागात संचालकपदी रुजू झाले. त्यांनी न्यूक्लिईक ॲसिडवरचे संशोधन सुरू ठेवत १८८५-१९०१ च्या दरम्यान त्यातल्या पाच घटकांचा शोध लावला व त्यांना थायमिन, एडीनीन, ग्वानिन, सायटोसिन, व युरासील अशी  नावे दिली.

सन १८९५ साली तेमरबर्ग विद्यापिठात भौतिकोपचार संस्थेचे संचालक व शरीरशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजु झाले. या  काळात त्यांनी प्रथिनांच्या रासायनिक रचनांचा अभ्यास सुरू केला व १८९६ साली प्रथिनांच्या संश्लेषणात सहभागी असणाऱ्या हिस्टीडीन नावाच्या अमिनो आम्लाचा शोध लावला. अर्जिनिन, हिस्टीडीन व लायसीनसारख्या अल्फा-अमिनो आम्लाच्या संख्यात्मक अलगीकरणाच्या प्रक्रियेवर महत्त्वाचे संशोधन कार्य केले. चहा व कॉफीमध्ये असणाऱ्या थियोफायलिन नावाच्या उपचारात्मक औषधाचे सर्वप्रथम अलगीकरण सुद्धा कोस्सेल यांनीच केले. सन १९०१ साली कोस्सेल यांनी हिडलबर्ग विद्यापीठाच्या हिडलबर्ग प्रथिने तपासणी संस्था येथे संचालकपदी कामास सुरुवात केली. त्यांच्या हिडलबर्ग विद्यापीठाच्या कार्यकाळात त्यांनी व त्यांच्या हेन्री ड्रीसड़ेल डॉकिन नावाच्या विद्यार्थ्याने अर्जिनिनला ऑर्निथिन व यूरियामध्ये विघटित करणाऱ्या अर्जिनेझची तपासणी केली. त्यांच्या शेवटच्या कार्यकाळा दरम्यान त्यांनी हिस्टोन व प्रोटामाईन नावाच्या प्रथिनांच्या रचनांचा लक्षणीय तपास करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी फ्लेविअनिक ॲसिडचादेखील शोध लावला. १९२३ साली त्यांना एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे आयोजित फिझिओलॉजिकल कॉंग्रेस जर्मनीचे प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आले. याच परिषदेत त्यांना एडिनबर्ग विद्यापीठातर्फे मानद पदवी देण्यात आली. १९२४ साली ते एमेरिटस प्राध्यापक झाले तरी हिडलबर्ग विद्यापीठात त्यांनी व्याख्यान देणे सुरू ठेवले. कोस्सेल हे रॉयल सोसायटी ऑफ सायन्स ऑफ उप्पसला व रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेससारख्या अनेक अकादमी, संस्था व सोसायटीचे सदस्य होते. त्यांना केंब्रिज, घेंट, सेंट एंड्रूस व डबलिनसारख्या विद्यापीठानकडून मानद डॉक्टरेटच्या पदव्या देण्यात आल्या. रोस्टोक विद्यापीठातल्या एका संस्थेच नाव कोस्सेल यांच्या नावावरून अल्ब्रेख्त कोस्सेल इन्स्टिट्यूट फॉर न्युरोरीजनरेशन असे ठेवण्यात आले.

कोस्सेल यांना १९१० साली शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या पेशी जीवविज्ञान व पेशीकेंद्रकाच्या रासायनिक रचनेच्या संशोधनासाठी तसेच केंद्रकाम्लाच्या अलगीकरण व वर्णनात्मक कामाबद्दल देण्यात आले.

त्यांची काही गाजलेली पुस्तके: Investigations into the nucleins and their cleavage Products, Text book for medical-chemical courses, The tissues in the human body and their microscopic investigation, The problems of Biochemistry, The relationship between chemistry and physiology.

छातीच्या दुखण्याने कोस्सेल यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे