क्रिस्तिआन, आइकमान :   (११ ऑगस्ट, १८५८  ते  ५ नोव्हेंबर, १९३०) क्रिस्तिआन आइकमान यांचा जन्म नेदरलँड्समधील नियकर्क येथे झाला. त्यांचे वडीलही क्रिस्तिआन आइकमान याच नावाने ओळखले जात होते. त्यांचे वडील शिक्षक होते. क्रिस्तिआन आइकमान द्वितीय यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. परंतु आर्थिक स्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.  क्रिस्तिआन आइकमान यांनी शेवटी ॲमस्टरडॅम विद्यापीठातील  लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून  वैद्यकीय शिक्षण घेतले. पदव्युत्तर पदवीसाठी  त्यांनी  चेतातंतूमधील आवेग निर्मिती आणि वहन यावर  काम केले व  एम. डी. पदवी मिळविली.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सैन्यदलातील शल्यतज्ज्ञ म्हणून नेमणूक इंडोनेशियामध्ये झाली. त्याकाळी इंडोनेशियाचा काही भाग डच अधिपत्याखाली होता. बेरी बेरीया रोगाशी त्यांचा परिचय प्रथम तेथे झाला.  तेथे त्यांनी पाहिले की प्रारंभी निरोगी डच सैनिकांना काही काळ इंडोनेशियात रहावे लागल्यावर चेतातंतू आणि स्नायूतंतू रचनेत  बिघाड, स्नायू दौर्बल्य, वेदना, संवेदना आकलनातील बिघाड, (cognitive dysfunction) आणि हृदयविकार अशा व्याधींना बळी पडावे लागे. ही  लक्षणे दाखवणाऱ्या रोगाला इंडोनेशियात बेरी बेरीहे नाव होते. बेरी बेरी हा मूळचा सिंहली भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आहे – कमालीचा दुबळेपणा.

दुर्देवाने क्रिस्तिआन यांना स्वत:ला गंभीर स्वरूपाचा मलेरिया झाल्याने बेरीबेरीचा पाठपुरावा न करता त्यांना जावा सोडून आजारपणाच्या रजेवर मायदेशी परत जावे लागले. मायदेशी त्यांनी जीवाणूशास्त्राचे शिक्षण घेतले. काही वर्षे ते बर्लिनमध्ये रॉबर्ट कॉक ह्या प्रख्यात जीवाणूशास्त्रज्ञाबरोबर काम करत होते. नंतर ते पुन्हा इंडोनेशियातील जावा बेटांवर (त्या काळातील नाव डच ईस्ट इंडीज) आले. पुढील दहा वर्षे त्यांनी बेरी बेरीरोगाच्या अभ्यासात घालविली. दीर्घ परिश्रमांनी त्यानी असे सिद्ध केले की सैनिकांची खाण्यापिण्याची आबाळ होते. नि:सत्व अन्न खायला लागल्याने त्याना बेरी बेरी रोग होतो.

क्रिस्तिआन आइकमान यांच्या बरोबर काम करीत असलेले इतर दोन वैज्ञानिकशास्त्रज्ञ सदस्य होते – विकृतीशास्त्रज्ञ कॉर्नेलिस पेकेलहारिंग आणि चेतातंतूतज्ज्ञ कॉर्नेलिस विन्क्लर. त्यांच्या मते  बेरी बेरीच्या रोग्यांच्या रक्तातील मायक्रोकॉकस (Micrococcus) जीवाणूंमुळे बेरी बेरी रोग होतो. आइकमान यांनी प्रयोगशाळेत वाढविलेले मायक्रोकॉकस  कोंबड्या, ससे, कुत्रे आणि माकडे अशा प्राण्यांमध्ये अंत:क्षेपित (इंजेक्ट) केले. परंतु या प्राण्याना बेरी बेरी झाला नाही. त्यामुळे नि:सत्व अन्न खायला लागल्याने लोकांना बेरी बेरी रोग होतो, मायक्रोकॉकसमुळे नाही हे सिद्ध  झाले.

मायक्रोकॉकसच्या प्रयोगासाठी  कोंबड्या स्वस्त आणि सहज मोठ्या संख्येने उपलब्ध होतात हे पाहिल्यानंतर त्यांनी एका गटातील कोंबड्यांना मायक्रोकॉकस अंत:क्षेपित केले व दुसरा गट नियंत्रित ठेवला. परंतु दोन्ही गटांतील कोंबड्यांमध्ये बहुचेताशोथाची (polyneuritis) ची लक्षणे आढळली. प्रायोगिक कोंबड्यांमुळे नियंत्रित कोंबड्यांना मायक्रोकॉकसची लागण झाली असे आइकमान यांना वाटले. वेगळ्या ठेवलेल्या कोंबड्याही संसर्गास बळी पडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोंबड्यांचे ठिकाण पूर्णपणे वेगळे केले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे आजारी कोंबड्या औषधाशिवाय बर्‍या झाल्या. यामुळे ते गोंधळात पडले. बारकाईने केलेल्या निरीक्षणातून त्यांना याचे कोडे उकलले. त्यांच्या प्रयोगशाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक रुग्णांनी खाऊन शिल्लक राहिलेला पॉलिश केलेल्या तांदळाचा भात कोंबड्याना खाऊ घालीत असे. कालांतराने पॉलिश केलेल्या तांदळाचा  भात न मिळेनासा झाल्याने पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात कोंबड्याना खाऊ घालू लागला. पॉलिश न केलेल्या तांदळातील घटकाचे नाव त्यांनी बेरी बेरी प्रतिबंधक घटक ठेवले. या घटकाचे नेमके रासायनिक स्वरूप त्याकाळी ठाऊक नव्हते.

आइकमान यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे  जीवनसत्त्वांचा शोध लागला. आइकमाननी  उल्लेख केलला बेरी बेरी निवारक विशिष्ट पदार्थ, म्हणजेच ‘थायमिन’ उर्फ जीवनसत्व बी-१ हे संयुग पुढे  रासायनिक विश्लेषणातून समजले. अन्नातील त्यांच्या जीवनसत्त्वांचा रोग प्रतिबंधास आणि रोग निवारणास उपयोग होतो. या त्यांच्या पायाभूत संशोधनाबद्दल १९२९ सालचे शरीरक्रिया विज्ञान व वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार त्यांना सर फ्रेडरिक हॉपकिन्स ह्यांच्या बरोबर विभागून देण्यात आला.

क्रिस्तिआन आइकमान एक चांगले संशोधक व उत्तम शिक्षक होते. नेदरलँड्समधील यूत्रेक्त विद्यापीठात ते आरोग्यशास्त्र आणि न्यायवैद्यकशास्त्र शिकवीत असत. तुम्ही निवड करून प्रयोग करा आणि निष्कर्ष पटत असतील तरच तो स्वीकारा असे त्यांचे विद्यार्थ्यांना त्यांच्या सांगणे असे.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा