पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर वसलेला आहे. मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकारांचा मोठा वाडा आहे. गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे.

ढवळगड

किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून १३० मी. उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड–वनपुरी–सिंगापूर–पारगाव चौफुला–वाघापूर–आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी. आहे. गावातून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत गेला आहे. गडाचा दुसरा मार्ग उरुळी कांचन गावातून असून जवळच असणारे डाळिंब हे गाव गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला आहे. डाळिंब गावापासून गड माथा किंवा ढवळेश्वर मंदिर २५५ मी. उंचीवर आहे. डाळिंब गावापासून रेल्वेमार्ग पार करून १४० मी. चढून आल्यावर मेटाचे अवशेष दिसून येतात. या मेटावर खडकात खोदलेले आणि नंतर बांधलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याचा आकार साधारणतः १५ फूट x ८ फूट इतका आहे. मेटावरील मंदिरासमोर हे पाण्याचे टाके असून त्याचीही जुजबी दुरुस्ती झाली आहे. टाक्याशेजारीच झाडीमध्ये पत्र्याच्या छपराखाली पगडी घातलेली गणपतीची मूर्ती असून ती पेशवे काळातील असावी. कारण अशाच स्वरूपाची गणेश मूर्ती अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात आहे. ढवळगडच्या माचीवरील या गणेश मंदिरासमोर एक शिवलिंग ठेवलेले दिसते.

तट आणि बुरूज, ढवळगड.

किल्ल्यावर जाण्याच्या दोन मार्गांपैकी आंबळे गावाकडून येणाऱ्या मार्गावर राबता जास्त असतो. या वाटेवर माथ्याच्या खाली गडाचे दुसरे मेट आहे. या मेटावर बांधलेला चुन्याचा घाणा आजही अस्तित्वात आहे. घाण्याशेजारी जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. घाण्यापासून पुढे किल्ल्याच्या मुख्य चढावर हनुमानाचे शिल्प कोरलेला दगड आहे. एकाच दगडात पाठीला पाठ लावून हनुमानाची दोन शिल्पे कोरलेली आहेत. गडाच्या दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प एका घुमटीमध्ये ठेवलेले आहे. किल्ल्याचा दरवाजा अर्धा पडलेला असून त्या शेजारील अर्ध्या भागातील तटबंदीची भिंत आणि बुरूज उभे आहेत. दरवाजाची उंची ३.७ मी. असून अस्तित्वात नसलेल्या अर्ध्या कमानीचे दगड तेथेच खाली पडलेले आहेत. दरवाजातून आत उजवीकडे देवडी (पहारेकऱ्यांची खोली) आहे. मात्र सध्या या मूळ जागेत बदल करून ती निवासासाठी वापरल्याचे दिसते. देवडीच्या आतील बांधकाम पेशवेकालीन वाटते. कारण पेशवेकालीन विटांचा सररास वापर या बांधकामात केलेला दिसतो. तेथे आत एक खोली आहे. दरवाजात एका बाजूची बिजागरीची जागा राहिलेली असून अडसर लावण्याची एका बाजूची जागा तेथे दिसते. दरवाजापासून पूर्व पश्चिम १२ मी. लांब आणि १ मी. रुंद तटबंदी उभी असलेली दिसते.

पाण्याचे टाके, ढवळगड.

दरवाजातून पुढे पूर्वेकडे एक बुजलेले पाण्याचे एक टाके दिसते. या टाक्याची नजीकच्या काळामध्ये डागडुजी करून त्याला चुन्याचा गिलावा केला आहे. टाक्याच्या बाहेरील बाजूस बांधकाम करून त्याला कठडा बांधला आहे. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिर. याचे बांधकाम दोन भागांत विभागलेले आहे, ते म्हणजे सभामंडप आणि गाभारा. मंदिराला बाहेरील बाजूंस गोमुखही आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचीही डागडुजी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराच्या समोर म्हणजेच पूर्वेला पाण्याचे दुसरे टाके असून या टाक्यात खांब कोरलेला आहेत. या टाक्याची देखील दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसते. टाक्याला तसेच आतील खांबाला चुन्याचा गिलावा केलेला आहे. या टाक्याची लांबी रुंदी ३.१५ मी. x ४.३० मी. असून खोली ५.४८ मी. आहे. टाक्याच्या समोरील उतारावर तटबंदीचे भग्न झालेले अवशेष असून ते सहजासहजी दिसून येत नाहीत. गडाला सर्व बाजूंनी तटबंदी होती; परंतु काळाच्या ओघात नैसर्गिक आपत्तींमुळे ती ढासळलेली दिसते. पूर्वेकडील व उत्तरेकडील तटबंदीचे अवशेष देखील तुरळक प्रमाणात दिसतात. गडाच्या तटबंदीच्या खालून गडाला प्रदक्षिणा घालताना ठिकठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाच्या उत्तरेकडील उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. हे गडाच्या परिसरातील तिसरे टाके होय. साधारणपणे दहा फूट खोली असलेले हे टाके मार्च महिन्यात पूर्णपणे कोरडे होते. गडाच्या माथ्यावरून पश्चिमेकडे शिंदवण्याचा घाट दिसतो.

किल्ल्याच्या माथ्यावर ढवळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटी घुमटी व त्यापुढे नंदी असून हा भाग किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीला लागून आहे. इतर अनेक किल्ल्यांवर तटबंदीमध्ये खोल्या असतात, तशा स्वरूपाची तटबंदीमध्ये असलेली खोली पश्चिमेकडील तटामध्ये दिसते. तट पडून गेल्याने ही फक्त खोली शिल्लक आहे. सध्या येथे एक मंदिर आहे. या खोली समोरच एक तुळशी वृंदावन आहे. मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हे तुळशी वृंदावन बांधले असावे.

महाराष्ट्रात अनेक अशी देवस्थाने आहेत, ज्यांच्या भोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख ‘गडʼ असा केला जातो. उदा., जेजुरीगड, कानिफनाथगड, सप्तशृंगीगड, साताऱ्याजवळील साखरगड इत्यादी. पण ही सगळी तटबंदीयुक्त देवस्थाने असून त्यांना ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ याची परिमाणे लागू होत नाहीत. ढवळगडाच्या बाबतीत प्राथमिक सर्वेक्षणामध्ये कोणालाही असे वाटण्याची शक्यता आहे. पण ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष तो किल्ला असल्याचे दर्शवितात. त्यामुळे ढवळगड हा एक फक्त देवाचा गड नसून तो ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ यांच्या व्याख्येत बसणारा व लष्करी महत्त्व असणारा गड आहे, असे निश्चित सांगता येते.

ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृ. वा पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर पुस्तकामध्ये आलेला आहे. इ. स. १९४० साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे दप्तर  मधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले असल्याने पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते. पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड, भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो. पुरंदरचे धुरंदर  या पुस्तकात ढवळगडाचे एक छायाचित्र शिवाजीराव एक्के यांनी दिले आहे. किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या किल्ल्याचे विस्तृत वर्णन अन्य गड-किल्ले संबंधित ग्रंथांमध्ये आलेले नसल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरते.

ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही; पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ‘ढोला’ गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा ढोलागड म्हणजे ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो; तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही. काळाच्या ओघात ते पडले असावे. ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते. ढवळगड किल्ल्याचा बुरूज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरूज यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे.

संदर्भ :

  • एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
  • पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
  • साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
  • जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.

                                                                                                                                                                                     समीक्षक : जयकुमार पाठक