महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. रायगड जिल्ह्यात तो महाडच्या उत्तरेस २५ किमी. वर व जंजिऱ्याच्या पूर्वेस ६५ किमी. वर सह्याद्री पर्वतश्रेणींत ५·१२५ चौ. किमी. घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ८४६ मी. असून सभोवती सांदोशी, छत्री निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड, कोंझर असे खेड्यांचे गट दिसतात. रायरी हे या डोंगराचे जुने नाव. पाश्चात्त्य लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करीत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड-सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी किंवा प्रभावळ उभी राहिली. हे जाणूनच छ. शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केली.

रायगड.

रायगडचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. रायगडविषयी अनेक कथा, दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. छ. शिवाजी-संभाजी यांच्या कारकिर्दीत येथे इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. वकिलांनी भेट देऊन या किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यांत फ्रायर, हेन्री ऑक्सिंडेन, गोन्कालो मर्तिन्स, टॉमस निकल्स आदींचे वृत्तांत इतिहासावर प्रकाश टाकतात. बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचे निवासस्थान होते. चौदाव्या शतकात या पाळेगारांनी विजयानगरचे मांडिलकत्व पतकरले. इ. स. १४३६ मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमनशाहने तो आपल्या ताब्यात घेतला. इ. स. १५४९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकुत इस्तंबोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबतखानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मलिक जमरून हा हवालदार झाला (१६२१). पुन्हा हा किल्ला निजामशाहीत गेल्याचे दिसते. मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यानंतर आदिलशाहाशी झालेल्या करारानुसार रायरी आदिलशाहीकडे आली (१६३६). आदिलशाहने १६३६ ते १६४४ दरम्यान जंजिऱ्याच्या सिद्दी घराण्यातील इब्राहीम, सय्यद कब्बरी व शेख अली यांना हवालदारीचे हक्क दिले. नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाहीतर्फे गेली.

मनोरे, रायगड.

छ. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून १६५६ च्या सुमारास चंद्रराव मोऱ्यांकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी १५ एप्रिल ते १४ मे १६५६ दरम्यान त्यांच्या हाती आली असावी. शिवाजींनी रायरीचे रायगड असे नाव ठेवले आणि राजधानी करण्याच्या दृष्टीने कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यास इमारतींची डागडुजी, नव्या इमारती बांधणे, सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे इ. कामे सोपविली. या कामी पन्नास हजार होन खर्च करण्यात आला. तिथे तीन-चार वर्षांत लहानमोठ्या तीनशे वास्तू बांधण्यात आल्या. छ. शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये कायमच्या राजधानीसाठी रायगडची निवड केली; तथापि १६७० पर्यंत येथे राजधानी हलविण्यात आली नव्हती. १६७४ मध्ये येथेच स्वतःला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर १६८९ पर्यंत तो छ. संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. पुढे मोगलांनी तो घेतला (१६८९) आणि नंतर पुन्हा मराठ्यांनी घेतला (१७३५); परंतु त्याचे वैभव नष्ट झाले. उत्तर पेशवाईत तो राजकीय कैद्यांच्या बंदिवासाचे ठिकाण होते. नाना फडणीस व दुसरा बाजीराव यांनी पडत्या काळात सहकुटुंब त्याचा आश्रय घेतला. नाना फडणीस यांनी १७९६ मध्ये काही इमारतींची डागडुजी केली. मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने १० मे १८१८ रोजी रायगड जिंकून घेतला. त्यावेळच्या तोफांच्या माऱ्यात अनेक इमारती पडल्या. त्यानंतर शिवजयंती उत्सवानिमित्त १८९७ मध्ये लो. टिळक प्रभृतींनी लोकजागृतीसाठी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला.

नगारखाना, रायगड.

रायगड किल्ल्याचे चार भाग आहेत. १. श्रीगोंदे टोक २. टकमक टोक ३. हिरकणी टोक ४. भवानी टोक. भवानी टोक या भागात अनेक वाडे व तलाव असून टकमक टोक ही कडेलोट करण्याची जागा आहे, असे मानले जाते. हिरकणी टोकाच्या शेवटी बुरूज असून तेथे हनुमानाचे शिल्प व काही तोफा आहेत. किल्ल्यावर वाडेश्वर (सध्याचे जगदीश्वर) मंदिराच्या दक्षिणेला दोन कोठारे व बारा टाकी नामक पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे.

बाजारपेठ वास्तू, रायगड.

रायगड किल्ल्यावर दोन शिलालेख असून ते दोन्ही वाडेश्वर मंदिराच्या नगारखान्यावर आहेत. एका शिलालेखात महाराजांनी गडावर कोणकोणत्या वास्तू बांधल्या त्याविषयी माहिती असून दुसऱ्या लेखात गडावर बांधकामे करणाऱ्या अधिकाऱ्याचे म्हणजे हिरोजी इंदुलकर यांचे नाव आहे. नगारखाना, मनोरे, बुरूज, मंदिरे इ. काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले असून त्यांतून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते. रायगडावर पाचाडकडून वाडीमार्गे जाणारा रस्ता अधिक सोयीचा आहे. दक्षिणेकडील वाघ दरवाजाशिवाय किल्ल्याला महत्त्वाचे असे पश्चिमेला महाद्वार आहे. इतर बाजूंनी कातळ व काही ठिकाणी तटबंदी आहे. नाणे दरवाजा हे रायगडचे सुरुवातीचे प्रवेशद्वार असून तेथून अंदाजे २०० मी. उंचीवर महादरवाजा आहे. सध्याच्या पायऱ्यांच्या वाटेवर चित्त दरवाजा नावाचा एक लहान दरवाजा वाळूसरे होता. सध्या तो अस्तित्वात नाही. महा दरवाजाच्या अलीकडे २२ मी. उंचीचे दोन बुरूज आहेत व पुढे भव्य महादरवाजा आहे. पहारेकऱ्यांसाठी देवड्या असून दक्षिणेस तटबंदीमध्ये आडवाटेला चोरदरवाजा आहे. पुढे अंदाजे १२५ मी. चढून गेल्यावर रायगडचा सपाट भाग आहे. त्याजवळ अंडाकृती हत्ती तलाव (३३ X २३ मी.) आणि पुढे गंगासागर तलाव (३३ X ३० मी.) आहे. त्याच्या दक्षिणेस दोन मजली उंच दोन मनोरे आहेत.

वाडेश्वर (जगदीश्वर) मंदिर, रायगड.

मनोऱ्याच्या पश्चिमेस बालेकिल्ल्याचा पालखी दरवाजा लागतो व त्याच्या विरुद्ध दिशेला मेणा दरवाजा आहे. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३०० X १५० मी. असून सभोवती तटबंदी होती. आतील बाजूस जीर्ण झालेल्या इमारतींच्या दोन रांगा लागतात. उजवीकडे राण्यांचे सहा महाल असून डावीकडे चाकरांच्या खोल्या होत्या. त्या सर्वांची सांडपाण्यासह उत्तम व्यवस्था केलेली होती. राण्यांच्या महालाच्या समोर छ. शिवाजी महाराजांचा राहता वाडा आहे, ज्याचा उल्लेख रायगडवरील शिलालेखात आलेला आहे. वाड्याच्या दक्षिणेला कचेऱ्या असून पूर्वेला दिवाण-इ-खास आहे. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी सिंहासनाचा चौथरा असून तो सुस्थितीत आहे. सिंहासनासमोर कारंजे असून त्यापुढे पूर्वेला १६ मी. उंचीचा भव्य नगारखाना आणि बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथेच छ. शिवाजी महाराजांचा दरबार भरत असे.

छ. शिवाजी महाराज यांचे समाधी स्मारक, रायगड.

नगारखान्याच्या पूर्वेस कुशावर्त नावाचा तलाव आहे व जवळच श्रीगोंदे टोक आहे. याच्या दरम्यानच्या जागेत छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांचे वाडे होते. नगारखान्याच्या उत्तरेला होळीचा माळ आहे. माळावर बालेकिल्ल्याच्या वायव्येस पीलखान्याची जीर्णशीर्ण वास्तू आहे. त्याच्या उत्तरेस गडावरील प्रसिद्ध बाजारपेठेचे अवशेष जोत्याच्या रूपाने अवशिष्ट आहेत. ही बाजारपेठ नसून अधिकारी लोकांची निवासस्थाने असावीत. दोन्हीकडील मिळून येथे एकूण चव्वेचाळीस खोल्या आहेत. दोन रांगांत फरसबंदी असून सु. १२ मी.चा रुंद रस्ता आहे. तेथून ईशान्येस तटबंदीयुक्त पद्धतीने बांधलेले वाडेश्वर (सध्याचे नाव जगदीश्वर) महादेवाचे मंदिर असून त्याच्या मंडपात मारुतीची सुरेख पाषाणमूर्ती आहे. मंदिराभोवती पुजाऱ्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. मंदिरात एका शिलालेखावर राज्याभिषेकाची तिथी व शक यांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी व घुमटाकृती स्मारक आहे. त्याच्या समोर वाघ्या कुत्र्याचेही स्मारक आहे.

शिलालेख, रायगड.

रायगडावरील इमारतींचा कालदृष्ट्या शोध घेण्यासाठी त्याचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. किल्ल्यावर पुरातत्त्व विभागातर्फे १९५७-५८ पासून ते २०२० सालापर्यंत साफसफाईची कामे चालू आहेत. त्यामध्ये अनेक वास्तू उजेडात आल्या आहेत. छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराजानंतर किल्ला आधी मोगल आणि नंतर सिद्दीकडे गेला. पेशवाईत देखील गडावर फारसे नव्याने बांधकाम झाले नाही. येथील वास्तुशैलीविषयी तज्ज्ञांत मतैक्य नाही. प्रसंगोपात्त त्यात काही स्थानिक वास्तुविशेषही मिसळलेले दिसतात.

हिरोजी इंदुलकर यांचा शिलालेख, रायगड.

 

 

 

 

 

 

 

संदर्भ :

  • Kamalapur, J. N. The Deccan Forts, Bombay, 1961.
  • आवळसकर, शां. वि. रायगडची जीवनकथा, पुणे, १९६२.
  • घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!,  पुणे, १९८५.
  • जोशी, पु. म. संपा., ऐतिहासिक साधने  (इ. स. १५८८-१८२१), मुंबई, १९६४.
  • जोशी, सचिन, दुर्गवैभव (रायगड जिल्ह्याचे), बुकमार्क पब्लिकेशन, पुणे, २०११.
  • टिपणीस, गो. गो. रायगडची माहिती, पुणे, १८९६.
  • ठाकरे, प्रबोधनकार, रायगड, मुंबई, १९५१.
  • रामदास, र. वा. रायगड दर्शन, मुंबई, १९५९.

                                                                                                                                                                                          समीक्षक : सचिन जोशी