लान, एम. जे. व्ही. :  ( १९६७ ) 

लान १९९० मध्ये नेदरलँड्स मधील युट्रेक्ट (Utrecht) विद्यापीठातून गणिताचे द्वीपदवीधर झाले आणि १९९३ मध्ये त्यांना पीएच्.डी. ही पदवी मिळाली. २००६ पासून लान हे अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवसंख्याशास्त्र व संख्याशास्त्र याचे Jiaan Ping /Karl E Peace Endowed Professor of Biostatistics and Statistics प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

लान यांचे आयुर्मान विश्लेषण (survival analysis), अर्धप्राचलीय संख्याशास्त्र (semiparametric statistics), बहुचल चाचणी (Multiple testing) आणि कारणात्मक अनुमान (causal inference) या विषयांत योगदान आहे. संगणकीय जीवशास्त्रातही त्यांचे काम आहे.

लान यांचे संशोधन स्थानीयत: कार्यक्षम आकलक (Locally efficient estimators) संबंधी आहे. अनुलंब अभ्यासामधील बहुचल फलासाठी (Multivariate survival function), तसेच चालू स्थितीमधील आधारसामग्री आणि कालाधारीत सहप्रचरण (Current status data and time dependent covariance) यासाठी लान यांनी स्थानीयत: कार्यक्षम आकलक यांचा उपयोग केलेला आहे.

जेव्हा आधारसामग्री गोळा करण्यास उशीर झालेला असतो त्यासाठी उचित वर्जित आधारसामग्री आणि सहप्रचलन याबरोबर आयुर्मान फलाचा विकास त्यांनी केला आहे.

संसर्गजन्य रोगांच्या संशोधनामध्ये लान यांनी लक्ष्य निर्देशक महत्तम संभव (TMLE) आकलकाचा उपयोग केला असून TMLE च्या चौकटीत अंदाज अंतराळ (prediction intervals) वापरले आहेत. त्याद्वारे एचआयव्ही म्युटेशनची क्रमवारी शोधणे असे उपयोगी काम लान यांनी केले आहे. बहुचल चाचण्यांमध्ये चुकीचे निष्कर्ष काढण्याचे प्रमाण (फॉल्स डिटेक्शन रेट) नियंत्रणात आणणे यासाठीही लान यांनी काम केले आहे.

लान हे जर्नल ऑफ कॅज्युअल इन्फरन्स आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोस्टॅटिस्टीक्स यांचे संस्थापक संपादक आहेत. याशिवाय जर्नल ऑफ अमेरिकन स्टॅटिस्टीकल ॲसोसिएशन आणि जर्नल ऑफ स्टॅटिस्टीकल मेडिकल रिसर्च यांचे संपादक तसेच संख्याशास्त्राचे इ-जर्नल व बायोमेट्रिक्स या आंतरराष्ट्रीय जर्नलचे ते सहसंपादक म्हणून काम पहात आलेले आहेत.

लान यांना युट्रेक्ट विद्यापीठाच्या ३५५ व्या वर्धापन दिनानिमित्त व्ही.एस.बी. न्यासातर्फे शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच नेदरलँड्समध्ये द्विपदवीसाठी संख्याशास्त्र किंवा प्रवर्तन संशोधन (Operational Research) विषयांसाठी सादर केलेल्या प्रबंध स्पर्धेत लान यांना उत्कृष्ट प्रबंधाबद्दल दुसरे पारितोषिक मिळाले. त्याशिवाय, लान यांना Mortimer Spiegeiman पुरस्कार, कॉप्स अध्यक्षीय पुरस्कार, Van Dantzig हे संख्याशास्त्र व निर्णय सिद्धांत यासाठीचे नेदरलँड्स मधील सर्वोच्च पारितोषिक, IMS पुरस्कार, बोस्टन विद्यापीठातर्फे अध्यापन, संशोधन आणि सेवा यातील उत्कृष्टतेबद्दल Adrienne Cuplles या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

अनेक शोध लेखांशिवाय लान यांची स्व आणि सहलिखित पुस्तके पुढीलप्रमाणे: Methods for Censored Longitudinal Data and Causality; Multiple Testing Procedures with Applications to Genomics; Springer Series in Statistics; Targeted Learning: Causal Inference for Observational and Experimental Data; Efficient and Inefficient Estimation in Semiparametric Models.

संदर्भ :

 समीक्षक : विवेक पाटकर