लीबेग, युस्टीस फॉन : ( १२ मे १८०३ – १८ एप्रिल १८७३ )

जर्मनीमधील डॅमस्टॅट या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात युस्टीस फॉन लीबेग यांचा जन्म झाला. त्यांना अगदी लहानपणापासून रसायनशास्त्राचे विशेष आकर्षण वाटत होते. इ.स. १८१६ मध्ये ज्वालामुखीच्या प्रभावाने उत्तर गोलार्धात धुमाकूळ घातला होता आणि जवळजवळ सर्व पिके त्यात भक्ष्यस्थानी पडली होती. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात जास्त परिणाम जर्मनीला भोगावा लागला होता. युस्टीस फॉन लीबेग यांच्या पुढील आयुष्यात या घटनेचा दूरगामी परिणाम दिसून आला होता. नंतर त्यांना बॉन विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि कार्ल विल्ह्यम गॉटलॉब केस्टनर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपला पीएच्. डी. प्रबंध तिथे पूर्ण केला. परंतु पदवी मिळण्यासाठी त्यांना काही वर्षे वाट पहावी लागली. रसायनशास्त्रातील प्रगत संशोधनात भाग घेता यावा म्हणून त्यांनी एअरलान्ग गाव सोडून इ. स. १८२२ मध्ये पॅरिस गाठले. जोसेफ लुई गे लुसाक्स यांच्या खाजगी प्रयोगशाळेत त्यांनी नोकरी स्वीकारली. तिथे त्यांची मैत्री जॉर्ज कुव्हिए आणि अलेक्झांडर ह्युम्बोल्ट या दोन महान वैज्ञानिकांशी झाली. इ. स. १८२४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना गिसन विद्यापीठात प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली.

लीबेग यांचे सर्व संशोधन कृषी रसायनशास्त्राशी संबंधित होते. शेतामधील मातीतील सेंद्रिय पदार्थांचे विश्लेषण हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. इ. स. १८३१ मध्ये त्यांनी सेंद्रिय पदार्थांमधील कार्बनचे प्रमाण ठरविण्यासाठी पोटॅश बल्ब नावाच्या उपकरणाची निर्मिती केली होती. यामध्ये त्यांनी पाच काचेचे बल्ब त्रिकोणी मांडणीत जोडले होते. या उपकरणात ज्या पदार्थातील कार्बनचे प्रमाण ठरवायचे होते तो जाळावा लागत होता. या प्रक्रियेत पदार्थातील प्रत्येक कार्बनचा अणू जळून त्याचे रूपांतर कार्बन डाय-ऑक्साईडमध्ये होणे अपेक्षित होते. पदार्थ संपूर्ण जाळून निर्माण झालेला वायू कॅल्शियम क्लोराईड भरलेल्या नळीतून कोरडा करून  (त्यातील पाण्याची वाफ शोषून घेण्यासाठी) पोटॅश बल्बमधील पोटॅशियम हायड्रॉक्साइईडमध्ये सोडला जायचा. त्यामुळे त्यातील  कार्बन डाय-ऑक्साईड विरघळून त्याचे रूपांतर पोटॅशियम कार्बोनेटमध्ये व्हायचे. मग पोटॅश बल्बच्या वजनात झालेली वाढ लक्षात घेऊन कार्बनचे प्रमाण ठरविले जायचे.

नायट्रोजनयुक्त खतांचा शोध हे त्यांचे फार मोठे संशोधन म्हणता येईल. पिकांच्या मुळांना अमोनियाच्या स्वरूपात नायट्रोजन मिळाला पाहिजे असे त्यांना आपल्या निरीक्षणातून पटले होते. प्राण्यांच्या शेणामधून कंपोस्ट खत बनवून त्यातून जो नायट्रोजन पिकांना मिळतो तो कृत्रिम खतांच्या स्वरूपात देता येईल असे त्यांना वाटत होते. लीबेग यांनी ‘कमीत कमी आवश्यकतेचा नियम’ जगासमोर मांडला. पिकांच्या वाढीवरची मर्यादा सर्वात कमी मात्रेत असलेल्या आवश्यक खनिजाच्या जमिनीतील किंवा मातीतील प्रमाणावर अवलंबून असते हाच तो नियम. अशा खनिजाची जमिनीतील मात्रा जर वाढली किंवा कृत्रिम स्वरूपात दिली गेली तर पीक अमाप येईल असे गृहीतक त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवले.

पाण्याच्या वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर करण्यासाठी जो शीतक किंवा कंडेन्सर वापरला जातो तो लीबेग यांच्या आधीपासून उपलब्ध होता. परंतु त्याचा प्रयोगशाळेत वापर करण्याच्या त्यांच्या कल्पकतेमुळे आजही तो लीबेगचा शीतक किंवा कन्डेन्सर म्हणून प्रचलित आहे.

इ. स. १८३५ मध्ये त्यांनी आरशामध्ये योग्य परावर्तन मिळावे म्हणून चंदेरीकरणाची जी पद्धत शोधून काढली ती काळाच्या ओघात अजूनही टिकून राहिली आहे.

लीबेग यांनी वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरशास्त्रात असलेला रसायनशास्त्राचा सहभाग या विषयाला आपले जीवन वाहून घेतले होते. जॉर्ज गिबर्टेम नावाच्या एका बेल्जियन अभियंत्यासोबत त्यांनी गोमांसाचा अर्क बनविण्याची पद्धत शोधून काढली. त्या दोघांनीं १८६५ मध्ये गोमांसाला पर्याय म्हणून स्वस्त दराने विकण्यासाठी त्या अर्काचा कारखाना काढला. त्यांच्या मृत्यूनंतर १८९९ साली या अर्काला एकस्व मिळाले आणि ‘ऑक्सो’ या नावाने तो विकला जाऊ लागला. लीबेग मांस अर्क हे त्यांनी जगाला दिलेला आणखी एक पदार्थ आहे. त्याचा शोध त्यांना अपघाताने लागला होता असे आता म्हणता येईल. १८५३ मध्ये एम्मा मुस्प्रॅट नावाची त्यांच्या मित्राची मुलगी तिच्या म्यूनिकमधील वास्तव्यात आजारी पडली. लीबेग यांना समजले की ती द्रव पदार्थाशिवाय कोणतेही अन्न खाऊ शकत नाही कारण तिच्या आतड्यांची असले अन्न पचविण्याची क्षमता संपलेली आहे. तिचे वजनदेखील झपाटयाने कमी होऊ लागले होते. तिला जर मांसाचा अर्क दिला तर त्याचा चांगला उपयोग होईल असे त्यांना वाटले. त्यांनी कोंबडीच्या मांसाचा खिमा केला आणि हायड्रोक्लोरिक आम्लात तो १२ तास बुडवून ठेवला. १२ तासानंतर हे मिश्रण त्यांनी गाळले आणि त्यातील आम्लाचे उदासिनीकरण करून त्या अर्कांचे विश्लेषण केले. त्यात त्यांना योग्य स्वरूपातील प्रथिने आढळली. त्यांनी तो अर्क तिला रोज द्यायला सुरुवात केली तिची प्रकृती जादू केल्यासारखी सुधारली. परंतु दुर्दैवाने हा अर्क बनविण्याची रीत अतिशय क्लिष्ट असल्यामुळे लीबेग यांना तो अर्क बाजारात आणता आला नाही.

इ. स. १८३७ मध्ये त्यांना रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सचे सन्माननीय सदस्यत्व प्राप्त झाले. १८४५ मध्ये त्यांनी म्यूनिक विद्यापीठात आपले काम सुरू केले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. १८४५ मध्ये त्यांना त्यावेळी जर्मन समाजात प्रचलित असलेले बेरॉन (आपल्याकडील सरदार) अशी राज पदवी मिळाली.

लीबेग यांनी विविध जर्मन राज्यांमधून शास्त्रशुद्ध शेती या विषयी लोक जागृती केली. त्यांच्या समरणार्थ १९५३ मध्ये त्यावेळच्या पश्चिम जर्मन सरकारने त्यांच्यावर डाक तिकीट छापले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर गिसन विद्यापीठाचे नामकरण युस्टीन लीबेग गिसन विद्यापीठ असे करण्यात आले

लीबेग यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत: १. Organic Chemistry in its Application in Agriculture and Physiology (1840); २. Organic Chemistry in its Application in Physiology and Pathology (1842), ३. Familiar Letters on Chemistry, (1843)

संदर्भ

समीक्षक : रंजन गर्गे