लिस्टर, जोसेफ : ( ५ एप्रिल, १८२७ – १० फेब्रुवारी, १९१२ )

जोसेफ लिस्टर यांचा जन्म इंग्लंडमधील इसेक्स प्रांतातील वेस्टहॅम शहरात झाला. सूक्ष्मदर्शकाचे भिंग तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले जॅक्सन लिस्टर हे त्यांचे वडील. लिस्टर यांचे जर्मन आणि फ्रेंच या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेंजामिन अँबेटसमध्ये झाले, पुढील शिक्षणासाठी ते ग्रोव्ह हाऊस टोटेनहॅम येथील शाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी गणित, भाषा, विज्ञान या विषयांचा अभ्यास केला. नंतर त्यांना कला शाखेची आवड निर्माण होऊन त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. पुढे वैद्यक शाखेत पदवी घेतली आणि सर जेम्स सिमे यांचा साथीदार म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ इंडिनबर्ग स्कॉटलँड येथे काम सुरू केले.

नुसता डॉक्टरी पेशा करण्यापेक्षा काहीतरी संशोधन करावे म्हणून दिवसभराचे काम झाल्यावर रात्री ते संशोधनाचे काम करीत असत. रोग्यांची शुश्रूषा करताना त्यांना असे आढळून आले की, जवळपास ७०-८० टक्के रोगी ऑपरेशन झाल्यानंतर होणाऱ्या जंतूंच्या प्रादुर्भावाने जखमा होऊन दगावत आहेत. त्यांच्या असे लक्षात आले की, शस्त्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्जंतुकीकरण होत नाही. तसेच शल्यचिकित्सक ऑपरेशनपूर्वी आणि नंतर हातनिर्जंतुक करत नाहीत आणि त्यामुळे शस्त्रागारातील हवा दूषित असू शकते.

लहानपणापासून लिस्टर वडलांच्या वाइन उद्योगाचे निरीक्षण करत असत, वाइन जर दूषित हवेच्या संपर्कात आली तर ती खराब होते हे लुई पाश्चर यांच्या संशोधनाने सिद्ध केले होते. तसेच एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाचा जन्म होतो. या विचाराचा अनुषंगाने लिस्टर यांचे ठाम मत बनले की, शस्त्रागार आणि दवाखान्यांमधील दूषित हवेमुळेच जंतूचा प्रादुर्भाव होतो आणि जर जंतूंचा प्रवेश रोखला तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

दरम्यानच्या काळात फ्रेडलिब फर्डीनांड रंग (Friedib Ferdinand Rang) यांनी डांबरापासून अशुद्ध स्वरूपात मिळवलेले फेनोट (Phenot) आणि क्रेस्टोन (crestone) चा वापर केल्यास जहाजे आणि रेल्वेच्या लाकडांचे संरक्षण होत असल्याचे त्यांच्या वाचनात आले. क्रेस्टोन हे सांडपाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येऊ लागले होते. त्याने कार्बोलिक ॲसिड हे रुग्णांच्या जखमांवर वापरून त्याची उपयुक्तता पडताळून पाहायचे ठरवले. सदरील अभ्यासात शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारी उपकरणे कार्बोलिक ॲसिडच्या स्प्रेने निर्जंतुक केल्यास जंतूंचा प्रादुर्भाव कमी होऊन गॅगरिनचे प्रमाण बरेच कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एका मुलाच्या पायावरून गाडीचे चाक गेल्यामुळे झालेल्या फ्रॅक्चरला बरे करून त्यांनी त्या जखमेवर कार्बोलिक ॲसिडची पट्टी बांधली. जवळपास ६ आठवडे कार्बोलिक ॲसिडच्या पट्टीने ड्रेसिंग केल्यावर हाड जुळून आले. तसेच तेथे कुठल्याही जंतूंचा प्रादुर्भाव झाला नाही.

इडिनबर्ग येथे क्लिनिकल सर्जरीचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रियेपूर्वी ५% कार्बोलिक ॲसिडने हात स्वच्छ धुऊन निर्जंतुक करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आणि इथूनच निर्जंतुक शस्त्रक्रिया या संकल्पनेचा उदय झाला.

शस्त्रक्रियेदरम्यान कार्बोलिक ॲसिडने निर्जंतुक केलेले हातमोजे वापरणे, शस्त्रक्रिया गृह कार्बोलिक ॲसिड फवाऱ्याद्वारे निर्जंतुक करणे, जखमांवरील पट्ट्या निर्जंतुक करून वापरणे, शस्त्रक्रियेची उपकरणे निर्जंतुक करणे आदी वेगवेगळ्या गोष्टींचे महत्त्व ते व्याख्यानाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू लागले आणि त्यामुळे ते आधुनिक शस्त्रक्रियेचे जनक म्हणून मान्यता पावले आणि लिस्टर यांच्या संशोधनाचे फलित म्हणजे शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या जंतूच्या प्रादुर्भावाचा दर ८० टक्क्यावरून जवळ जवळ ० टक्क्यावर आला. कार्बोलिक ॲसिडवर त्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. यात प्रामुख्याने तुटलेली हाडे जुळवण्यासाठी निर्जंतुक केलेल्या चांदीच्या तारेच्या प्रयोगाचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरेल. निर्जंतुक तार रोग्याच्या शरीरात ठेवून देखील जंतूचा प्रादुर्भाव न झाल्याचे आणि हाडे व्यवस्थित जुळून आल्याचे त्यांच्या पाहण्यात आले. त्याकाळी शस्त्रक्रियेनंतर जखम शिवून दोरा बाहेर ठेवण्यात येत असे आणि काही दिवसांनी तो दोरा ओढून काढण्यात येत असे. यावर लिस्टर यांनी १८८० मध्ये कॅटगट (Catgat), बकरी किंवा मेंढराच्या आतड्यातील विशिष्ट प्रकारचे पेशी/स्नायू (Connective Tissue) घेऊन त्यावर रासायनिक प्रक्रिया केली आणि त्यापासून सरळ धागे मिळवले. सदरील धागे शस्त्रक्रियेनंतर टोचलेल्या जखमेला शिवण्यासाठी वापरले जाऊ लागले. सदरील धागे हे शरीरात विरघळणाऱ्या पदार्थांपासून तयार केले गेल्यामुळे टाके काढण्याची गरज पडत नसे आणि तद्नुषंगाने शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या रुग्णांच्या जखमा कमी होऊन मृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत झाली.

त्यांनी राणी व्हिक्टोरिया यांच्या शरीरात रबराची नळी (Drainage Tube) वापरण्यास सुरुवात केली. सदरील ट्युब ऑपरेशननंतर शरीरात तयार होणारा द्रवपदार्थ बाहेर काढण्यास उपयुक्त होती. त्यांच्या या कामावर खुष होऊन आणि त्यांची अँटीसेप्टिक सर्जन ही प्रतिमा समोर ठेवून राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांना सर हा किताब दिला. तसेच त्यांना लॉर्ड लिस्टर ऑफ लायमरेजीस असे संबोधण्यात येऊ लागले.

एडवर्ड सातवे यांच्या राज्याभिषेकच्या दोन दिवस आधी ते ॲपेंडीसायटीसने त्रस्त होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांचे ऑपरेशन अतिशय जोखीमपूर्ण होते. त्यासाठी डॉक्टरांनी लिस्टर यांची मदत घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्जंतुक शस्त्रक्रियेने सातवे एडवर्ड पूर्णपणे बरे झाले.

त्यांच्या स्मरणार्थ दोन पोस्टाची तिकीटे काढण्यात आली.  ग्लासगो शहरातील त्यांचे वास्तव्य आणि संशोधन कार्यास सलामी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यांच्या सन्मानार्थ ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटीव्ह मेडिसीनचे नामकरण लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटीव्ह सायन्स असे करण्यात आले जे आता लिस्टर हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या संशोधनाची दखल घेत एका सूक्ष्मजीवाच्या जातीचे नाव लिस्टेरीया असे ठेवण्यात आले. लिस्टर हे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते.

लिस्टर यांचे वॉल्मर केंट, इंग्लंड येथे निधन झाले.

संदर्भ:

समीक्षक : रंजन गर्गे