मांडे, शेखर चिंतामणी : ( ५ एप्रिल १९६२ )

शेखर मांडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूर विद्यापीठातून भौतिकी, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात पदवी मिळवून त्यांनी याच विद्यापीठातून भौतिक शास्त्रात एक्स रे व इलेक्ट्रॉनिक्स या विशेष क्षेत्रातील एम.एससी. पदवी मिळवली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या बंगळुरू या नामवंत संस्थेमधून त्यांना रेण्वीय जीवभौतिकीशास्त्रात पीएच्.डी. मिळवली.  त्यांची सीएसआयआरच्या (CSIR) ज्युनिअर रिसर्च व सीनियर रिसर्च फेलो (JRF&SRF) म्हणून निवड झाली होती.

डॉक्टरेटनंतरचे संशोधन त्यांनी हॉलंडमध्ये डॉ. विम हॉल ( Dr. Wim G. J. Hol) यांच्या मार्गदर्शनाखाली रेक्स युनिव्हर्सिटीत ग्रोनिगन (डच उच्चार – Rijks universiteit, Groningen) येथे केले. त्यांना भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.

ते २०११ पासून पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे (National Center  for Cell Science) संचालक होते. त्यांच्या कार्यकालावधीत ह्या केंद्रात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली. उदाहरणार्थ, दीर्घ मुदतीच्या स्मृतीचा अभ्यास, जगातील सर्वात मोठा सूक्ष्मजीव संचय राष्ट्रीय सूक्ष्मजीव संपदा केंद्र (National Center for Microbial Research – NCMR) स्थापित व कार्यान्वित करणे, दीर्घ लांबीच्या प्रथिन संश्लेषणात भाग न घेणाऱ्या आर. एन. ए. (long non-coding RNA) चा शोध. आपल्या प्रतिक्षमता संस्थेला विषाणू चकवा कसा देतात याचा अभ्यास. स्त्रियांच्या अंडाशयाच्या कर्करोगात अनेक भिन्न प्रकारच्या पेशींमध्ये विकृती निर्माण होते हे संशोधन आणि त्यातून, उपचार करताना एकापेक्षा जास्त लक्ष्यांवर औषधांचा मारा करणे गरजेचे आणि शक्यही आहे – या ज्ञानाचे उपयोजन.

शेखर मांडे पुण्यात राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे (National Center for Cell Science) संचालक असताना भारतीय मानवी शरीरांतर्गत सूक्ष्मजीवांचा जीनोम हा एक नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेऊ लागला. भारतातील अनुवंशशास्त्रदृष्ट्या भिन्न अशा सुमारे ६००० पैकी नव्वद मानव समुदायांचा आणि सुमारे वीस हजार व्यक्तींमधील सूक्ष्मजीवांचा या प्रकल्पात अभ्यास होणार आहे.

वेगवेगळ्या नऊ संस्था या प्रकल्पात सामील आहेत – राष्ट्रीय पेशी  विज्ञान केंद्र (National Center for Cell Science), इन्स्टिटयूट ऑफ बायो-रिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IBSD) इम्फाळ, ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बायो मेडिकल जिनॉमिक्स (NIBMG) कल्याणी, ख्रिश्चन मेडिकल कॅालेज (CMC), वेल्लोर, इन्स्टिटयूट फॉर ॲडव्हान्सेस सायन्स अँड टेक्नोलॉजी (IASST), गौहत्ती, फाउंडेशन फॉर रिव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रॅडिशन्स (FLHRT) बंगळूरू, पर्सिस्टंट सिस्टिम्स, पुणे  आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS). ह्या प्रकल्पाच्या व्याप्ती आणि महत्त्वामुळे आणखी संस्था जोडल्या जाण्याची उमेद आहे.

प्रकल्पाची सुरुवात ईशान्य भारतातील इम्फाळ, मणिपूरमध्ये जून २०१७ मध्ये शेखर मांडे ह्यांच्या हस्तेच झाली. प्रकल्पात आपल्या त्वचा, शरीर-संस्था आणि नाक, कान, घसा, अन्ननलिका, फुफ्फुसे, उदर पोकळी व शरीरातील विविध पोकळ्यामधील असणारे विषाणू, जीवाणू, बुरशी अशा सूक्ष्मजीवांच्या जीनोमचा  अभ्यास केला जाणार आहे. अशा सूक्ष्मजीवांची एकूण संख्या मानवी शरीरातील एकूण पेशींपेक्षा जास्त असते. सूक्ष्मजीवांच्या परस्परावलंबी अब्जावधी वसाहती शरीरास विकरे पुरवतात, जीवनसत्वे निर्माण करतात, अन्नघटक व खनिज शोषण व रोगापासून बचाव करण्यास मदत करतात.

आपण क्वचितच आजारी पडण्यात आणि बहुतांश वेळा निरोगी राहण्यात आपल्या कातडीवर आणि शरीरांतर्गत – अन्नमार्ग, श्वसनमार्ग, मूत्रमार्ग, जननमार्ग इ. मध्ये वसणाऱ्या सूक्ष्मजीवांची कामगिरी मोलाची ठरते. जेव्हा अशा सूक्ष्मजीवांच्या काही वसाहती नष्ट होतात, किंवा त्यांची अचानक संख्यावाढ वा घट होते तेव्हा निर्माण होणाऱ्या असमतोलाचा परिणाम म्हणून रोग होतात. हा प्रकल्प-अभ्यास अनेक निरनिराळ्या दृष्टींनी उपयुक्त ठरणार आहे.

डॉ. शेखर मांडे यांचे संशोधन प्रथिन रचना व कार्य यावर आहे. क्षयाच्या जीवाणू प्रथिनावर केलेल्या त्यांच्या संशोधनामुळे क्षय जीवाणू औषध परिमाणावर प्रभाव पडला आहे. गणित विज्ञानातील अल्गोरीथम पद्धतीच्या सहाय्याने त्यांनी प्रथिन रचनेतील त्रिमिती वैशिष्ट्ये कृत्रिम प्रथिन बनवताना वापरण्यातील एका नवा कार्यक्रम ग्राफ थिअरीच्या सहाय्याने विकसित केला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणातील जीव माहिती विश्लेषणाचा वापर त्यांनी करवून घेतला आहे.

शेखर मांडे सध्या जैवतंत्रज्ञान  (Department of Biotechnology), जीवभौतिकी (Biophysics), जैवरसायन (Biochemistry), रेण्वीय जीवशास्त्र (Molecular Biology) आणि सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विषयांच्या कार्यदलांवर सेवारत आहेत. शेखर चिंतामणी मांडे ह्यांची ऑक्टोबर १५, २०१८ पासून  वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR – Council of Scientific and Industrial Research ) या संस्थेच्या महासंचालक पदी आणि  वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान विभाग (DSIR – Department of Scientific and Industrial Research’) या संस्थेच्या सचिवपदी नेमणूक झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने त्यांची टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नियामक मंडळ आणि स्वदेशी पुरस्कर्त्या विज्ञान भारती संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

संदर्भ :

 समीक्षक : मोहन मद्वण्णा